गिरीश चोडणकर यांचे गोवा फॉरवर्डला आव्हान
प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : हल्लीच निर्माण केलेल्या ग्रेटर पणजी पीडीएसाठी गोवा फॉरवर्डने डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचा विषय विकला, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव गिरीश चोडणकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गोवा फॉरवर्ड आपल्या भूमिकेवर ठाम असल्यास पुतळ्याच्या विषयावरून त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्यावरून तियात्र सुरू आहे. जनमत कौल दिनी मडगावात आयोजित जाहीर सभेत सिक्वेरा याचा पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर आम्ही कोणत्याही स्तराला जाणार असल्याचे गोवा फॉरवर्डने म्हटले होते. आता मात्र ग्रेटर पणजी पीडीएसाठी पुतळ्याचा विषय भाजपला विकला आहे. जनतेला गोवा फॉरवर्डचे हेच का गोंयकारपण, याचे उत्तर पक्षाने द्यावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.
ग्रेटर पणजी पीडीए हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे. गोंयकारपणाच्या नावाखाली रियल इस्टेटला जमिनी विकण्याचा सरकारचा डाव आहे. त्याचे सूत्रधार मनोहर पर्रीकर आहेत. ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्षपद बाबूश मॉन्सेरात यांना दिले आहे. त्यांना यापूर्वी पर्रीकर यांनी घोटाळेबाज संबोधले होते. सर्व घोटाळेबाज भाजपछत्राखाली एक झाले आहेत, असेही गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
अापण भाटकारशाहीविरुद्ध जातीयवादी भाष्य केलेले नाही. भाजप माझ्याविरोधात हेमंत गोलतकर व दत्तप्रसाद नाईक यांना बोलायला लावते. ग्रेटर पणजी पीडीए करताना या बहुजन नेत्यांची पर्रीकर यांना आठवण झाली नाही. स्वाभिमान असेल तर गोलतकर, नाईक यांनी भाजपचा राजीनामा द्यावा.
— गिरीश चोडणकर,
सचिव, काँग्रेस