पणजी : काणकोण तालुक्यात २०१८ मध्ये एका इमारतीच्या बांधकाम परिसरात मिठाई देऊन सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी बाल न्यायालयाने आरोपी मनोज कुमार (मध्य प्रदेश), आसाम येथील जयदीप रै आणि रवी रै या तिघा सुरक्षा रक्षकांना दोषी ठरविले आहे. याबाबतचा आदेश बाल न्यायालयाचे अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला आहे.
या प्रकरणी काणकोण पोलिसांनी २८ एप्रिल २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, सहा वर्षीय पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. त्यात मुलीला एका इमारतीच्या बांधकाम परिसरात मिठाई देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले होते. याची दखल घेऊन तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६,३७७ ३५४, ३६५ आणि गोवा बाल कायद्याचे कलम ४ व ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मनोज कुमार, जयदीप रै आणि रवी रै या तिघा सुरक्षा रक्षकांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून वरील तिघा आरोपी विरोधात १८ जून २०१८ रोजी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन तिघा आरोपींविरोधात २७ जुलै २०१८ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला.
१७ रोजी पुढील सुनावणी
बाल न्यायालयात सरकारी वकील अॅना मेडोंका आणि थेमा नार्वेकर यांनी युक्तिवाद मांडून आरोपी विरोधातील पुरावे सिद्ध केले. बाल न्यायालयाने पुराव्यांची दखल घेऊन तिघा आरोपींना दोषी ठरविले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ रोजी होणार आहे.