सद्गुरू : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा बहुतांश भाग तुम्ही नकळतपणे घडवलेला असतो. त्यातला केवळ थोडासा भाग कदाचित जाणीवपूर्वक घडवलेला असेल. जेव्हा तुम्ही एखादे व्यक्तिमत्त्व घडवता, तेव्हा एका अर्थी त्याचा अर्थ असा होतो की, सृष्टिकर्त्याने तुम्हाला घडवताना पुरेसे चांगले काम केलेले नाही, असे तुम्हाला वाटते. जर स्वतःमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या मते सृष्टिकर्त्याने तुमच्या बाबतीत निश्चितच कुठेतरी कसूर केली आहे. मग इतकी भव्य, इतकी अद्भुत निर्मिती पुरेशी चांगली नाही, असे तुम्हाला का वाटते? याचे कारण आहे आत्मसंरक्षणाची साधी प्रक्रिया. ही एक मूलभूत प्रक्रिया आहे, जी आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीत अंतर्भूत आहे. प्रत्येक कृमी, प्रत्येक कीटक, प्रत्येक प्राणी यांच्यामध्ये ती असते. माणसांमध्येही ती आहे. अडचण अशी आहे की, आत्मसंरक्षणाच्या या प्रक्रियेला कुठे मर्यादित ठेवावे, हे आपल्याला कळत नाही. ती प्रत्येक गोष्टीत पसरली आहे, आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचा एक छोटासा "मी" उभा केला आहे, जो सतत स्वतःचा बचाव करत राहतो.
लवचिक व्यक्तिमत्त्व
संरक्षणाची गरज असलेली एकमेव गोष्ट म्हणजे तुमचे भौतिक शरीर. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला संरक्षणाची गरज नाही. आपण रोज त्याची मोडतोड केली, तरी काही हरकत नसावी. व्यक्तिमत्त्वाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. इथे अस्तित्वात राहण्यासाठी, जगात वावरण्यासाठी, आपली कामे करण्यासाठी, व्यवहार सांभाळण्यासाठी तुम्हाला त्याची आवश्यकता असते. पण जर ते लवचिक असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थितीच्या गरजेनुसार योग्य ते व्यक्तिमत्त्व तुम्ही धारण करू शकाल; तसे असणे योग्यच ठरेल. पण सध्या ते एखाद्या शिळेसारखे आहे. ते सतत तुमच्यावर स्वार असते. त्याच्या चौकटीत न बसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमुळे ते तुम्हाला दुःख भोगायला लावते.
आता, ज्याला तुम्ही "मी" म्हणता, ते हे रेखाचित्र कोणी रेखाटले? ते निश्चितच तुम्हीच रेखाटले आहे, पण तुमच्या आजूबाजूच्या अनेक लोकांचा त्यावर प्रभाव पडला आहे. तुम्ही १५-१६ वर्षांचे असताना, एखादा आवडलेला चित्रपट पाहून नकळतपणे त्यातील नायकासारखे चालण्याचा प्रयत्न केला होता, हो ना? कधी कधी कदाचित तुम्ही ते जाणीवपूर्वकही केले असेल, पण बहुतेक वेळा ते नकळतच घडले. अशा प्रकारे इकडून-तिकडून गोळा केलेल्या अनेक तुकड्यांतून हे रेखाचित्र अस्तित्वात आले. तुमच्या आधाराशिवाय ते एक दिवसही टिकू शकत नाही. तुम्हाला सतत त्याला आधार द्यावा लागतो. एका अर्थी ध्यान म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला दिलेला आधार काढून घेणे. तसे करताच ते अचानक कोसळून पडते. मग केवळ अस्तित्व राहते; व्यक्तित्व नाही.
जीवनाच्या रूपाने तुम्हाला एक असीम शक्यता बहाल करण्यात आली होती. पण स्वतःला सीमित करून या लहानशा शक्यतेत कोंडून घेऊन तुम्ही एक प्रकारचा अत्याचारच केला आहे.
आध्यात्मिक होण्याची ओढ
जर तुम्ही मानवी अनुभवाकडे पाहिले, तर मनुष्यांना जे सर्व काही सध्या माहित आहे ते त्यांना पाहता येते, ऐकू येते, गंध, चव आणि स्पर्श यांतून बोध होतो म्हणूनच. जे तुम्ही पाच ज्ञानेंद्रियांतून जमा करता, ते भौतिकच असणार. म्हणूनच तुमचा जीवनाचा सर्व अनुभव सध्या भौतिकापर्यंतच सीमित आहे. जर तुम्ही स्वतःचे उदाहरण घेतले, तर तुमच्यात जे भौतिक आहे ते म्हणजे तुमचे शरीर - जे की मुळात तुम्ही बाहेरून गोळा करून जमा केलेले आहे. जे तुम्ही गोळा करता, ते तुमचे असू शकते, पण कधीच ‘तुम्ही’ असू शकत नाही. ज्याला तुम्ही शरीर म्हणता किंवा ज्याला तुम्ही सध्या ‘मी’ म्हणून अनुभवता, ते तुम्ही नाश्ता, जेवण, इत्यादी म्हणून खाल्लेल्या अन्नाचा संचय आहे. तो या धरतीचाच एक तुकडा आहे.
अगदी तुमचे मन आणि तुमच्या भावना सुद्धा भौतिक आहेत. आज, तुमचा विचार आणि तुमच्या भावना यंत्रांच्या साह्याने मोजता येऊ शकतात. तुमचे मन, हे माहिती आणि संस्कारांचा एक संचय आहे. जर तुम्ही एवढे सगळे जमा केले असेल, तर इथे त्याहून आणखी काहीतरी मूलभूत असले पाहिजे. ते जे काही आहे, ते भौतिकाच्या पलीकडचे आहे.
जर तुमच्या जीवनाच्या अनुभवाने भौतिकाच्या सीमा ओलांडल्या, तर आपण म्हणतो की तुम्ही आध्यात्मिक आहात. अध्यात्म म्हणजे तुम्ही कशावर तरी विश्वास ठेवायला हवा असे नाही, किंवा तुम्ही कुठले तरी तत्त्वज्ञान किंवा आणखी काही धरून चालावे असे नाही. केवळ जर तुम्ही असे काहीतरी अनुभवले, जे भौतिकाच्या पलीकडचे आहे, तरच खऱ्या अर्थाने तुम्ही सध्या जे कुणी आहात त्याच्या सीमांच्या पलीकडे जाऊ शकता.
प्रत्येक मनुष्याला तो सध्या जे कुणी आहे त्याहून आणखी काहीतरी होण्याची ओढ असते. जरी तुम्ही या धरतीचे राजा झालात, तरी मानवी स्वभावच असा आहे, की तुम्ही ताऱ्यांकडे पाहू लागाल. तुमच्या आत असे काहीतरी आहे ज्याला सीमा आवडत नाहीत. ज्या क्षणी तुम्हाला सीमा जाणवते, तेव्हा ती सीमा कितीही मोठी असली, तरी तुम्हाला तिच्या पलीकडे जावेसे वाटेल. म्हणून तुमच्या आत असे काहीतरी आहे जे सतत असीमिताचा शोध घेत असते, ज्याला सतत आध्यात्मिक होण्याची ओढ असते. प्रत्येक मनुष्याला आध्यात्मिक होण्याची ओढ असते. तुमच्याकडे पर्याय एवढाच आहे, की ही ओढ जागरूक पद्धतीने अभिव्यक्त होते की अजगारूक पद्धतीने.



