कार्यकारी संपादकपदी नेमणूक

किशोर नाईक गांवकर - गोवन वार्ता; पांडुरंग गांवकर - भांगरभूंय


14th November 2019, 03:09 am

पणजी : फोमेंतो मीडियामध्ये दै. ‘गोवन वार्ता’च्या कार्यकारी संपादकपदी किशोर नाईक गांवकर यांची, तर दै. ‘भांगरभूंय’च्या कार्यकारी संपादकपदी पांडुरंग गांवकर यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. संजय ढवळीकर यांच्याकडे गोवन वार्ताबरोबरच भांगरभूंय आणि सिंधुदुर्ग लाईव्ह या सिंधुदुर्गातील आघाडीच्या दूरचित्रवाणी वाहिनीच्या संपादकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सन २०१५ मध्ये सुरू झालेल्या गोवन वार्ता या मराठी वर्तमानपत्राने चार वर्षांच्या काळात गोव्यात आघाडीच्या दर्जेदार दैनिकांत स्थान मिळविले आहे. किशोर नाईक गांवकर यांनी या दैनिकात सुरुवातीपासून मुख्य वार्ताहर या पदावर काम सुरू केले. ग्रामीण पत्रकारितेतून त्यांनी सुरुवात केली. ‘गोमन्तक’मध्ये प्रशिक्षणार्थी उपसंपादक आणि ‘गोवा दूत’मध्ये उपसंपादक ते मुख्य वार्ताहर असे काम केले आहे. मूळ तुये-पेडणे येथील असलेल्या नाईक गांवकर यांनी पत्रकारितेत सक्रिय असतानाच सामाजिक विषयांवर सातत्याने लिखाण केले आहे. याशिवाय नाट्यकलाकार म्हणून ते परिचित आहेत. गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
‘गोवन वार्ता’च्या सुरुवातीपासून विशेष प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग गांवकर यांनी आपल्या विशेष बातम्यांनी वर्तमानपत्राला नेहमीच चर्चेत ठेवले आहे. २००० सालापासून ‘पुढारी’मधून त्यांनी वार्ताहर म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली. २००३ मध्ये ‘सुनापरांत’ या कोकणी दैनिकात ते रुजू झाले. तिथे २००५ मध्ये त्यांना मुख्य प्रतिनिधीपदी नियुक्त करण्यात आले. २००९ मध्ये ‘लाेकमत’ या दैनिकात मुख्य प्रतिनिधी म्हणून व त्यानंतर २०१२ मध्ये ‘दैनिक हेराल्ड’ या वर्तमानपत्रात प्रमुख प्रतिनिधी म्हणून काम केले. मूळ सुर्ल-सत्तरी येथील असलेल्या पांडुरंग गांवकर यांनी गेली अनेक वर्षे बातमीदारी करताना संवेदनशील कवी म्हणून गोव्यात तसेच महाराष्ट्रात नाव कमविले आहे. गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचे ते माजी अध्यक्ष आहेत.
‘गोवन वार्ता’चे संस्थापक संपादक असलेल्या संजय ढवळीकर यांनी या वर्तमानपत्राची घडी बसविण्याआधी दैनिक हेराल्ड, गोमन्तक या वर्तमानपत्रांचे तसेच गोवा ३६५ या दूरचित्रवाणी वाहिनीचे संपादक म्हणून काम केले आहे. त्याआधी महाराष्ट्र टाइम्स, केसरी, नवप्रभा या दैनिकांतूनही त्यांनी सेवा बजावली आहे. २००४ मध्ये गोव्यात झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे माध्यम व्यवस्थापक ही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
फोमेंतो मीडियातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालविण्यात येत असलेल्या ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ या दूरचित्रवाणी वाहिनीच्या संपादकपदाचे काम ढवळीकर यांच्यावर सोपविण्यात आले आहे. या वाहिनीचे कार्यकारी संपादक म्हणून सिंधुदुर्ग लाईव्हची स्थापना करणारे सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार सागर चव्हाण यांना नेमण्यात आले आहे. याआधी सागर चव्हाण यांनी या वाहिनीचे ब्युरो चीफ म्हणून काम बघितले. लोकमत तसेच इतर मराठी वर्तमानपत्रांतून त्यांनी काम केले आहे.        

हेही वाचा