वायनाडमध्ये काँग्रेसला आव्हान देणे अवघड

Story: राज्यरंग |
31st October 2024, 12:14 am
वायनाडमध्ये काँग्रेसला आव्हान देणे अवघड

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड व उत्तर प्रदेशमधील अमेठी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघात त्यांनी विजय मिळवल्यानंतर वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

२००८ साली वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या चारही लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजयी मिळवलेला आहे. येथे त्यांना केवळ डावे पक्षच काही प्रमाणात विरोध करू शकतात अशी स्थिती आहे.

वायनाड लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सात जागा आहेत. यापैकी तीन मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार, तर एका मतदारसंघात मुस्लीम लीगचा आमदार आहे. एका मतदारसंघात अपक्ष आमदार असून कम्युनिस्ट पार्टीकडे दोन जागा आहेत. भाजपसह इतर पक्षांना वायनाडसह केरळमधील जनता फारसा प्रतिसाद देत नसल्याचे अलीकडच्या निवडणुकांमधील मतदानावरून स्पष्ट होत आहे, त्यामुळे वायनाडमध्ये प्रियांका गांधींना पराभूत करणे त्यांच्या विरोधकांसाठी अवघड आहे.

२००९ व २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते, केरळ स्टुडंट्स युनियनचे माजी अध्यक्ष एम. आय. शानवास यांनी विजय मिळवला होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शानवास यांनी कम्युनिस्ट पार्टीचे एम. रहमतुल्लाह यांचा पराभव केला. शानवास यांनी २०१४ मध्ये पुन्हा एकदा वायनाडची लोकसभा निवडणूक जिंकली होती.

२०१९ च्या निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदींची लाट व भाजप नेत्या स्मृती इराणींची अमेठीमधील वाढती लोकप्रियता पाहून काँग्रेसने राहुल गांधी यांना वायनाड व अमेठी या दोन्ही मतदारसंघांतून लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते. इराणी यांनी अमेठीत राहुल गांधींचा पराभव केला. मात्र, वायनाडवासीयांनी राहुल गांधींवर विश्वास दर्शवत त्यांना लोकसभेत पाठवले. राहुल गांधी यांना अमेठीमध्ये तब्बल २०२४ मध्ये मात्र राहुल गांधी यांनी अमेठी व वायनाड या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवला. सलग दोन निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी या मतदारसंघात साडेतीन ते चार लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. या मुस्लीमबहुल लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मुस्लीम लीगचीदेखील साथ मिळत असल्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात आव्हान देणे अवघड आहे, म्हणूनच काँग्रेसने प्रियांका गांधी यांना येथून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

ऋषभ एकावडे