कुंपणच जर शेत खाऊ लागले तर ?

Story: राज्यरंग - उत्तर प्रदेश |
17th September, 09:07 pm
कुंपणच जर शेत खाऊ लागले तर ?

बनावट भारतीय चलनाद्वारे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याची पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राची चाल अनेकवेळा उघडकीस आली आहे. तपास यंत्रणांनी यावर अनेक वेळा प्रकाश टाकला आहे. यातील मुख्य धोक्याची बाब म्हणजे देशातील घरभेद्यांची या बनावट भारतीय चलनाची निर्मिती करणाऱ्या नेटवर्कना मिळणारी साथ. त्यातीलच आणखी गंभीर बाब म्हणजे तिजोरीची चावी ज्यांच्या हातात असते; अशा काही भ्रष्टाचारी, देशद्रोही बँक अधिकाऱ्यांचा त्यात दिसून येणारा सहभाग. ‘कुंपणच शेत खाऊ लागले तर...’ विश्वास कुणावर ठेवायचा असाच एकूण हा प्रकार आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये बनावट भारतीय चलनाशी संबंधित सलग दोन प्रकरणांनी भारतीय चलनाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. सहारनपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) चलन साठवण केंद्रात (करन्सी चेस्ट) नुकत्याच तब्बल १७.२९ कोटी रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याच्या प्रकरणाचा सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. या प्रकरणात बँकेतील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

‘एनआयए’ने या प्रकरणातील मुख्य संशयित आणि पीएनबीच्या करन्सी चेस्टचा व्यवस्थापक अमित कुमार याला या महिन्याच्या ७ सप्टेंबरला चंदीगड येथून अटक करण्यात आली. बँकेच्या प्राथमिक चौकशीत तीन कर्मचाऱ्यांचा सहभाग समोर आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. बनावट नोटा करन्सी चेस्टपर्यंत कशा पोहोचल्या आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सध्या ‘एनआयए’कडून सुरू आहे.

याच सहारनपूरमध्ये २० रुपयांच्या बनावट नाण्यांचे सुमारे ७० कोटी रुपयांचे नेटवर्क उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबपर्यंत या नेटवर्कची व्याप्ती आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी ६,४०० बनावट नाणी जप्त करून पाच जणांना अटक केली. नाणी बनवण्यासाठी लागणारी यंत्रणाही जप्त केली आहे. तपासानुसार या टोळीची उत्पादन क्षमता दररोज हजारो नाणी तयार करण्याइतकी आहे आणि ती बाजारात खरी नाणी असल्याप्रमाणे चलनात आणली जात होती. या प्रकरणाचा सविस्तर तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे.

रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये बँकिंग व्यवस्थेत २,१७,३९६ बनावट नोटा आढळल्या. त्यापूर्वी २०२३-२४ मध्ये २,२२,६३९ आणि २०२२-२३ मध्ये २,२५,७६९ नोटा आढळल्या होत्या. मात्र, या आकडेवारीत पोलीस व इतर तपास यंत्रणांनी स्वतंत्रपणे जप्त केलेल्या नोटांचा समावेश नाही.

‘एनसीआरबी’च्या २०२३ च्या आकडेवारीनुसार, विविध तपास यंत्रणांनी देशभरात ३,५१,६५६ बनावट नोटा, एकूण १६.८६ कोटी रुपयांच्या दर्शनी मूल्यासह, जप्त केल्या होत्या. एकूण या आकडेवारीवरून देशातील बनावट भारतीय चलनाची व्याप्ती लक्षात येते. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भक्कम सुरक्षेसाठी बनावट चलनाचे नेटवर्क उद्धवस्त करण्याचे, यात गुंतलेल्या घरभेद्यांना शोधून काढून कठोर ‌ शिक्षा सुनावण्याचे आव्हान तपास यंत्रणांपुढे आहे.