पर्वरीचा उड्डाणपूल बऱ्याच वर्षांपासून चर्चेत आहे. आधी तिथल्या रस्त्याच्या विस्ताराला विरोध झाला. त्यानंतर फ्लायओव्हरची कल्पना आली. काम सुरू झाल्यानंतर मार्गातील देवस्थानांचे स्थलांतर करण्याची वेळ आल्यामुळे तिथेही वाद निर्माण झाला होता. अखेर २०२४ मध्ये काम सुरू झाल्यानंतर ते आता पूर्ण होऊन हा फ्लायओव्हर वाहनांसाठी खुला झाला. एप्रिल २०२६ ची मुदत होती; पण चार महिन्यांचा कालावधी जास्त लागला. अर्थात कामात आलेल्या अडथळ्यांमुळे उड्डाणपूल चर्चेतच राहिला. म्हापसा–पणजी मार्गावरील वाहतुकीलाही या काळात फार अडथळे आले. तरीही पुलाचे काम अखंडितपणे सुरू होते. काम पूर्ण होईपर्यंत त्यावरून दुचाकींना सोडण्यात येणार नाही, असे वगैरे कधीच नियोजनात नव्हते. पणजीच्या ‘अटल सेतू’ पुलावरून जाताना वाऱ्यामुळे हेलकावे खावे लागत असल्यामुळे तिथे अपघात होऊ शकतात म्हणून दुचाकींना पूल सुरू झाल्यानंतर प्रवेश बंद करण्यात आला होता. पर्वरीचा फ्लायओव्हर त्याहीपेक्षा लांबीने मोठा आहे. अटल सेतू ३.२ किलोमीटर, तर पर्वरीचा फ्लायओव्हर ५.१५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यामुळे तिथे दुचाकींना सोडणे हे जास्त धोकादायक ठरू शकते. दुचाकींमुळे चारचाकींना अडथळे येऊ शकतात आणि अपघात होऊ शकतात हे लक्षात आल्यामुळे पूल वाहतुकीला खुला केल्यानंतर झालेल्या भीषण अपघातामुळे दुचाकींना प्रवेश बंद करण्यात आला. या फ्लायओव्हरवरून पणजीत येणाऱ्यांना ‘काखेत कळसा आणि मेरशीला वळसा’ असा प्रकार झाला आहे. मेरशी जंक्शनकडे उतरल्यानंतर तिथल्या वाहतूक कोंडीत अडकून वाट काढत वाहनांना पुन्हा पणजीत यावे लागते. त्यापेक्षा गिरीतून जुना रस्ता धरला तर मांडवी पुलावरून पणजीत जाणे सोपे असे वाहन चालकांना वाटू लागले आहे. कारण मॅजेस्टीकजवळ खाली उतरून पणजीचा मार्ग धरणे किंवा म्हापसाकडे जाताना मार्ग बदलणे कठीण झाल्यामुळे वाहन चालकांमध्येच संभ्रम आहे. गोव्यातील वाहतुकीचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी सामंजस्य करार केलेल्या ‘आयआयएम नागपूर’ या संस्थेला पर्वरीच्या फ्लायओव्हरचाही अभ्यास करण्याचे काम आता देण्यात येणार असल्यामुळे अद्याप अडथळ्यांची मालिका संपलेली नाही.
या उड्डाणपुलाकडे वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून मोठ्या अपेक्षेने सर्वांनी पाहिले. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, वाहतूक सुरळीत होईल आणि पर्वरी परिसराला दिलासा मिळेल, अशी आशा होती. पण रोज काहीतरी अडथळे येतच आहेत. गंभीर अपघातामुळे पर्वरीतील फ्लायओव्हरच्या संरचनेबाबत प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा फ्लायओव्हर सुरू करण्यापूर्वीच त्यावरील वाहतुकीचे संभाव्य धोके, वाहनांचा वेग, प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि विविध प्रकारच्या वाहनांची सुरक्षित वाहतूक यांचा सखोल विचार झाला होता का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दुचाकींना बंदी घातलीच; पण त्या उड्डाणपुलावरून पणजीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना पर्वरीत दुसऱ्या मार्गावर जाता येत नाही. थेट अटल सेतूवर येऊन वाहनांना मेरशी जंक्शनवर येऊन तिथल्या वाहतूक कोंडीत अडकवून घ्यावे लागते. उड्डाणपूल उभारला तरी वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष दिले गेले नव्हते, असेच यातून दिसते. आता स्थानिक आमदार आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही सरकारलाच ‘घरचा अहेर’ दिला आहे. आपल्या मतदारसंघातील लोकांना या पुलाचा लाभ मिळावा, असे त्यांना वाटते. पुलाच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा पूल कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत आहे. उड्डाणपूल उभारून वाहतूक कोंडी सोडवण्याच्या नादात दुसऱ्या ठिकाणी कोंडी होत असेल तर या प्रकल्पाचा हेतू साध्य होत आहे, असे म्हणता येणार नाही. आता सरकार या पुलाबाबात ‘आयआयएम नागपूर’ या संस्थेला अभ्यास करायला सांगण्याच्या विचारात आहे. या संस्थेला खरोखरच काम दिले तर त्यांच्या अहवालानंतरच काही बदल शक्य आहेत. त्यामुळे उड्डाणपूल उभारला पण आता गोंधळ फार अशी स्थिती आहे. अशाच प्रकारे बांबोळी - आगशी या उड्डाणपुलाच्या प्रारंभी अनेक अपघात होत होते. तसाच अनुभव धारगळ परिसरातही येत आहे. अटल सेतूवरही डांबरीकरणामुळे अडथळे निर्माण झाले होते. या साऱ्या गोष्टी पाहिल्या तर प्रकल्प उभारले जात आहेत; पण त्यांचा परिपूर्ण अभ्यास होत नाही, असेच म्हणावे लागेल. प्रकल्प उभारताना त्याची सुरक्षितता, उपयुक्तता आणि भविष्यातील परिणाम तपासणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या पैशांतून उभारलेल्या प्रकल्पाचा लाभ सर्व घटकांना सुरक्षितपणे मिळाला पाहिजे. पर्वरीतील उड्डाणपुलाचे पाय वेगवेगळ्या वादामुळे पाळण्यात दिसत होते. आता अभ्यास करून पुढे काही बदल करणे म्हणजे आव्हानाची परीक्षाच आहे.


