राजीनामा मागे घेतल्यास नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव

महात्मे; मडगावात नव्या नगराध्यक्षासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी


12th November 2019, 05:38 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

मडगाव : नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यासाठी दहा दिवसांचा अवधी असतो. तत्पूर्वी त्यांनी राजीनामा मागे घेतल्यास त्यांच्या विरोधात निश्चितच अविश्वास ठराव दाखल केला जाईल, अशी माहिती नगरसेवक रुपेश महात्मे यांनी दिली.

जनमत कौलाचे जनक डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळा उभारण्याबाबतच्या घेतलेल्या मडगाव पालिकेच्या बैठकीतील इतिवृत्तात बदल केल्याचा ठपका ठेवत भाजप व कामत समर्थक नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत नगराध्यक्ष प्रभुदेसाई यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशारा दिला होता. याबाबत नगरसेवक महात्मे यांना विचारले त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. दरम्यान, मडगाव नगराध्यक्षपदासाठी पडद्याआड घडामोडी सुरू आहे.  

इतिवृत्तात बदल करण्यात आल्याचा आरोप भाजप समर्थक नगरसेवकांनी केल्यानंतर त्याला कामत समर्थक नगरसेवकांनीही साथ दिली. पालिकेवर गोवा फॉरवर्ड पुरस्कृत नगरसेवकांचा वरचष्मा होता. मात्र, आता कामत व भाजप नगरसेवक एकत्र होत त्यांनी नगराध्यक्षांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, इतिवृत्तात बदल करण्याच्या विरोधकांच्या मागणीपुढे न झुकता नगराध्यक्ष प्रभुदेसाई यांनी पदावरून पायउतार होणे पसंद केले. त्यांनी शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला आहे.

 नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पुढील नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पद एक व इच्छुक अनेक अशीच परिस्थिती सध्या असल्याने तसेच सत्ताधारी गटापेक्षा विरोधकांची संख्या सध्या जास्त असल्याने उमेदवारांतील चढाओढ वाढलेली दिसून येते. दरम्यान, नवीन नगराध्यक्षपदासाठी ‘फातोर्डा फॉरवर्ड’च्या नगरसेविका पूजा नाईक यांचे नाव सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा