डिचोलीतील खाण कामगार आज सभापतींना भेटणार


09th November 2018, 06:36 pm

प्रतिनिधी । गाेवन वार्ता

डिचोली : गोव्यातील खाणी चालू करण्यासाठी केंद्र सरकारला अध्यादेश काढता येणार नाही, असे वृत्त डिचोलीत पसरल्याने खाण कामगार आणि अवलंबित कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर डिचोली तालुक्यातील ४०० कामगार शुक्रवारी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहेत. ही माहिती खाण कामगारांनी दिली.

सरकारमधील ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ऑक्टोबरमध्ये खाण अवलंबितांना आनंदाची बातमी मिळणार असल्याचे सप्टेंबरमध्ये सांगितले होते. मात्र, ते आश्वासन हवेत विरले आहे. आनंदाची बातमी तर सोडाच, उलट अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांची दिल्लीवारी म्हणजे खाण अवलंबितांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करण्याचा प्रकार आहे, अशी टीका एका कामगाराने केली 

आहे. 

खाणींचा प्रश्न न सुटल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारचा पाठिंबा काढून घेतला जाईल, असा इशाराही मंत्री ढवळीकर यांनी दिला होता. त्यामुळे आता ते काय भूमिका घेणार, असा सवाल डिचोलीतील खाण कामगारांनी उपस्थित केला आहे. सध्या हा प्रश्न किचकट बनला असून, दिवसेंदिवस गुंता‌गुंतीचा होत चालला आहे. मंत्री, आमदार खोटी आश्वासने देत आहेत, असा अाराेपही कामगारांनी केला. या पार्श्वभूमीवर, सर्व मंत्री आणि आमदारांची भेट घेऊन जाब विचारला जाणार आहे. याची सुरुवात शुक्रवारी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्यापासून केली जाईल, अशी माहितीही एका कामगाराने दिली. 

हेही वाचा