आईकडून शिकण्यासारखे बरेच काही असते. अगदी रोजच्या सवयी, कार्यपद्धती. प्रेमळपणा, बोलण्यातला हळुवारपणा, स्वयंपाक, साफसफाई, नीटनेटकेपणा, पाहुण्यांचे अगत्य, जबाबदारीने वागणे, मोठ्यांची काळजी घेणे, आदबशीर बोलणे हे सर्व आईचे गुण लहानपणापासून मुलगी जवळून पहात असते, अनुभवत असते.
‘तू जेव्हा स्वत: आई होशील ना, तेव्हा कळेल तुला.’ हे वाक्य घरोघरी आई आपल्या मुलीला उद्देशून बोलताना ऐकले असेलच सर्वांनी. त्या एका वाक्यात कितीतरी अर्थ गर्भित असतो. तू लग्न करून तुझ्या सासरी जावो, तुला मुलं बाळं होवोत, तू आई व्हावंस आणि आईपणाच्या सर्व भावना तुला अनुभवता याव्यात. यासाठी तू आई होणं गरजेचं आहे. हा त्यापाठीमागे मतीतार्थ लपलेला असतो आणि एका आईची तिची वंशवेल वाढत राहो ही आपल्या मुलीसाठीची प्रगल्भ उत्कट इच्छा असते. “तेव्हा तुला माझी किंमत कळेल” हाही भाव त्यामध्ये लपलेला असतो.
आई आणि मुलगी यांच्यात एक विशेष बंध असतो. आईचे खरे प्रेम आणि तिने केलेले पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना करता येत नाही. कोणत्याही हेतूशिवाय कुठल्याही प्रकारची अपेक्षा मनात न बाळगता बिनशर्त प्रेम करण्याची ती एक मूर्त स्वरूप देवीच असते. आई आणि तिचं स्त्रीत्व हा समान धागा तर एकमेकींविषयी ओढ वाटण्याचा असतोच पण तरीही तिच्या आणि आईच्या विचारात कधी कधी सारखेपणा जाणवतो, म्हणूनच पहाणारे लगेच म्हणतात, “ही अगदी आईवर गेलीय” किंवा “ही अगदी आई सारखीच दिसते” म्हणजे शारीरिक साम्य तर असतेच, भावनिक आणि वैचारिक साम्यताही बघायला मिळते. आई-मुलांचे प्रेम हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रमाणात व्यक्त केले जात असले, तरी आई आणि मुलगी यांच्यातील भावबंध हा खास असतो. तीच तिला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते. ती तिच्यासाठी शक्तिशाली,
आदर्शवत, सामर्थ्यशील आणि चांगलीच असते कारण तिच्या आयुष्यात आलेली ती पहिलीच स्त्री असते.
प्रत्येक मुलीमध्ये तिच्या आईचे थोडेफार गुण उतरलेले असतात. आई नेहमीच आपल्या मुलीच्या भवितव्याचा सुरक्षिततेचा संस्कारांचा विचार करून, तिला काहीबाही शिकवत असते, सुनावत असते, पण दरवेळी तिचे ते म्हणणे मुलगी ऐकतेच असे नाही. बरेचदा तिचे बोलणे कानामागे टाकले जाते. आईला तिने गृहीत धरलेले असते. आईची कळकळीची विनंती तिच्या हृदयापर्यन्त पोचतच नाही. अशा वेळी आईच्या तोंडून हेच वाक्य ऐकायला मिळते, “मी काय सांगतेय हे तुला आई झाल्याशिवाय नाही समजणार.” आणि यात खरेच तथ्य असते. जेव्हा ती मुलगी ‘आई’ बनण्याची प्रक्रिया चालू होते, तेव्हा नकळतपणे ती आपल्या आईचा विचार करू लागते. आपल्या आईने दिलेली माया, प्रेम, जिव्हाळा, काळजी, जपणूक सारे आठवू लागते. जेव्हा ती तिच्या बाळाला वाढवत असते, तेव्हा आपल्यालाही आईने असेच अंगाई गीत गाऊन निजवले असेल, आजारपणात काळजी घेतली असेल, रात्रभर जागून आपली सेवा केली असेल, आपल्या आरोग्यासाठी देवाकडे हात जोडून मागणे मागितले असेल. तिला आठवतात ते दिवस, जेव्हा तिला काही अडचण आली आणि आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून तिचा आधार बनली. खचून गेलेल्या वेळी मनोबल वाढवलं. नेहमी माझ्याच सुखाचा तिने विचार केला. माझी प्रत्येक आवड निवड तिने बारकाईने लक्षात ठेवली, भुकेने कासावीस झाल्या वेळी समोर ताटात आलेला आवडता पदार्थ पाहून आपण त्यावर ताव मारताना तिला कधी थॅंक्स म्हंटलं नाही आणि तिनेही कधी त्याची अपेक्षा केली नाही. आपण पोटभर खाल्लं हाच तिचा आनंदाचा परमोच्च क्षण होता. माझ्या मनातल्या भावनांना तीच चांगलं समजून घेऊ शकते, मला तिने आयुष्याचा जोडीदार निवडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला. नुसता सल्ला देऊन ती गप्प बसली नाही, तिने सगळी चौकशी करून मगच आपल्या लग्नाला हो म्हणाली होती. सतत तिच्या पाठीशी असण्याची सवय झालेली ‘ती’ मात्र आता नवीन संसारात मात्र पूर्णपणे रमलेली असते. तिच्या मनात आता वेळ आणि सवड झाली, तर आईशी बोलायची गरज भासते. आईचे मात्र कान आणि डोळे तिच्या फोनची आतुरतेने वाट पहात असतात. तिचे चार शब्द कानावर पडावेत यासाठी ती आसुसलेली असते. आईचे हात नेहमीच आपल्या लाडक्या लेकीला कवेत घेण्यासाठी पसरलेले असतात. ती मिठी म्हणजे अनेक भावनिक आजारांवरचे औषध असते. ते एक अनोखे बंधन आहे.
मायलेकी एकमेकांच्या मैत्रिणी असू शकतात. चांगल्या आधार बनू शकतात. आई लेकीचे हे कनेक्शन सगळ्यात मजबूत कनेक्शन आहे. आपल्या मुलीसाठी आई ही नेहमीच प्रेरणादायी असते, मार्गदर्शक असते, अडीअडचणीला मदतीचा हात देणारी असते. मनातला गोंधळ मिटवणारी, योग्य दिशा दाखवणारी दिशादर्शक असते. तिचे अनुभवाचे बोल मुलीच्या आयुष्यातही समजूतदारपणा, तडजोड करायला भाग पाडणारे ठरतात. आईकडून शिकण्यासारखे बरेच काही असते. अगदी रोजच्या सवयी, कार्यपद्धती. प्रेमळपणा, बोलण्यातला हळुवारपणा, स्वयंपाक, साफसफाई, नीटनेटकेपणा, पाहुण्यांचे अगत्य, जबाबदारीने वागणे, मोठ्यांची काळजी घेणे, आदबशीर बोलणे हे सर्व आईचे गुण लहानपणापासून मुलगी जवळून पहात असते, अनुभवत असते. त्या गोष्टींचा नकळत मुलीच्या वागण्यावर पण परिणाम होत असतो. तीच वागणूक पुढे मुलगी मोठी झाल्यावर आचरणात आणते. म्हणूनच एका आईने आपल्या मुलीसाठी चांगले आदर्श घालून द्यायला हवेत.
पूर्वी लोक मुलगी बघायला जाताना म्हणायचे “मुलीची आई कशी आहे ते बघा, म्हणजे मुलगी कशी असेल हे कळते.” अर्थात हा नियम सर्वांना लागू पडत नाही. याहून वेगळी परिस्थिती असू शकते. आईचे कधी शब्द प्रोत्साहन देणारे असतात, कधी सांत्वन करणारे असतात, कधी पाठ थोपटणारे असतात त्यामुळे मनाला उत्साह उमेद मिळते. कुणी नाही, तर निदान आपली आई तरी आपल्याला समजून घेते ही भावना तिच्यासाठी पुरेशी असते. आपले कर्तृत्व, आपली हुशारी, आपलं प्रमोशन, आपली वाहवा, झालेली तिला बघायची असते अशा वेळी आईचा अभिमानाने ऊर भरून येतो. “माझी मुलगी शोभतेस तू. तुझ्या कर्तृत्वाचा मला अभिमान वाटतो.” अशा तिच्या वाक्यांनी मनाची बळकटी शत पटीने वाढते.
मुली म्हणजे आईच्या दागिन्याच्या पेटीतले अनमोल मोती असतात. ती कायमच त्यांची हळुवारपणे जपणूक करते. जीवनाच्या वर्तुळात जेव्हा तिची मुलगी आई होणार असते, तेव्हा तिला तिच्या आईपणाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. तिचं मन आनंदाने, उबेने, मायेने आणि अभिमानाने भरून येते. एक सर्कल पूर्ण झाल्याचे समाधान मिळते. आईकडून आईपणाकडे जाण्याची वाटचाल चालू होते.
प्रतिभा कारंजकर, फोंडा