मांद्रेतील बेकायदा बांधकाम बंद पाडले

उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई : सात कामगारांना अटक, सुटका


20th August 2018, 12:22 am

तिनिधी | गोवन वार्ता

पेडणे : मांद्रे पंचायत क्षेत्रातील नारोबा देवास्थानाजवळ सीआरझेड कायद्याचा भंग करून बेकायदा बांधकाम सुरू असल्याची तक्रार खुद्द मांद्रे पंचायतीने उपजिल्हाधिकारी पेडणे कार्यालयात दिली होती. याची दखल घेत उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर यांनी १८ ऑगस्ट रोजी हे बांधकाम बंद पाडले. यावेळी सात कामगारांना अटक करण्यात आली होती. सायंकाळी उशिरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

मांद्रे पंचायत क्षेत्रात श्री नारोबा देवस्थाननजीक कळंगुट येथील नानोस्कर नामक व्यक्ती कोणतेही परवाने नसताना हे बांधकाम करत असल्याची तक्रार मांद्रे पंचायतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात चार दिवसांपूर्वी दिली होती. १७ ऑगस्टला या बांधकामाची पाहणी करण्यात येणार होती. मात्र, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याने सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे सलग तीन दिवस सुटीचा लाभ उठवत हे बांधकाम पूर्ण करण्याचे ठेकेदाराने व संबधित बांधकाम व्यावसायिकाने ठरवले

होते.

उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर १८ रोजी मूळगावी केरी येथे जात असताना त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याचे दिसून आले. या बांधकामाविषयी तक्रार आलेली असल्याने त्यांनी पोलिस, पंचायत सचिव, तलाठी यांना बोलावून सुरू असलेले बेकायदा काम बंद पाडले.  

बांधकामाच्या ठिकाणी असलेले मशीन ताब्यात घेतले. याशिवाय सात कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. पेडणे पोलिसांनी भारतीय सहिता कलम १५१ खाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. उशिरा उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, त्यांना जामिनावर सोडण्यात आले.मांद्रे पंचायतीकडे या बांधकामाविषयी तोंडी तक्रारी आल्या होत्या. देवस्थानाजवळ बांधकाम केल्यास सांडपाणी सोडणार कुठे, देवस्थानच्या धार्मिक विधीलाही आडकाठी येण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.  

केवळ मांद्रे पंचायतीत नव्हे तर पूर्ण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात बेकायदा सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधकामे सुरू आहेत. यात बिगर गोमंतकीयांसह स्थानिक व्यक्तीही गुंतलेले आहेत. मांद्रे पंचायतीने ज्या देवस्थाना शेजारी बांधकाम सुरू असल्याची तक्रार दिलेली आहे, त्याच्याच बाजूला मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे हे सीआरझेड कायद्याचा भंग करूनच सुरू आहेत, त्याकडे पंचायतीने पूर्ण दुर्लक्ष केल्याने याच बांधकामाच्या विरोधात तक्रार का, असा सवाल उपस्थित होत आहे. सीआरझेड कायद्यानुसार भरती रेषेच्या आत कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करता येत नाही, असा नियम असून या नियमाचा भंग नेहमीच होत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा