महाराणी येसूबाई ते आजच्या ‘सुपरवुमन’चा प्रवास

आपण महाराणी येसूबाईंसारख्या स्त्रियांकडून काही शिकायचं असेल, तर ते हे – जबाबदाऱ्या सांभाळतानाच आत्मसन्मान जपायचा.

Story: मनी मानसी |
08th March, 12:20 am
महाराणी येसूबाई ते आजच्या ‘सुपरवुमन’चा प्रवास

परवा मी कुटुंबासोबत ‘छावा’ हा चित्रपट पाहायला गेले. इतिहासाची गोडी तशी बालपणापासूनच लागली होती. १२ व्या वर्षी ‘श्रीमान योगी’, ‘छावा’ आणि १४व्या वर्षी ‘संभाजी’ वाचल्यापासून महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि राजमाता जिजाऊंसाठी वाटणारा आदर मनात खोल रुतून बसलेला. पण नेहमी छत्रपती संभाजी महाराजांचा विषय आल्यास माझं मन धाव घेई ते महाराणी येसूबाईंच्या व्यक्तिमत्त्वाकडे. लहानपणी ‘छावा’ वाचताना एक ओळ माझ्या मनात कायमस्वरूपी कोरली गेली होती जी जिजाऊ आईसाहेब महाराणी येसूबाईंस म्हणतात, "येसू, तुमच्या पदरास निखाराच बांधला आहे!”

महाराणी येसूबाईंचं मनोबल – एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन

एक महाराणी, एक योद्धा, एक आई आणि एक कुशल प्रशासिका, येसूबाईंच्या या सर्व भूमिकांना पार पाडण्यासाठी त्यांचे मानसिक बळ किती प्रबळ असावं लागलं असेल! एका बाजूला त्या श्री-सखी म्हणून राजाच्या सोबतीला उभ्या, तर दुसऱ्या बाजूला सत्ता सांभाळत असताना, राजकारण, शत्रूंच्या कटकारस्थानांशी दोन हात, ह्या सगळ्या आघाड्यांवर कर्तव्य बजावत असता एक स्त्री म्हणून त्यांनी किती आत्मसंयम ठेवला असेल?

खरंतर, आपल्या इतिहासात राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, महाराणी ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई...यासारख्या असंख्य स्त्रिया "फेमिनिझम" नावाचा शब्द अस्तित्वात यायच्या आधीच त्याचा अर्थ जगून दाखवत होत्या. खऱ्या अर्थाने स्वावलंबी, आत्मनिर्भर, आणि परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या!

समकालीन स्त्रीचे मानसशास्त्र आणि बदलती भूमिका

समाधान आणि कणखरता – ह्या दोन गोष्टींमध्ये तीव्र संघर्ष असतो. येसूबाईंच्या काळातही हा होता आणि आजही तो आहे. त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या, पण स्वतःचं ‘स्व’ शोधायचा त्यांना फारसा अवकाश नव्हता. त्यांच्या आयुष्याची खरी identity  "संबंध" आणि "कर्तव्य" ह्यात अडकली होती.

आजच्या स्त्रीचे देखील तसेच आहे. ती घर सांभाळते, ऑफिसमध्ये आपला ठसा उमटवते, कधी सासरच्या अपेक्षा सांभाळते, कधी मुलांच्या भविष्यासाठी झगडते. पण तिला स्वतःसाठी वेळ आहे का?

लहानपणी ती "ही मुलगी किती गोड आहे" असं म्हणून लाडात वाढते. तरुणपणी ती अभ्यास, करिअर, समाजाच्या अपेक्षा, विवाह, नातेसंबंध सगळं सांभाळते. पुढे कोणाची पत्नी होते, आई होते, सून होते व नोकरी करणारी असेल तर ऑफिसमध्येही तिचं वेगळंच रणांगण असतं. मग हळूहळू ती आजी, पणजीदेखील होते. पण ह्या सगळ्यात तिच्या जबाबदाऱ्यांचा भार मात्र कमी होत नाही, फक्त स्वरूप बदलत जातं. आणि नकळत या प्रवासात तिच्या 'मी'पणाला गुदमरून टाकलं जातं.

माझ्याकडे येणाऱ्या अनेक स्त्रिया त्यांच्या मनातील दडवलेले प्रश्न विचारतात –

"संसाराचा गाडा ओढताना मी स्वतःला हरवतेय का?"

"आई, सून, बायको, ह्या सगळ्या भूमिका निभावताना मी माझं 'मीपण' कुठे गमावते आहे का?"

"माझं करिअर, माझ्या जबाबदाऱ्या आणि माझं स्वतःचं मानसिक आरोग्य यांच्यात संतुलन कसं साधायचं?”

खरं सशक्तीकरण म्हणजे काय?

आज महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली फार मोठमोठे फलक लावले जातात. पण खरं सशक्तीकरण म्हणजे नक्की काय?

स्त्रीसशक्तीकरण म्हणजे "मला पुरुषांइतकंच सगळं करायचंय" असा हट्ट नाही. तर, "एक स्त्री म्हणून ज्या गोष्टी मी करू शकते, त्या करावयास मला योग्य संधी मिळावी आणि त्या मी स्वाभिमानाने कराव्यात" हा विचार आहे. स्त्रीचं सशक्तीकरण घडतं तेव्हा, जेव्हा

एक सून सासूशी मैत्री करते,

एक बहीण भावाला समानतेची शिकवण देते,

एक आई आपल्या मुलांना स्त्री-पुरुष समानतेचं महत्त्व शिकवते,

एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या करिअर निवडीचं समर्थन करते.

मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर एका स्त्रीचं आयुष्य म्हणजे सतत नवनव्या भूमिका स्वीकारण्याचा प्रवास. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बंडुराच्या ‘Social Learning Theory’ नुसार, लहान मुलं आजूबाजूच्या व्यक्तींचे अनुकरण करून शिकतात. त्यामुळेच, जर मुलींना खरं स्त्री-सशक्तीकरण शिकवायचं असेल, तर त्यांना घरातच योग्य उदाहरण मिळायला हवं. 

जर आईच स्वतःच्या भावनांना दाबून घर सांभाळत असेल तर तिच्या मुलीलाही नकळत तसंच शिकायला मिळतं. याउलट जर एक स्त्री आपल्या मर्यादा स्पष्टपणे ठरवते, स्वतःला प्राधान्य देते, आपल्या करिअर आणि कुटुंब यांचा उत्तम समतोल राखते, तर ती तिच्या पुढच्या पिढीसाठी देखील एक उत्तम आदर्श ठरते.

म्हणूनच आपण महाराणी येसूबाईंसारख्या स्त्रियांकडून काही शिकायचं असेल, तर ते हे – जबाबदाऱ्या सांभाळतानाच आत्मसन्मान जपायचा. करिअरमध्ये उंच भरारी घ्यायची, पण कुटुंब आणि मानसिक आरोग्य यांचा समतोल ठेवायचा.

असं ही म्हणतात की, "स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते!”.

पण ते खरंच आहे का? राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई, महाराणी ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्यांनी एकमेकींना कधी कमी लेखलं होतं का? तसं जर असतं, तर आज इतिहास वेगळाच झाला असता, नाही का?

आजच्या काळात जिजाऊ, येसूबाई आणि ताराराणी!

आज आपल्याला राजमाता जिजाऊंसारखं स्वराज्य उभारायचं नाही, पण स्वतःचं आयुष्य तर उभारायचं आहे, मुलांना शिक्षण आणि स्वावलंबनाचं शस्त्र तर द्यायचं आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, स्वतःला आवर्जून हा प्रश्न विचारा,

"महाराणी येसूबाई आज आपल्यात असत्या, तर त्यांनी आजच्या स्त्रियांसाठी कोणती शिकवण दिली असती?”


मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, डिचोली - गोवा  मो. ७८२१९३४८९४