सतीश धोंड यांच्याकडून कार्यकर्त्यांना कानमंत्र

भाजप संघटना बांधणीवर भर, निवडणूक तयारीचा घेतला आढावा


16th December 2018, 02:59 am

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : तीन वर्षांनंतर पुन्हा गोवा भाजपचे संघटन मंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर शनिवारपासून सतीश धोंड यांनी काम सुरू केले. भाजप कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी दोन तास चाललेल्या बैठकीत धोंड यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक बूथ संघटनांना नेमून दिलेल्या कामांचा आढावा घेतला.
पक्षाची संघटना मजबूत करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, संघटनेच्या आताच्या पदाधिकाऱ्यांची ओळखही त्यांनी करून घेतली. गेले काही दिवस कोअर समितीच्या व पक्षाच्या बैठकांना अनुपस्थित राहणारे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे या बैठकीला उपस्थित राहिले. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, दत्ता खोलकर, संजीव देसाई, सदानंद शेट तानावडे, काँग्रेस सोडून आलेले माजी आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे, सुलक्षणा सावंत, सुभाष फळदेसाई, प्रकाश वेळीप आदी अनेक पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
भाजपच्या प्रदेश संघटनेत काही बदल व्हावेत, असे आमच्यापैकी अनेकांना वाटते, त्यामुळे बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याविषयी बैठकीत काही चर्चा झाली नाही. शनिवारी झालेल्या बैठकीत फक्त पदाधिकाऱ्यांनी धोंड व प्रदेशाध्यक्ष यांचे ऐकले आहे, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बैठक संपल्यानंतर सांगितले.
शनिवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान सतीश धोंड भाजप कार्यालयात आले. भाजपचे अनेक युवा पदाधिकारी तेथे उपस्थित होते. धोंड आल्यानंतर त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. धोंड यांच्या समर्थनात घोषणा दिल्या. युवा कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले, परंतु धोंड यांनी शक्य तो पुष्पगुच्छ व पुष्पहार टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते थेट कार्यालयात गेले.
पक्षाचे काम राज्यात कसे चालले आहे, त्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. पक्षाला पुढील काही दिवसांत जे कार्यक्रम राबवायचे आहेत, त्याबाबत धोंड यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

भाजप पक्ष संघटनेत अनेक बदल शक्य
भाजप कार्यालयात येण्यापूर्वी सतीश धोंड यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यांच्या दोनापावल येथील निवासस्थानी भेट घेतली. तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना केमो दिल्यामुळे धोंड व मुख्यमंत्री यांची भेट फार वेळ चालली नाही. धोंड यांची नियुक्ती थेट दिल्लीतून झाल्यामुळे गोव्यात भाजप पक्ष संघटनेत पुढील काही महिन्यांत अनेक बदल होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-०-                  

हेही वाचा