गोव्याच्या क्रीडा क्षेत्रात गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदल होत आहेत. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत गोव्यातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. अनेक क्रीडा प्रकारांत गोव्यातील खेळाडू पारंगत आहेत, याची प्रिचती वेगवेगळ्या स्पर्धांमधून येते. क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, जलतरण, जिम्नॅस्टिक्समध्ये गोव्यातील खेळाडू पुढे येत आहेत. त्याशिवाय व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो यासारख्या खेळांमध्ये गोव्यातील खेळाडू मागे नाहीत. गोव्याचे क्रीडा क्षेत्र विकसित होत असताना अचानक स्थानिक फुटबॉलमध्ये मॅच फिक्सिंगचा मुद्दा समोर येतो. त्यात चौकशीअंती १३ खेळाडू आणि एका माजी क्लब अधिकाऱ्याचे निलंबन होते. हा धक्कादायक प्रकार गोव्यातील फुटबॉल क्षेत्रालाच वादात टाकणारा आहे. गोव्यातील स्थानिक फुटबॉल स्पर्धांमध्ये मॅच फिक्सिंग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते, अशी चर्चा होती. अनेक खेळाडूंनी मॅचफिक्सिंगमध्ये सहभाग घेऊन आपली आर्थिक स्थितीही सुधारली आहे. मात्र याविषयी पुरावे नव्हते. मध्यंतरी काही वेळा कारवाई झाली, पण यावेळी तब्बल १४ खेळाडूंवर या प्रकरणी कारवाई झाल्यामुळे देशाच्या फुटबॉल क्षेत्रात हा विषय चर्चेला आला आहे.
याविषयीची तक्रार नऊ महिन्यांपूर्वी शापोरा युवक संघाचे अध्यक्ष प्रवीण दाभोलकर यांनी केली होती. त्यावर गोवा फुटबॉल संघटनेने चौकशी केली. माजी पोलीस अधिकारी संदेश चोडणकर यांना ‘जीएफए’ने याप्रकरणी चौकशी करण्याचे काम दिले होते. या चौकशीत ज्या खेळाडूंना या प्रकरणात निलंबित केले आहे, त्यांनी मॅच फिक्सिंगमध्ये भाग घेतला आणि जाणूनबुजून खराब कामगिरी केल्याचा ठपका ठेवला आहे. दाभोलकर यांना आपल्याच संघातील खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केली, तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्याने या प्रकरणाचा सखोल तपास केला, त्यात १४ खेळाडू दोषी आढळले. हे प्रकरण पाहिले तर एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखे वाटते. पण लीगच्या सामन्यांमध्ये किंवा अन्य स्पर्धांमध्ये गोव्यातील फुटबॉलपटू मॅच फिक्सिंग करतात, हे सर्वांनाच माहीत होते. पण अशा खेळाडूंना अद्दल घडविण्याची गरज आहे. फुटबॉलसारख्या प्रचंड मेहनतीच्या क्रीडा प्रकारात अशा प्रकारचा गैरप्रकार होऊ नये. ज्यांनी हा खेळ बदनाम करण्याचे काम केले आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणात सीबीआयने चौकशी करावी, असे फुटबॉल संघटनेला वाटत असले, तरी हे प्रकरण सीबीआय घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गोवा पोलिसांना या प्रकरणात चौकशी करण्याची विनंती करायला हवी. या घटनेने स्थानिक फुटबॉल व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. फुटबॉलसारख्या कौशल्याच्या खेळातही आधीच निकाल ठरविण्यात येत असतील आणि तेही स्थानिक पातळीवर तर हे प्रकार फारच गंभीर आहेत. हेच खेळाडू उद्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळू लागले, तर फुटबॉलचे क्षेत्रच विकून टाकतील. फुटबॉलपटूंवर कारवाई झाली असली, तरी या प्रकरणात कोण सहभागी आहेत, त्यांची चौकशी होऊन त्यांची नावे समोर यायला हवी आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. कारण खेळाडूंनी मॅच फिक्सिंग करून आर्थिक लाभ घेतला असेल, पण त्यांना हे करण्यासाठी भाग पाडणारे लोक कोण त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.
गोव्याचा राज्य खेळ म्हणून फुटबॉलकडे पाहिले जाते. अनेक वर्षांपासून गोव्यात फुटबॉलचा खेळ रुजलेला आहे. सरकारनेही त्याच्या विकासासाठी महामंडळ तयार केले आहे. मोठमोठे फुटबॉल संघ जे देशातील स्पर्धांमध्ये आघाडीवर असतात, ते गोव्यात आहेत. त्यामुळे सर्वांच्या आवडीच्या फुटबॉल खेळाची बदनामी होऊ नये, पण या खेळाला लागलेली ही मॅच फिक्सिंगची कीडही वेळीच नष्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळेच गोवा फुटबॉल संघटनेने या मॅच फिक्सिंगच्या मुळाशी जायला हवे. त्यासाठी सीबीआयने प्रकरण स्वीकारले नाही, तर गोवा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्या लोकांनी फुटबॉलला बदनाम करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून चालवले आहे, त्यांच्यावर कारवाई होईल यासाठी प्रयत्न करायला हवे. यात गुंतलेल्या प्रत्येकावर कारवाई करून फुटबॉलमध्ये अशा गोष्टींना थारा नाही, हे दाखवून देणे गरजेचे आहे. तरच नवे खेळाडू फुटबॉलकडे चांगला खेळ म्हणून पाहू शकतील.


