मडगाव शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या निश्चित करण्यासाठी मडगाव नगरपालिका प्रशासनाने श्वान गणना सुरू केली आहे. ही मोहीम कार्यालयीन वेळेतच राबविण्याच्या निर्णयामुळे तिच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कमी कर्मचार्यांच्या संख्येमुळे आणखी अडचणी निर्माण होत असून नागरिकांचे सहकार्य मिळण्यासाठी आणखी प्रयत्नांनी गरज आहे.
मडगाव पालिका क्षेत्रातील २५ प्रभागांमध्ये गणना करण्यासाठी केवळ १४ कर्मचार्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. श्वान गणनेनंतर गोळा केलेली माहिती भारत पशुधन संकेतस्थळावर नोंदविण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दिवसा उन्हाचा तडाखा वाढत असल्याने भटके कुत्रे वाहनांच्या खाली, बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमध्ये तसेच झाडांच्या सावलीत आश्रय घेतात. त्यामुळे कार्यालयीन वेळेत त्यांची प्रत्यक्ष मोजणी करणे कर्मचार्यांसाठी कठीण ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. याउलट, सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतर कुत्रे मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. त्यामुळे कुत्र्यांची संख्या मोजण्यासाठी संध्याकाळची वेळ अधिक उपयुक्त ठरू शकते, असा मुद्दा स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मडगाव शहरातील सर्व २५ प्रभागांमध्ये श्वान गणना करण्यासाठी केवळ १४ कर्मचार्यांचे पथक कार्यरत आहे. त्यामुळे मर्यादित मनुष्यबळात प्रत्येक प्रभागातील गल्लीबोळ, बाजारपेठा, निवासी भाग आणि कुत्र्यांचे संभाव्य आश्रयस्थान यांचा सर्वेक्षण करणे हे मोठे आव्हान ठरत आहे.
स्थानिक श्वान खाद्यदाते आणि प्राणीप्रेमींच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक परिसरातील भटक्या कुत्र्यांची ठिकाणे आणि त्यांच्या हालचालींबाबत स्थानिक नागरिकांना चांगली माहिती असते. त्यामुळे गणना अधिक अचूक करण्यासाठी स्थानिक नागरिक, श्वान खाद्यदाते आणि प्राणी कल्याण संस्थांना प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
मडगावमधील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी श्वान निर्बीजीकरणाचा कार्यक्रमही नियमित आणि प्रभावीपणे राबविण्याची मागणी होत आहे. निधी, मनुष्यबळ, श्वान पकडण्यासाठी आवश्यक साधने आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर परिणाम झाल्याचे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे. सोनसडो येथील श्वान निवार्यातील सुविधा वाढविणे, आवश्यक पिंजर्यांची उपलब्धता करणे आणि कुत्र्यांना पकडून आणण्यासाठी वाहने उपलब्ध करणे तसेच निर्बीजीकरणासाठी
पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. केवळ श्वानगणनेकडे लक्ष न देता कुत्र्यांच्या सर्वसामान्य जनतेला होणार्या त्रासाकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. त्यावर गांभीर्याने विचार करत प्रत्येक समस्येवर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. श्वान गणना अधिक परिणामकारक करण्यासाठी कार्यालयीन वेळेबरोबरच संध्याकाळच्या वेळी विशेष पथके तैनात करावीत, अशी मागणी पुढे येत आहे. स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींच्या सहकार्याने कुत्र्यांची ठिकाणे निश्चित करून त्यानुसार गणना केल्यास आकडेवारी अधिक अचूक मिळू शकते.


