Home >> तरंग >> स्पर्धा परीक्षा - चालू घडामोडी कशा लक्षात ठेवाव्यात

स्पर्धा परीक्षा - चालू घडामोडी कशा लक्षात ठेवाव्यात

भारतात कोणत्याही स्पर्धा परीक्षेत हमखास असणारे प्रश्न म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. चालू घडामोडींचा अभ्यास कितीही केला तरी पुरेसा नसतो, यामुळेच याचा अभ्यास करणे 'ट्रिकी' असते.

Story: यशस्वी भव: |
11th July, 10:57 pm
स्पर्धा परीक्षा - चालू घडामोडी कशा लक्षात ठेवाव्यात

चा​लू घडामोडी' यांनाच 'करंट अफेअर्स'असे म्हणतात. भारतात कोणत्याही स्पर्धा परीक्षा असल्या तरी परीक्षेमध्ये हमखास असणारे प्रश्न म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, आर्किटेक्चर, शिक्षक या परीक्षा वगळल्यास इतर परीक्षांमध्ये यावर प्रश्न असतात. यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, एनडीए यासारख्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न असतात. चालू घडामोडी यांचा अभ्यास कितीही केला तरी तो पुरेसा नसतो; कारण दर सेकंदाला जगात काही ना काही घडतच असते. मग लक्षात तरी काय काय ठेवणार? यामुळेच याचा अभ्यास करणे 'ट्रिकी' असते. 'चालू' याचा अर्थ साधारणपणे चालू असलेल्या दिवसापासून एक ते दीड वर्ष मागे ज्या घटना घडल्या, त्यांनाच 'चालू घडामोडी' अर्थात 'करंट अफेअर्स' असे म्हणतात.

रोज कोणतेही वर्तमानपत्र उघडले की देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आधारित २० तरी नवीन बातम्या दिसतात. आता साधारणपणे मागील ५०० दिवसांमध्ये अशा बातम्या लक्षात ठेवायच्या म्हणजे एक प्रकारची कसरतच आहे. परंतु यातूनच मार्ग काढायचा असतो. शहरातील ज्या लोकल बातम्या यात येतात, त्या या विषयातून वर्ज्य असतात. थोड्याफार बातम्या ज्या महत्त्वाच्या वाटतात, त्यांचा अभ्यास करणे इष्ट राहील. राज्य पातळीवरील तसेच देश पातळीवरील बातम्या महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे अशा प्रकारे अभ्यास करताना 'फिल्टर्स' लावावेत.

एक सेपरेट नोटबुक यासाठी करावी व ज्यात स्वतःच्या हाताने या घटना लिहाव्यात. 'लिहिले की जास्त लक्षात राहते' या तत्त्वाने या गोष्टी हमखास कराव्यात. शहर, राज्य, देश, आंतरराष्ट्रीय असे चार विभाग करावेत. जशा जशा बातम्या असतील, त्याप्रमाणे त्या त्या विभागात नमूद करत जावे. शक्यतो ४०० पानांची वही करावी. प्रत्येक विभागाला साधारणपणे ५० ते १०० पाने यांची विभागणी करावी. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी जास्त पाने ठेवावीत.

राष्ट्रीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष / सेक्रेटरी यांचे वेगवेगळे कोष्टक करावे; तसेच आंतरराष्ट्रीय संस्थेचे पण नमूद करावे. यामध्ये संस्थेचे नाव, जर बदलले असल्यास बदललेले नाव, किती साली सुरू झाली ती तारीख व सनावळ, माजी अध्यक्ष / प्रमुख व आजी पदाधिकारी यांची नावे लिहावीत. ज्यामध्ये रिझर्व्ह बँक, इलेक्शन कमिशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, रेल्वे मंत्रालय, आधार केंद्र, भाभा अॅटॉमिक रिसर्च, आय.आय.टी., परराष्ट्र मंत्रालय, प्लॅनिंग कमिशन, रॉ, निती आयोग, आयकर विभाग, निफ जस्टिस, लॉ कमिशन, सुप्रीम कोर्ट, विविध हाय कोर्ट्स, इंडियन बार कौन्सिल, अॅटर्नी जनरल, भारतरत्न, पद्मश्री, पद्म पारितोषिक प्राप्त महोदय, बजेट विभाग, वित्त विभाग, संरक्षण दलांचे प्रमुख, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स इत्यादी पदाधिकाऱ्यांचे कोष्टक करावे.

एका कोष्टकामध्ये शासकीय जुन्या योजना, नव्या योजना, त्यांची नावे, त्यांचे हेतू, कार्यान्वित होण्याचे साल, त्यांचे धोरण प्रमुख यांचा समावेश करावा. राज्य योजना आणि केंद्राच्या योजना या वेगवेगळ्या लिहाव्यात. शासकीय स्तरावर निराधार महिला, मागासवर्गीय, शोषित-पीडितांसाठी, महिला व बाल कल्याण, वंचितांसाठी, अपंग-कामगारांसाठी अनेक शासकीय योजना असतात, त्यांची माहिती त्यात व्यवस्थितपणे लिहावी. मागील वर्षात जे काही नवीन कायदे करण्यात आले त्यांची माहिती, कायद्याचे नाव, वर्ष, हेतू यांची नोंद करावी.

तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सात खंडांच्या पद्धतीने त्या त्या देशातील घडामोडी त्या त्या खंडाच्या विभागात लिहाव्यात. देशप्रमुख, पक्षप्रमुख, त्यांची नियुक्ती, कार्यकाळ नमूद करावा. आंतरराष्ट्रीय संस्थांची वेगळी सूची करावी. त्यांचे प्रमुख, त्यांची कार्ये, उद्दिष्टे, आजी-माजी अध्यक्ष यांची नावे लिहावीत. प्रसंगी यूट्यूबचा वापर करावा. यामध्ये अनेक व्हिडिओ आहेत, त्याचा उपयोग होतो.

अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)