जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा 'आनंद’

गंभीर किंवा दुर्धर आजाराचं निदान झाल्यावर कुणी पूर्णपणे खचतं, कुणी भविष्याच्या भीतीने अस्वस्थ होतं, तर कुणी उरलेल्या वेळेत आपल्या माणसांसोबत शक्य तितकं सुंदर जगण्याचा प्रयत्न करतं.

Story: मनी मानसी |
20th November, 11:45 pm
जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा 'आनंद’

याजन्मावर..या जगण्यावर 

शतदा प्रेम करावे..

या वीकेंडला पहिल्यांदाच राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन अभिनित हृषीकेश मुखर्जी ह्यांचा 'आनंद' पाहिला. या चित्रपटाबद्दल खूप ऐकलं होतं. त्यातील गाणी, संवाद, राजेश खन्ना ह्यांचा अभिनय यांचेही अनेकदा संदर्भ आले होते. पण यावेळी तो अगदी निवांतपणे पाहिला आणि एक विचार मात्र मनात सतत घोळत राहिला...

ज्या माणसाला आपला मृत्यू अगदी जवळ आला आहे, हे माहीत आहे, तो इतका आनंदी कसा काय राहू शकतो? आनंदला आपल्या आजाराची कल्पना होती. आपल्याकडे फारसा वेळ उरलेला नाही, हेही त्याला माहीत होते. तरीही त्याच्या चेहऱ्यावरचं हसू, त्याचा मिश्किलपणा, सतत इतरांना हसवण्याची वृत्ती आणि माणसांमध्ये रमण्याची त्याची आवड पाहिली की क्षणभर आपण त्याच्या आजाराचं वास्तव विसरून जातो. तो स्वतः मात्र विसरलेला नाही. कदाचित हीच गोष्ट अधिक विलक्षण आहे.

एक मानसशास्त्रज्ञ म्हणून हेच मला अधिक रंजक वाटले. कारण प्रत्यक्ष आयुष्यातही असं घडू शकतं का? तर हो, नक्कीच! पण प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. गंभीर किंवा दुर्धर आजाराचं निदान झाल्यावर कुणी पूर्णपणे खचतं, कुणी भविष्याच्या भीतीने अस्वस्थ होतं, तर कुणी उरलेल्या वेळेत आपल्या माणसांसोबत शक्य तितकं सुंदर जगण्याचा प्रयत्न करतं. मृत्यूचं वास्तव स्वीकारण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.

आनंदच्या बाबतीत मला त्याचा विनोद विशेष भावला. मानसशास्त्रात Humour हा एक परिपक्व Defence Mechanism मानला जातो. म्हणजेच मनाला त्रासदायक असलेल्या वास्तवाकडे थोड्या विनोदी नजरेने पाहून त्याचं भावनिक ओझं हलकं करणं. आनंद स्वतःच्या परिस्थितीची थट्टा करू शकतो, इतरांना हसवू शकतो. पण याचा अर्थ त्याला दुःख होत नाही असा नाही. 'कहीं दूर जब दिन ढल जाए' हे गाणं ऐकलं की त्याच्या मनातली हळवी बाजूही जाणवते. सतत हसणाऱ्या माणसाच्या मनातही कितीतरी अव्यक्त राहिलेल्या भावना दाटून राहू शकतात, याची ही जाणीव आहे.

आणखी एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे डॉ. भास्कर आणि आनंद यांच्यातलं नातं. भास्करला आनंदचं वैद्यकीय वास्तव माहीत आहे. पण माणूस म्हणून त्याच्याशी निर्माण झालेलं नातं त्याला त्या वास्तवापासून अलिप्त राहू देत नाही. मानसशास्त्रात याला Anticipatory Grief म्हणतात. म्हणजे एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे, याची जाणीव असतानाच सुरू होणारी दुःखाची प्रक्रिया. प्रत्यक्ष वियोग होण्याआधीच मन त्या अनुपस्थितीची कल्पना करून दुःखी होऊ लागतं कारण दुःख म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीला गमावणं नव्हे, तर तिच्या अनुपस्थितीत जगण्याची हळूहळू सवय लावून घेणंही असतं. कधी तिच्या आठवणी चेहऱ्यावर हसू आणतात, तर कधी डोळ्यांत पाणी. काळ पुढे सरकत असतो, पण मनाला त्या वास्तवाचा स्वीकार करण्यासाठी लागणारा वेळ प्रत्येकाचा वेगळा असतो. फ्रॉइडच्या Psychoanalytic दृष्टिकोनातून आनंदकडे पाहिलं तर त्याच्यातील जगण्याची ओढ विशेष लक्षात येते. मृत्यूची जाणीव असूनही प्रेम करणं, नाती जोडणं, नवीन अनुभव घेणं आणि इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं, ही त्याची जीवनप्रेरणा आहे. कदाचित मृत्यूवर त्याचं नियंत्रण नाही, पण तोपर्यंत कसं जगायचं यावर मात्र त्याचा स्वतःचा निर्णय आहे.

मला वाटतं, आनंदचा आशावाद समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकाने दुःखातही हसत राहिलं पाहिजे, असं नाही. रडणं, घाबरणं, रागावणं, असहाय्य वाटणं या सगळ्याही तितक्याच नैसर्गिक भावना आहेत. दुःखाला जागा देऊनही पुन्हा जगण्याकडे वळता येणं, हेच खरं मानसिक सामर्थ्य.

'ज़िंदगी कैसी है पहेली...' हे गाणं ऐकताना आयुष्याचं हेच कोडं पुन्हा जाणवतं. आपण सगळेच उद्याच्या काळजीत आजचा दिवस जगायचा विसरतो. पुढच्या यशाची, पुढच्या टप्प्याची, पुढच्या आनंदाची वाट पाहत राहतो. एखाद्या जुन्या मित्राशी झालेल्या गप्पा, निवांतपणे घेतलेला चहाचा कप, अचानक झालेला हास्याचा स्फोट किंवा एखादा सुंदर सूर्यास्त... या छोट्या गोष्टींमध्येही किती आनंद असतो, हे कधी कधी आपल्याला थांबल्याशिवाय जाणवतच नाही. आनंद पाहताना मला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा ते किती मनापासून जगतो, हे महत्त्वाचं असावं. किती माणसं जोडली, किती जणांना हसवलं, किती जणांच्या आयुष्यात आपल्या असण्याने थोडाफार फरक पडला, याचाही हिशेब कधीतरी व्हायला हवा.

त्यामुळे, बाबूमोशाय... मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही आयुष्यावर प्रेम करता येतं, हे कदाचित आनंद आपल्याला शिकवून जातो कारण आयुष्य किती असेल ते आपल्या हातात नसतं पण ते जगताना त्यात किती प्रेम, आपुलकी, हसू आणि माणुसकी पेरायची, हे मात्र आपल्या हातात असतं.

आणि म्हणूनच कदाचित या चित्रपटाचं नाव 'आनंद' आहे!