गणेशोत्सवाच्या तोंडावर सलग ५ दिवस बँका बंद

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या १ दिवसीय देशव्यापी संपामुळे, तसेच शनिवार-रविवारच्या सुट्ट्या आणि गणेशोत्सवामुळे गोव्यातील बँकिंग सेवा सलग पाच दिवस बंद राहणार आहेत. सर्व बँकांचे कामकाज बुधवार, १६ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होईल.


1 hours ago
गणेशोत्सवाच्या तोंडावर सलग ५ दिवस बँका बंद

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या १ दिवसीय देशव्यापी संपामुळे, तसेच शनिवार-रविवारच्या सुट्ट्या आणि गणेशोत्सवामुळे गोव्यातील बँकिंग सेवा सलग पाच दिवस बंद राहणार आहेत. सर्व बँकांचे कामकाज बुधवार, १६ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होईल.
११ सप्टेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज बंद राहील. यानंतर १२ सप्टेंबर (दुसरा शनिवार), १३ सप्टेंबर (रविवार), १४ सप्टेंबर (गणेश चतुर्थी) आणि १५ सप्टेंबर (गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस) अशा सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यूएफबीयू (गोवा राज्य)चे निमंत्रक संतोष हळदणकर यांनी पत्रकाद्वारे सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी आधीच आवश्यक पैसे काढून ठेवावेत, असे आवाहन केले आहे.
सदर कालावधीत यूपीआय, इंटरनेट बँकिंग आणि डिजिटल सेवा सुरू राहतील, मात्र बँकांच्या शाखांमधील थेट व्यवहार बंद राहतील. सलग सुट्ट्यांमुळे स्थानिक एटीएममधील रोकड संपण्याची शक्यता आहे. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल युनियनने दिलगिरी व्यक्त केली असून प्रलंबित मागण्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.            

हेही वाचा
सर्व पहा