ज्येष्ठ नागरिक - संस्कृतीची खरी ओळख

ज्येष्ठ नागरिक हे समाजावरील ओझे नसून अनुभवाची अमूल्य संपत्ती आहेत. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी सुरक्षितता, सन्मान आणि आपुलकीचा प्रकाश देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर आपल्या संस्कृतीची खरी कसोटी आहे.

Story: विचारचक्र |
12 hours ago
ज्येष्ठ नागरिक - संस्कृतीची खरी ओळख

एकेकाळी भारतातील कुटुंबव्यवस्था मोठ्या संयुक्त कुटुंबाभोवती केंद्रित होती. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला कुटुंबाचा आधारस्तंभ मानले जात असे. त्यांचा अनुभव, मार्गदर्शन आणि निर्णयक्षमता यांना विशेष महत्त्व होते.

आज मात्र शहरीकरण, नोकरी-व्यवसायासाठी होणारे स्थलांतर आणि बदलती जीवनशैली यांमुळे संयुक्त कुटुंबव्यवस्था झपाट्याने बदलत आहे. मुले शिक्षण आणि नोकरीसाठी दुसऱ्या शहरात किंवा परदेशात स्थायिक होतात आणि अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या मूळ घरी किंवा स्वतंत्र घरात एकटे राहतात.

माणसाचे आयुर्मान वाढत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, आरोग्याविषयी वाढलेली जागरूकता, सुधारलेले जीवनमान आणि विविध आजारांवरील उपचारपद्धती यांमुळे जगभरातील लोकांचे सरासरी आयुर्मान वाढत आहे. मात्र, आयुर्मान वाढण्याबरोबरच समाजासमोर एक नवे आव्हान उभे राहत आहे, ते म्हणजे वाढती वृद्ध लोकसंख्या. 

केवळ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे योग्य  नसून, वाढत्या वृद्ध लोकसंख्येकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. निवृत्तीनंतर नियमित पगार मिळणे बंद होते. पेन्शन, बचत किंवा मुलांवरील आर्थिक अवलंबित्व यांवर आयुष्याचा पुढील टप्पा अवलंबून राहतो. वाढती महागाई आणि आरोग्यावरील खर्च यामुळे निवृत्तीचे नियोजन अधिक महत्त्वाचे झाले आहे. 

ज्येष्ठ नागरिकांनी आर्थिकदृष्ट्या शक्य तितके स्वावलंबी राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, कुटुंबानेही त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेकडे संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे.

वृद्धत्व ही समस्या नाही; मात्र वृद्धत्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही मोठी समस्या ठरू शकते. वय वाढल्यानंतर व्यक्तीची शारीरिक क्षमता कमी होऊ शकते; परंतु तिचा अनुभव, ज्ञान आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमी होत नाही. उलट, अनेक ज्येष्ठ व्यक्ती समाजासाठी मोठी संपत्ती ठरू शकतात. शिक्षण, प्रशासन, उद्योग, कला, साहित्य आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत आयुष्यभर काम केलेल्या व्यक्तींचा अनुभव पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. 

ज्येष्ठ नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याऐवजी त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेणे गरजेचे आहे. स्थानिक संस्था, गृहनिर्माण सोसायट्या, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी ज्येष्ठांसाठी वाचनालये, संवादगट, आरोग्य शिबिरे, योगवर्ग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कौशल्यवाटपाचे उपक्रम आयोजित केले, तर त्यांच्या जीवनात नव्या उत्साहाची भर पडू शकते. 

ज्येष्ठांकडे केवळ मदतीची गरज असलेले नागरिक म्हणून पाहण्याऐवजी समाजाला योगदान देऊ शकणारे अनुभवी नागरिक म्हणून पाहिले पाहिजे.

आज अनेक ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक जाणवणारी समस्या म्हणजे एकटेपणा. घरात माणसे असली, तरी संवादाचा अभाव असेल तर मानसिक एकटेपणा अधिक तीव्र होतो. मुले आपापल्या कामात व्यस्त असतात, नातवंडे मोबाईल आणि डिजिटल जगात रमलेली असतात, तर ज्येष्ठ व्यक्ती अनेकदा आपल्या आठवणींमध्ये रमलेल्या असतात. अशी परिस्थिती अनेक घरांमध्ये दिसून येते. त्यामुळे ज्येष्ठांना केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर वेळ, संवाद आणि भावनिक आधाराचीही गरज असते. वाढत्या वयाबरोबर आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. नियमित तपासणी, औषधोपचार, रुग्णालयात जाणे आणि उपचारांचा खर्च ही अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी आव्हाने असतात. त्यामुळे त्यांच्या घराजवळ प्राथमिक आरोग्य तपासणी केंद्रे, नियमित मोफत किंवा सवलतीच्या दरात आरोग्य तपासण्या, औषधोपचारासाठी सुलभ सुविधा आणि गरजेनुसार घरपोच आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र आरोग्य कार्यक्रम आखला, तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

आजच्या डिजिटल युगात डिजिटल साक्षरता हीदेखील ज्येष्ठांच्या स्वावलंबनाची गरज बनली आहे. ऑनलाइन बँकिंग, यूपीआय, सरकारी सेवा किंवा वैद्यकीय भेटीची वेळ निश्चित करणे यांसारख्या सुविधा वापरताना अनेक ज्येष्ठांना अडचणी येतात. त्यामुळे प्रत्येक परिसरात ज्येष्ठांसाठी छोटे डिजिटल प्रशिक्षणवर्ग आयोजित करता येतील. त्याचबरोबर, ‘ओटीपी कोणालाही सांगू नका’, ‘अनोळखी लिंकवर क्लिक करू नका’ आणि ‘संशयास्पद फोन आल्यास त्वरित कुटुंबीयांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधा’, अशा सूचना देणाऱ्या सायबर सुरक्षा प्रशिक्षणाचीही गरज आहे. ज्येष्ठ नागरिक हे समाजावरील ओझे नसून अनुभवाची अमूल्य संपत्ती आहेत. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी सुरक्षितता, सन्मान आणि आपुलकीचा प्रकाश देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर आपल्या संस्कृतीची खरी कसोटी आहे.

- दत्तप्रसाद शिरोडकर

९७०२६४४९६९