पहिलवानाच्या भीतीने भटजींनी 'नाऱ्या' गड्याला कामावर ठेवले, पण त्याच्या अजब आणि उलट्या कामांमुळे भटजींचे अतोनात नुकसान झाले. त्याला कामावरून काढताही येत नसल्याने भटजी 'इकडे आड तिकडे विहीर' अशा संकटात सापडला.

एका गावात एक भटजी राहत होता. त्या भटजीच्या मालकीचे खूप मोठे भाट होते आणि काजूचा एक डोंगर होता. त्यामुळे तो खाऊन पिऊन सुखी होता. दिवसेंदिवस त्याच्या भाटातली कामे वाढत होती त्यामुळे त्याला आपल्या हाताखाली एक गडी असावा असे वाटले. गावातील प्रत्येकाला तो येता जाता कोणी गडी आहे का म्हणून विचारत असे.
भटजीला गडी हवा आहे ही बातमी एका पहिलवानाच्या कानापर्यंत गेली. त्याचा भाऊ घरी नुसताच पडून होता. त्याला घेऊन पहिलवान भटजीच्या घरी गेला.
“भटकाका, तुमका गडी जायो असलो नू?” पहिलवानाने भटजीला विचारले.
“होय होय पाहिजे आसलो, आहे कोण तुझ्या ओळखीतलो?”
“होय काका, हो बघा माजो भाव, हेका कामाक ठेया तुमगेर. पण याद राखा, माझ्या भावाच्या केसाक जरी धपको लागलो तर तुमच्या पाठीची चामडी देवयतुलूय.”
बिचारा काडी पैलवान भटजी त्या पैलवानाच्या आवाजाला घाबरून थरथरू लागला. असला गडी त्याला नको होता पण भावाला घाबरून नाऱ्या गड्याला त्याने आपल्या घरी ठेवून घेतले.
नाऱ्या भटजीच्या घरी दुसऱ्या दिवशी गडी म्हणून हजर झाला. आजपासून नाऱ्या त्यांच्याच घरी राहणार होता. रोजचे जेवण खाण आणि कामाची मजुरी असा व्यवहार झाला. कामाचा पहिलाच दिवस होता. पहिलाच दिवशी भटजीने नाऱ्याला सांगितले, “चल रे नाऱ्या, आज परसातल्या भाजीची नडणी कर.”
भटजीने आपल्या घराच्या मागील भागात भाजीचे मोठे परसू केले होते. व्यवस्थित आखणीचे परसू. चारी बाजूने मुळे, मध्ये तांबडी भाजी, मेरेच्या बाजूने वाली, अधेमधे मक्याची झाडे, शिवाय मिरचीची झाडे, कांद्याची पात अशी वर्षभरात उपयोगी पडेल अशी इतरही रोपे तिथे वाढत होती. नाऱ्या गडी परसात गेला. सुंदर आखणीचे ते परसू होते. नाऱ्याने एका बाजूने नडणी सुरू केली ती दिवसभरात पूर्ण परसू नडून ठेवले. संध्याकाळी मोठ्या उमेदीने घरी परतला. घरी परतताना तो मनाशी बोलत होता, “आज काका माका शाबास म्हणतलो. मिया नडणी केलियच तशी, एकदम चकचकित.”
नाऱ्या घरी पोहोचला. भटजींनी विचारले, काय रे नाऱ्या नडणी केलीस? “होय काका सामकी चकचकीत.” नाऱ्याने सांगितले.
भटजी पण खुश झाला. रात्री त्याला पोटभर जेवण घातले. सकाळी उठून आपल्या परसात गेला. पाहतो तर काय! भटजी समोरचे दृश्य पाहून थयथयाट करू लागला. नाऱ्याने सगळीच भाजीची रोपे उपटून टाकली होती. त्या ठिकाणी फक्त रानटी रोपे तेवढी शिल्लक होती.
भटजींना काय करावे ते सुचेना. नाऱ्याला शिव्या घालतच तो घरी परतला.
“नाऱ्या ये नाऱ्या, काय केलंस रे हे परसात?”
“काका, भाजी नडलुय.”
“अरे, अकलेच्या कांद्या! तू सगळी भाजी उपटून काढलीस.”
“मगे, तुम्हीच तर सांगल्याला, भाजी नड, मिया नडली भाजी, बघ एक तरी भाजीचा रॉप दिसता जाल्या.”
“अरे, भाजी नडणे म्हणजे त्यातील रानटी रोपे काढणे. तू उलट केलंस. रोपे ठेवलीस आणि भाजी उपटलीस.”
“काका, चूक तुमचीच असा... ह्या असां पयली सांगाचा न्हू? आता काय माका सांगा नका.”
भटजीचा तीळपापड झाला. पण करणार काय? नाऱ्याला शिक्षा केली तर त्याचा पहिलवान भाऊ काही आपल्याला सोडणार नाही याची भटजीला जाणीव झाली. बिचारा भटजी मूग गिळून गप्प बसला.
दुसऱ्या दिवशी नाऱ्याला भटजींनी अजून एक नवीन काम सांगितले.
“चल रे नाऱ्या, आज सगळ्या काजी बेणून ये.”
“आत्ता जातूय काका!” नाऱ्याने अवजारांपैकी एक धारदार कुऱ्हाड घेतली. ती खांद्यावर टाकून नाऱ्या काजूच्या डोंगराच्या वाटेने चालू लागला. डोंगरावर पोचतात नाऱ्याने आपली कुऱ्हाड चालवायला घेतली ती थेट संध्याकाळपर्यंत तो कुऱ्हाड चालवतच होता. संध्याकाळपर्यंत सगळ्या काजी त्याने बेणून साफ केल्या होत्या. आपल्या कामावर स्वतःच खुश होत तो भटजीच्या घरी पोहोचला.
“काय रे नाऱ्या, बेणलय का काजी?
“हय काका,एकदम साफ केलय.”
भटजीला वाटले, कदाचित या वेळी तरी नाऱ्याने व्यवस्थित काम केलं असेल. जाऊन बघतो तर काय?
नाऱ्याने वेचून सगळ्या काजी तोडून टाकल्या होत्या. नावाला एकसुद्धा काज डोंगरावर शिल्लक नव्हती.
“अरे, नाऱ्या, काय रे हा सत्यानाश केलास? सगळ्या काजी कापून मरे टाकल्यास.”
“काका, माजी काय चूक? तीयाच सांगलेलय सगळ्यो काजी बेण. मीया बेणलय.”
“अरे, पण पापया काजी बेण म्हणजे काजीतली झाडा बेणची आसली. तू काजी हाणलय.” भटजी तिरमिरीत बोलला. पण आता बोलून काय फायदा? सगळ्या काजीची झाडे तुटून जमिनीवर पडली होती. शिवाय त्याला काही म्हणायची सोय नाही. त्याला काही शिक्षा केली किंवा म्हटले आणि नाऱ्या रागावला तर त्याचा पहिलवान भाऊ आहेच पाठ सोलायला.
या घटनेला काही दिवस झाले आणि भटजीने एके दिवशी नाऱ्याला सांगितले, “चल रे नाऱ्या, आज कुळागर साफ कर.” नाऱ्या गेला आणि कुळागर अगदी साफ करून आला. एकही पोफळी शिल्लक नव्हती की नारळाचे झाड. एवढे मोठे कुळावर सगळे जमीनदोस्त झाले होते. भटजी आता थयथयाटच करू लागला. नाऱ्याने भटजीला पार धुळीला लावले होते.
एके दिवशी तर नाऱ्याने हद्दच पार केली. भटजीचा एक अत्यंत लाडका कुत्रा होता. त्या कुत्र्याला भटजी आपल्या पोटच्या पोरासारखा जपायचा. सोनू त्याचे नाव. एके दिवशी सोनुने आपल्या अंथरुणात घाण केली. नाऱ्या सांगितलेले काम उलटे करतो त्यामुळे त्याला भटजी आता कोणते कामच सांगत नव्हता. आता निदान सोनूला धुण्याचे काम तरी त्याला सांगावे या हेतूने भटजींनी नारायाला हाक मारली, “नाऱ्या, सोनुने अंथरुणात घाण केली आहे. जा रे जरा त्याला धुवून आण.”
खूप दिवसांनी आपल्याला एखादे काम सांगितले हे पाहून नाऱ्याही खुश झाला. मोठ्या उमेदीने तो सोनूला घेऊन नदीवर गेला. भटजींनी त्याला साफ कर म्हणून सांगितले. आपले डोके वापरले. या सोनूला अगदीच साफ करायचे या हेतूने त्याने एक चाकू घेतला. सोनूचे व्यवस्थित पोट फाडले. त्याला आतून बाहेर येऊन साफ केले. आणि व्यवस्थित आणून अंथरुणावर ठेवले. भटजीही खुश झाला. सुरुवातीला त्याला वाटले आपला सोनू शांत झोपला असेल. पण कितीतरी वेळ झाला सोनू डोळे उघडत नाही हे पाहून भटजी जवळ गेला. बघतो तर काय सोनू मरून पडला होता. नाऱ्याने त्याला चांगलेच आतून बाहेरून साफ केले होते. बिचारा भटजी आपला आवडता कुत्रा असा मरून पडलेला आहे ते पाहून धाय मोकलून रडला.
भटजीला आता नाऱ्याची धास्ती वाटू लागली. त्याला कुठले काम सांगितले तरी तो त्याची तीन तेरा करायचा. ह्या नाऱ्याला कामावर ठेवून भटजीला इकडे आड आणि तिकडे विहीर झाली होती. कामावरून काढले तर पहिलवान जाब विसरायला येईल. कामावर ठेवले तर दिवसेंदिवस फक्त नुकसानच होत राहील. आता करावे तरी काय याच विवंचनेत भटजी होता... (क्रमश:)
- गाैतमी चाेर्लेकर गावस