कोलवाळ तुरुंग क्षेत्र ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करा!

तस्करी रोखण्यासाठी तुरुंग प्रशासनाची गृह खात्याकडे मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29 mins ago
कोलवाळ तुरुंग क्षेत्र ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करा!

पणजी : कोलवाळ तुरुंगात (Kolwal Jail) मोबाईल, अमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ व इतर वस्तूंची तस्करी (Smuggling of goods) होत आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता असल्यामुळे तुरुंग प्रशासनाने संबंधित परिसर नो फ्लाईंग क्षेत्र (No flying zone)  घोषित करण्यासाठी गृह खात्याकडे मागणी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव तुरुंग प्रशासनाने पाठविला आहे.
कैद्याकडून कोलवाळ तुरुंगात अनेक वस्तूची तस्करी होत असल्याचे तसेच समोर आल्यानंतर तुरुंग महानिरीक्षक केशव राम चौरासीया यांच्या मार्गदर्शनाखाली तुरुंग अधीक्षक सुचेता देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तुरुंगात अनेकदा छापे टाकण्यात आले. त्यानुसार, गुन्हा शाखेने ६ सप्टेंबर २०२५ रोजी कोलवाळ पोलिसांनी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी आणि १० जानेवारी २०२६ रोजी गुन्हे दाखल केले आहे. त्याशिवाय एका तुरुंग कर्मचाऱ्याने तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी केल्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर कैद्याला भेटायला आलेल्या एका नातेवाईकाने तस्करीचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, बारा वर्षीय मुलाच्या खून प्रकरणातील संशयिताने तुरुंगातून तक्रारदाराला फोन करून मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला होता. यावर मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंग प्रशासनावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. न्यायालयाने मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही आणि सेल्युलर इन्स्पेक्शन सिस्टम बसवण्याचे निर्देश दिले होते. याची दखल घेऊन तुरुंग अधीक्षकांनी न्यायालयात स्थिती अहवाल सादर करून सध्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पुनर्रचना करून पाळत अधिक कडक करणे, करागृृहात येणाऱ्या प्रत्येक वस्तूची आणि व्यक्तीची पद्धतशीर तपासणी करणे, मोबाईल चार्जिंग रोखण्यासाठी अनावश्यक विद्युत पॉईंट्स काढून टाकणे आदी उपाययोजनांची माहिती दिली.
ड्रोनचा वापर होत असल्याची शंका
तुरुंगात अलीकडेच पडलेल्या छाप्यात तंबाखूजन्य पदार्थांसोबत काही लोखंडी सळ्या आढळल्या होत्या. या वस्तू बाहेरील भिंतीवरून फेकण्याऐवजी ड्रोनच्या सहाय्याने आत पोहोचवल्या गेल्याची दाट शंका प्रशासनाला आहे. त्यानुसार हे अत्याधुनिक तंत्रज्ञान रोखण्यासाठीच आता गृह खात्याकडे ‘नो फ्लाईंग झोन’ची मागणी लावून धरली जात आहे.      

हेही वाचा