बेशिस्त वाहनचालकांना डिचोली, सत्तरीत २९.७८ लाख रुपयांचा दंड

वाहतूक पोलिसांची कारवाई : वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबद्दल ७,०४१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 mins ago
बेशिस्त वाहनचालकांना डिचोली, सत्तरीत २९.७८ लाख रुपयांचा दंड

वाळपई : डिचोली वाहतूक विभागाने (Dicholi Transport Department) गेल्यावर्षी सुमारे २९ लाख ७८ हजार ५०० रुपयांच्या दंडाची वसुली केली. कर्मचाऱ्यांची कमतरता असताना सुद्धा त्यांनी सत्तरी व डिचोली तालुक्यांमध्ये चोख कामगिरी बजावली. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यावर भर दिला. ७,०४१ जणांवर विविध गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस वाहतूक खात्याचे निरीक्षक चंद्रकांत गावस (Police Inspector Chandrakant Gavas) यांनी दिली.
 दोन्ही तालुक्यांत वाहतूक नियमांबाबत जागृती
गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक विभागाने केवळ दंड वसुलीवर लक्ष न देता प्रशिक्षणावरही भर दिला आहे. यासाठी सत्तरी व डिचोली तालुक्यांतील विविध शाळांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. विभागाने विविध शाळांमध्ये १५३ कार्यक्रमांचे आयोजन करून ५,६७६ विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिले. यामध्ये २९४ होमगार्ड, ५९१ कामगार आणि २४२ प्रतिष्ठित नागरिकांना प्रशिक्षित करण्यात आले. एकूण २७ ठिकाणी रस्ता सुरक्षा प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले.
अपघाती मृत्यूच्या संख्येत घट
वाहतूक विभागाच्या सतर्कतेमुळे अपघाती मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. २०२४ मध्ये अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या ३४ होती, ती २०२५ मध्ये २३ झाली आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता
सत्तरी आणि डिचोली या दोन्ही तालुक्यांत एकूण पाच आमदार कार्यरत आहेत. तरीही या विभागाला अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन धोरणानुसार दंड करण्याचे अधिकार केवळ निरीक्षक आणि उपनिरीक्षकांना आहेत, मात्र या विभागात अद्याप एकही उपनिरीक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही. असे असूनही निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी दोन्ही तालुक्यांमध्ये कामाचा समतोल राखला आहे.
नियमांचे पालन करा : गावस
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणे अनिवार्य असते. स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे. येणाऱ्या काळात अपघातांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी केली आहे.
विविध गुन्ह्यांतर्गत झालेली कारवाई व दंड
* अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे ९३७ जणांवर गुन्हे दाखल (दंड : ६ लाख ३९ हजार रुपये).
* असुरक्षित ड्रायव्हिंग : १४९ जणांवर कारवाई (दंड : ६० हजार रुपये).
* मद्यप्राशन करून वाहन चालवणे : १४३ जणांवर गुन्हे.
* हेल्मेटविना प्रवास : ३४४ जणांवर कारवाई.
* नो पार्किंगसाठी १७८ आणि धोकादायक पार्किंगसाठी ७२० जणांवर कारवाई.            

हेही वाचा