वेदना

एका खोट्या शब्दाचे शैल्य मनात घेऊन कुढत राहण्यापेक्षा, एकदा तरी संवाद साधायला हवा होता. शपथ ही कधी कधी सत्यापेक्षा मोठी ठरते आणि आयुष्यभराची ‘वेदना’ देवून जाते.

Story: आठवणींचे पंचामृत |
20th November, 11:37 pm
वेदना

​नामदेवराव आणि नर्मदाबाई. एका छोट्या गावातली अत्यंत कष्टाळू, साधी, गरीब माणसं. घरात गरिबी होती, पण दारात आलेला याचक कधी रिकाम्या हाताने गेला नाही. दुपारच्या उन्हात एखादा वाटसरू आला तर नर्मदाबाई स्वतः उपाशी राहून त्याला वाढायच्या.

नामदेवरावांचा एकच दुर्गुण होता तो सर्वांना माहीत होता. एरवी देवमाणूस असलेले नामदेवराव, शेतात नांगर हातात घेतला की बदलून जायचे.

नर्मदाबाई:  “अहो, बैलांना कशाला मारता? जीव आहे त्यांनाही.”

नामदेवराव: (डोळे लाल करून) “तू गप्प बस! हा नांगर काही चालत नाही, बैल ओढत नाहीत, जमीन कसते ना! सगळं माझ्याच नशिबात!”

पुढ्यात कोणी आले तरी त्याला वाटेल ते बोलायचे. त्यामुळे बैलांचे जोत टिकायचे नाहीत, शेतीची कामेही व्हायची नाहीत. मुंबईला असलेला भाऊ मदत करायचा. पण वर्षाला एक बैलजोडी लागते म्हटल्यावर तोही कंटाळला. एक दिवस त्याने थोडी पोटगी हातावर ठेवली आणि सांगितले, "नामदेवा, आता तुझे तू बघ. माझ्याने होईल तेवढे केले." दोघे वेगळे झाले. संसाराचा रहाट आणखी जड झाला. दोन मुलींची लग्ने कशीबशी झाली. मुलगाही वडिलांचे हाल बघून शाळा सोडून शेतात येऊ लागला. मास्तर घरी येऊन गयावया करायचे. "अरे, पोराला शिकू दे. हुशार आहे तो." पण तो ऐकायचा नाही.

मोठ्या मुलीचा नवरा सरकारी खात्यात होता. तिने एक दिवस नवऱ्याला म्हटले, "माझ्या भावाला कुठेतरी चिकटवा हो. सातवी पास आहे, पण गाणं-बजावणं चांगलं येतं त्याला." त्याने एका शहरात शिपायाची नोकरी लावून दिली.

शहर अनोळखी. घरभाडे, गाडीभाडे, खानावळ... पगारात भागायचे नाही. गावीही पैसे पाठवावे लागायचे. तारांबळ उडायची. शेवटी आई-वडिलांनी त्याचे लग्न करून दिले. मग खर्च आणखी वाढला. प्रपंचाला हातभार म्हणून तो संध्याकाळी मुलांना गाणं शिकवू लागला, बायकोने वडापावचा छोटा गाडा टाकला. कधी कधी गावी पैसे पाठवणे जमायचे नाही. मग तो वडिलांना   पत्रातून सांगायचा, "बाबा यावेळी जरा उशीर होईल. तुम्ही दुकानातून सामान घ्या, मी महिन्याच्या शेवटी देतो त्याला."

गावच्या दुकानात उधारी वाढत होती. एक दिवस दुकानदाराला पैशाची काळजी वाटली. नेमके त्याच वेळी नामदेवराव तांदूळ आणायला गेले. घरी नर्मदाबाईंनी चुलीवर भाताचे आधण ठेवले होते. दुकानदाराने धीर करून सांगून टाकले, "नामदेवराव, वाईट नका वाटून घेऊ. पण तुमच्या पोराचा फोन आला होता. त्याने सांगितले आहे, तुम्हाला आता उधारी द्यायची नाही म्हणून." नामदेवरावांनी काहीच उत्तर दिले नाही. हातातली पिशवी तशीच राहिली. ते तिथेच मनाने मेले. शरीराने फक्त घरी आले.

घरी येऊन त्यांनी डोक्यावर हात घेऊन बसकण मारली आणि रडू लागले.

नर्मदाबाई: "काय झाले? असे का रडता?"

नामदेवराव: "आपलेच पोर आपल्याला... त्याने दुकानदाराला सांगितले म्हणे, आम्हाला उधारी देऊ नको. आपण मेलेलो बरे." ते सांगताना त्यांनी  बायकोला एक शपथ घातली, "पण लक्षात ठेव, या बद्दल पोराला एक शब्दही बोलायचा नाही. माझी शपथ आहे तुला."

त्या दिवसापासून नामदेवराव झुरू लागले. आतल्या आत. कोणालाही न सांगता. जर त्या दिवशी एक फोन केला असता, एकदा विचारले असते, "बाळा, तू असे बोललास का?" तर सगळे स्पष्ट झाले असते. पण शपथ मोठी होती. मुलाला यातले काहीच माहित नव्हते. तो तितकाच निष्पाप होता.

बाबा गेल्यावर आईने एक दिवस मुलाला ही गोष्ट सांगितली. ऐकून तो हादरलाच. "आई, मी कधीच असे सांगितले नाही! त्या दुकानदाराने खोटे सांगितले त्याना? अरे देवा, बाबा या खोट्यापायी गेले?" पण आता बोलून काय फायदा? वडील गेले होते. वर्षे गेली. नातवंडे मोठी झाली. शाळेत इतर मुलांचे आजी-आजोबा बघून त्यांनी बाबाला विचारले, "बाबा, आमचे आजोबा कुठे आहेत?"

तेव्हा वडिलांनी त्यांना सगळी हकीकत सांगितली. सांगताना बाप आणि लेकरे भळाभळा रडत होती. नातवंडे रागात म्हणाली, "बाबा, तुम्ही त्या दुकानवाल्याला जाब विचारला का नाही? त्याला दोन थोबाडीत द्यायला हवी होती!"

"आता काय विचारू बाळा? ज्यांना सांगायचे होते की मी असे केले नव्हते, तेच तर राहिले नाहीत..."

तेव्हा धाकटा नातू म्हणाला, "जाऊ दे बाबा. माणूस मेल्यावर स्वर्गात जातो ना? तिथे देव आजोबांना सगळे खरे सांगेल. की तुम्ही असे केले नव्हते म्हणून."

त्या एका वाक्याने सगळे शांत झाले. माणसाने पैशासाठी माणुसकी सोडायची का? आणि एका खोट्या शब्दाचे शैल्य मनात घेऊन कुढत राहण्यापेक्षा, एकदा तरी संवाद साधायला हवा होता. शपथ ही कधी कधी सत्यापेक्षा मोठी ठरते आणि आयुष्यभराची ‘वेदना’ देवून जाते.