केंद्रीय गृहमंत्री अमित शहा : निम्म्याहून अधिक गोमंतकीयांना मिळणार हक्काचे घर

कार्यक्रमाला उपस्थित लोकांना अभिवादन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व इतर मंत्री, आमदार. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यात सुरू झालेली ‘माझे घर’ योजना ही केवळ सरकारी योजना नाही, ती भाजप सरकारची संवेदनशीलता, कुशल प्रशासनाची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून केल्या जात असणाऱ्या बदलांची ओळख आहे. यामुळे गोव्यातील निम्म्याहून अधिक जनतेला हक्काचे घर मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. शनिवारी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे ‘माझे घर’ योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमात २,४५२ कोटी रुपयांच्या विविध १९ प्रकल्पांची व्हर्च्युअल पद्धतीने पायाभरणी, तसेच उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व अन्य मंत्री, आमदार उपस्थित होते. कार्यक्रमाला गोव्यातील कानाकोपऱ्यांतून सुमारे २० हजार लोक उपस्थित होते.
अमित शहा पुढे म्हणाले की, विविध कायद्यांच्या कचाट्यात सापडल्याने गोव्यातील अनेक घरे नियमित होत नव्हती. याबाबत न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे ही घरे पाडली जाण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘माझे घर’ योजना आणली. यातील विविध ११ योजनांद्वारे गोव्यातील जनतेची त्यांची स्वतःची घरे त्यांचे नावे केली जाणार आहेत. यासाठी गोवा सरकारने कायद्यात बदल केले. आता २०१४ पूर्वीची सरकारी, कोमुनिदाद जमिनीवरील घरे नियमित होतील. २० कलमी कार्यक्रमांतर्गत दिलेल्या जमिनी नावावर केल्या जातील. घर दुरुस्तीला ३ दिवसांत परवाने, वीज, पाण्यासारख्या मूलभूत सुविधा देणे, अशा सुविधादेखील देण्यात आल्या आहेत. घरांना ‘क्लास १’ ओक्युपन्सी मिळाल्यावर यावर कर्ज घेता येईल. घर मालकाचे निधन झाल्यास घर सहजपणे त्याच्या वारसाच्या नावे केले जाईल.
गोव्यातील भाजप सरकारने एकाच योजनेअंतर्गत गोव्यातील सुमारे १० लाख लोकांना घरांचा हक्क दिला आहे. याची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळाली आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यावर मोदींनी सर्व भाजप आणि एनडीए राज्यांना संदेश दिला होता. त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले होते. आवश्यक असल्यास नवे कायदे आणून लोकांना त्यांचे हक्क मिळवून द्यावेत, असेही मोदी यांनी सांगितले होते. आजदेखील भाजप सरकारे याच प्रेरणेने काम करत आहेत. भाजप काळात देशातील ६० कोटी गरीब जनतेला विविध फायदे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आज दहा लाख गोमंतकीयांना दिलासा दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि त्यांच्या सरकारचे आभार मानतो.
पायाभूत सुविधांसह मनुष्याचाही विकास : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले की, भाजप सरकार अंत्योदय, ग्रामोदय तत्त्वावर काम करत आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे पुढील ५० वर्षांचा विचार करून गोव्यात नवीन प्रकल्प आणले जात आहेत. गोव्यात पायाभूत सुविधांच्या विकासासह मनुष्याचा विकासदेखील होत आहे. ‘माझे घर’ ही केवळ योजना नसून ती एक मोहीम आहे. यामुळे गोमंतकीय व्यक्तीला त्याच्या घराच्या स्वरूपातील वारसा पुढील पिढीला देण्यास मदत होईल. पुढील सहा महिन्यांत गोमंतकीयांची घरे त्यांच्या नावावर केली जातील.
गोवा भारतमातेच्या कपाळावरील कुंकू
शहा यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोवा खूप छोटे राज्य असल्याचे म्हटले होते. त्यावेळी मी त्यांना कोणतेही राज्य छोटे अथवा मोठे नसल्याचे सांगितले होते. आमच्या दृष्टीने गोव्यातील नागरिक महत्त्वाचे आहेत. लहान असला तरी गोवा भारतमातेच्या कपाळावरील कुंकू आहे.
गोवा २०३६ पर्यंत होईल पूर्ण विकसित
पंतप्रधान मोदींनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवले आहे. मी मागील १५ वर्षे गोव्यात येत आहे. आज येथे २,४५२ कोटींचा प्रकल्पांची पायाभरणी झाली. येथे ज्या गतीने विकास कामे होत आहेत, ते पहाता गोवा २०३५ ते २०३६ पर्यंतच पूर्ण विकसित होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
स्व. मनोहर पर्रीकरांनी गोव्याचे नाव उज्ज्वल केले
अमित शहा म्हणाले की, आजच्या दिवशी मी स्व. मनोहर पर्रीकरांची आठवण काढत आहे. त्यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि दूरदर्शीपणा दाखवून गोव्याचे नाव देशभर उज्ज्वल केले.
स्वदेशीचा वापर करा
केंद्र सरकारने जवळपास ३९५ गोष्टींवरील जीएसटी एक तृतीयांश कमी केला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा. व्यापारी तसेच ग्राहकांनीदेखील स्वदेशीचा आग्रह धरावा, असे अमित शहा यांनी सांगितले.