या आठवड्यात प्रेक्षकांसाठी थिएटर आणि ओटीटी दोन्ही ठिकाणी मोठी एंटरटेनमेंट ट्रीट मिळणार आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारे अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार असून अॅक्शन, कॉमेडी, थ्रिलर, ड्रामा अशा सर्वच प्रकारांचा भरगच्च मेनू उपलब्ध होणार आहे.
कांतारा : चॅप्टर १ । थिएटर्स
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाचा हा प्रीक्वेल आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला पहिला भाग बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यावेळी ‘कांतारा : चॅप्टर १’मध्ये ऋषभ शेट्टी केवळ मुख्य भूमिका साकारणार नाही, तर तो लेखक व दिग्दर्शकाच्या भूमिकेतही दिसणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
सनी संस्कारी की तुलसी कुमारी । थिएटर्स
हा एक हलकाफुलका रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. दसऱ्याच्या दिवशीच ‘कांतारा : चॅप्टर १’सोबत प्रेक्षकांच्या पसंतीसाठी स्पर्धा करणार आहे. चित्रपटात वरुण धवन, जानव्ही कपूर, मनीष पॉल व अक्षय ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मद्रासी। प्राइम व्हिडिओ
विद्युत जामवाल अभिनीत आणि ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित हा मानसशास्त्रीय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. विद्युत जामवालच्या दमदार अॅक्शनसोबत रोमहर्षक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
डाकुआं दा मुंडा । झी५
हा चित्रपट एका अनाथाश्रमात वाढलेल्या गुन्हेगारी कुटुंबातील तरुण बॉक्सरच्या आयुष्याभोवती फिरतो. राष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्याचे स्वप्न अपघातामुळे अपूर्ण राहते आणि त्यानंतर तो अमली पदार्थाच्या अंधाऱ्या गर्तेत जातो. रोमांचक कथानकामुळे पंजाबी प्रेक्षकांसाठी ही खास मेजवानी ठरणार आहे.
मैने प्यार किया। लायन्सगेट प्ले
या चित्रपटात आर्यन नावाच्या तरुणाची ही कथा आहे, ज्याला निती नावाच्या तमिळ मुलीवर प्रेम जडते. तिच्या मागे तो मदुराईला जातो आणि तेथे हिंसा व राजकारणाच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकतो. या चित्रपटात ह्रिधु हारून, प्रीती मुखुंधन मुख्य भूमिकेत आहेत.
मॉन्स्टर: द एड गेन स्टोरी । नेटफ्लिक्स
हा शो मॉन्स्टर मालिकेचा तिसरा भाग आहे. यात एड गेन या कुप्रसिद्ध खुन्याची आणि थडगी खोदणाऱ्याची कथा आहे. हॉलीवूडमधील अनेक आयकॉनिक खलनायकांचे प्रेरणास्थान असलेल्या गेनचे वैयक्तिक जीवन आणि गुन्हेगारीकडे त्याचा झालेला प्रवास या मालिकेत दाखवला आहे.
जिनी, मेक अ विश । नेटफ्लिक्स
ही कथा का यंग नावाच्या मुलीची आहे. ती हजारो वर्षांपासून झोपेत असलेल्या एका जिनला जागे करते. तो जिन तिला तीन इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देतो. पण या इच्छांमुळे तिचे आयुष्य अधिक गुंतागुंती बनते. या चित्रपटात किम वू बिन, बे सूझी मुख्य भूमिकेत आहेत.
स्टीव्ह । नेटफ्लिक्स
ही कथा १९९० च्या दशकातील इंग्लंडमधील आहे. स्टीव्ह हा ‘लास्ट-चान्स रिफॉर्म स्कूल’चा हेडटीचर असतो. तो आपल्या कामातल्या आव्हानांना तो सामोरा जात असतानाच मानसिक आरोग्याशी झुंजही देत असताे. या मालिकेत सिलियन मर्फी, ट्रेसी उलमन, सिम्बी अजिकावो, एमिली वॉटसन मुख्य भूमिकेत आहेत.