हे रेडिओ त्या संस्थेचे खरे कणा असतात. जरी लोक त्यांच्या मागे त्यांना 'काड्या करणारे' किंवा 'बातम्या देणारे' म्हणत असले, तरी त्यांच्याशिवाय संस्थेचे पान हलत नाही.

अापल्या देशातील कोणतीही संस्था असो; बँक, शासकीय कार्यालय, खाजगी कंपनी किंवा इतर शैक्षणिक संस्था तिथे काही गोष्टी हमखास आढळतात: नियमावली, फाईल्स, परिपत्रके, वेबसाईट, पोर्टल, लॉग-इन आयडी, पासवर्ड... आणि या सगळ्यांपेक्षा जास्त प्रभावी, जास्त वेगवान आणि जास्त विश्वासार्ह एक व्यवस्था, संस्थेतील ‘रेडिओ’. हा रेडिओ इतकी वर्षे संस्थेत असतो की इमारतीचा पाया रचताना कुठली वीट कच्ची होती, कोणत्या साहेबांनी उद्घाटनावेळी काय भाषण केले होते, यापासून ते आज साहेबांनी नाश्त्यामध्ये पातळ भाजी खाल्लीय की बटाटवडा ही सगळी माहिती त्याच्याकडे अपडेटेड असते.
हा रेडिओ सहसा ‘इतर वर्गातील कर्मचारी’ या सन्माननीय गटात मोडतो. झाडू मारणारा असो, शिपाई असो, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टोअरकीपर किंवा ‘सर्व कामात पुढे’ असणारा एम.टी.एस. असो पण तो साधा कर्मचारी नसतो. अधिकृत कामाच्या यादीत त्याचे काम मर्यादित असते; पण अनधिकृत जबाबदाऱ्या खूप असतात. कुठली फाईल कुठल्या कपाटात आहे, कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलावर कोणती नोंद वर्षानुवर्षे धूळ खात पडली आहे, साहेब आज हसतमुख आहेत की “उद्या या” मोडमध्येही सगळी माहिती रेडिओकडे असते.
मोठे अधिकारी जे काम आठवडाभर करू शकत नाहीत, ते रेडिओ एका फोनवर करून दाखवतो. कारण त्याची ओळख वरपासून खालपर्यंत असते. त्याच्याकडे अनुभवाचा खजिना असतो. तो काल-परवा आलेला नसतो; त्याने त्या संस्थेत कधी परीक्षा विभाग, कधी लेखा, कधी कार्यालय, कधी प्रयोगशाळा, कधी बँक मॅनेजरसोबत सगळीकडे काम केलेले असते. त्यामुळे तो सर्वांना ओळखतो आणि सर्वजण त्याला ओळखतात. या रेडिओला हमखास लोक, विद्यार्थी प्रेमाने ‘काका’ किंवा ‘भाऊ’ म्हणतात. बाई असेल तर ‘काकी’!
हा माणूस म्हणजे संस्थेचा चालता-बोलता डेटाबेस आणि विकिपीडिया. बॉस कदाचित विसरतील की फाईल नेमकी कुठे ठेवली आहे, पण रेडिओ डोळे मिटून सांगेल, “अहो साहेब, ती पिवळ्या रंगाची फाईल, ज्यावर चहाचा डाग आहे, ती दुसऱ्या कपाटाच्या मागे, उंदीर जिथे बसतो त्याच्या बाजूला आहे.” ही काही साधी स्मरणशक्ती नाही; ही दिव्यदृष्टी असते. सीबीआई किंवा रॉ-सारख्या गुप्तचर संस्थांनी या रेडिओकडून प्रशिक्षण घेतले तर त्यांचे अनेक प्रश्न सुटतील.
रेडिओकडे एक अदृश्य रडार असते. कुणाचा मूड खराब आहे, कुणाचं डोकं गरम आहे, कोण आज पत्नीशी भांडून आलाय, कोण वेगळा राहतो हे त्याला चेहऱ्यावरून, चालण्यावरून व विशेष म्हणजे डबा आणला की नाही यावरून समजते. डब्यात काय आणलय, जर मासे आणलेत तर ते कुठल्या बाजारात किती दराने घेतले आहेत ते सुद्धा त्याला माहित असते. प्रत्येक कर्मचाऱ्याचा गाडीचा नंबर, ती हप्त्यावर घेतली आहे की सासरवाडीकडून मिळाली आहे हेही त्याला तोंडपाठ असते. “आज मॅडमने नवीन साडी नेसली आहे, नक्कीच आज साहेबांचा वाढदिवस असणार!” असे त्याचे लॉजिक असते.
कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर, पोर्टलवर किंवा नोटीस बोर्डवर माहिती झळकण्याआधीच ती रेडिओकडे पोहोचलेली असते. “उद्या सुट्टी आहे”, “आज साहेब बाहेर गेलेत”, “पगार आला”, “प्रमोशनची फाईल फिरतेय” ही सगळी माहिती आधी या रेडिओकडून ऐकायला मिळते. नोटीस बोर्ड म्हणजे केवळ औपचारिकता; खरा प्रसारमाध्यम म्हणजे हा रेडिओ.
हा रेडिओ फक्त अधिकृत बातम्यांपुरता मर्यादित नसतो. त्याला सर्वांत जास्त आवडणारी फ्रिक्वेन्सी म्हणजे ‘प्रेम एफ.एम.’ त्यावर 'प्रेमप्रसारण' हा त्याचा सर्वांत लोकप्रिय आणि टी.आर.पी. वाढवणारा कार्यक्रम. कुठल्या कर्मचाऱ्याचे कुणाबरोबर चक्कर आहे, कुणाचे कुणाशी सूत जुळले आहे, कुणाचा डोळा कुणावर आहे, हे तो बोलण्यावरून, हसण्यावरून, एकत्र कँटीनमध्ये जाण्यावरून ओळखतो. कुठल्या विभागातली कोणती मुलगी कोणाशी जास्त हसून बोलते, ही सगळी ब्रेकिंग न्यूज रेडिओकडे आधीच उपलब्ध असते. दोन मिनिटे जास्त बोलणं म्हणजे ‘काहीतरी चालू आहे’ व रोज एकत्र जाताना बघितल्यावर तो त्यांची लग्नपत्रिकाच तयार करतो. अमुक विभागाचा एक माणूस आणि अमुक विभागातली एकटी मुलगी यांचं काहीतरी प्रकरण चालू आहे, कारण काल दोघांच्या स्कूटर एकाच वेळी पार्किंगमधून बाहेर पडल्या.
रेडिओसाठी प्रेमाचे पुरावे फार साधे असतात. एकत्र लिफ्टमध्ये अडकणे म्हणजे ‘नियतीचा इशारा’, फाईल एकमेकांना देणे म्हणजे ‘देवाणघेवाण’. विशेष म्हणजे, ही सगळी माहिती संबंधितांच्या नकळत अधिकृत होते. प्रेम जुळण्याआधी किंवा तुटण्याआधी रेडिओला ती बातमी कळलेली असते! अनेकदा संबंधित दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव नसते, दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात, “आपण कधी प्रेमात पडलो?” पण रेडिओने आधीच प्रसारित केलेली असते आणि एकदा का ही बातमी प्रसारित झाली, की ती खोडून काढण्याची कोणतीही अधिकृत यंत्रणा संस्थेकडे नसते. हे गीत आठवतं - “इश्क़ छिपता नहीं छिपाने से...” प्रेमी जोडप्यांना कितीही वाटत असो की “आपलं चाललंय ते कोणालाच माहीत नाही”, आपण खूप सावध आहोत, कुणाच्या नजरेत येत नाही पण संस्थेतील या रेडिओलाच माहित असते की ‘मेलडी’ इतकी ‘चॉकलेटी’ कशाला आहे ती!
रेडिओ कधीही खोटं बोलत नाही, तो फक्त ऐकलेलं सांगतो. मात्र सांगताना त्यात थोडा मसाला, थोडं मीठ-मिरपूड आणि थोडी कल्पनेची भर घालतो. त्यामुळे साधी घटना रंगतदार कथेत बदलते. “आज अमुक सर उशिरा आले” ही बातमी येईपर्यंत “घरात काहीतरी गडबड चालू आहे” इतकी विकसित झालेली असते.
संस्था सुरळीत चालण्यासाठी नियम, अधिकारी, संगणक, पोर्टल आणि वेबसाईट जितके आवश्यक आहेत, तितकाच हा रेडिओही आवश्यक आहे. अधिकृत मान्यता नसली, तरी अनधिकृतपणे तोच संस्थेचा खरा कणा असतो. कारण संस्था बंद पडू शकते, पोर्टल क्रॅश होऊ शकते, वेबसाईट डाउन होऊ शकते पण संस्थेतील रेडिओ कधीच बंद पडत नाही. तो नेहमी ऑन असतो, सर्वत्र ऐकू येतो, आणि बिन पगाराचा, बिन वीजेचे प्रसारण करत राहतो. कोणतीही संस्था खर्या अर्थाने ओळखायची असेल, तर तिचा संचालक पाहू नका, वेबसाईट उघडू नका फक्त विचारून पहा: “इथे रेडिओ कोण आहे?”
हे रेडिओ त्या संस्थेचे खरे कणा असतात. जरी लोक त्यांच्या मागे त्यांना 'काड्या करणारे' किंवा 'बातम्या देणारे' म्हणत असले, तरी त्यांच्याशिवाय संस्थेचे पान हलत नाही. ते संस्थेच्या भिंतींना असलेले कान असतात. प्रत्येक संस्थेत असा रेडिओ असतोच. संस्थेत प्रेम टिको न टिको, पण रेडिओची रोमँटिक सेवा मात्र अखंड सुरू असते २४ तास, जाहिरातविना! अधिकृतपणे मान्यता नसली, तरी अनधिकृतपणे तोच संस्थेचा आत्मा असतो नेहमी ऑन, कधीही ऑफ न होणारा रेडिओ. त्याच्याशी चांगले संबंध ठेवले, तर अनेक कामे आपोआप होतात. आणि त्याच्याशी पंगा घेतला, तर तुमची माहिती पुढील बुलेटिनमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही...!