Home >> तरंग >> दंडाच्या भीतीमुळे वाहनचालकांंत शिस्त निर्माण होईल का?

दंडाच्या भीतीमुळे वाहनचालकांंत शिस्त निर्माण होईल का?

एआय कॅमेऱ्याच्या आधारे चलन देण्याची कार्यवाही १५ जुलैपासून होणार असली तरी त्याबाबत जागृती सुरू झाली आहे. वर्षभरात ९२ ठिकाणी एआय कॅमेरे बसवून वाहतुकीवर नजर ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
11th July, 11:08 pm
दंडाच्या भीतीमुळे वाहनचालकांंत शिस्त निर्माण होईल का?

​देशाची व त्याचबरोबर गोव्याची विकासाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. नवनवीन रस्ते तसेच पूल तयार होत आहेत. कल्याणकारी योजनांमध्येही वाढ होत आहे. दर्जेदार शिक्षणसंस्था उदयाला येत आहेत. जसजसा विकास होत आहे तसतशा अनिष्ट प्रवृत्तीही वाढत आहेत. चोऱ्या, खून, दरोडे, महिलांवरील अत्याचार दररोज घडत आहेत. अपघात व अपघाती मृत्यूंबाबत तर न बोललेच बरे. एक अपघात झाला व त्यात जीवितहानी झाली, की पुढील दोन दिवस हळहळ व्यक्त केली जाते. अपघात नियंत्रणाबाबत उपाययोजनांची मागणी होते. काही दिवसांनंतर ये रे माझ्या मागल्या... अशी स्थिती आहे. अपघातांची संख्या, त्यात होणारे जखमी तसेच अपघाती मृत्यूंचे आकडे महिन्यागणिक प्रसिद्ध होत असतात. सरासरीचा विचार करता दररोज एखाद-दुसरा अपघात होऊन एखाद्या दुर्दैवी व्यक्तीला जीव गमवावा लागतो. आकारमान व लोकसंख्येचा विचार करता आपल्या छोट्याशा राज्यात अपघातांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे वाढते अपघात व अपघाती मृत्यू हे चिंतेचे कारण बनले आहे.

मोबाईल, इंटरनेट, एआय व इतर तंत्रज्ञानामुळे आजचे जीवन धकाधकीचे बनले आहे. प्रत्येकाला कार्यालयात, विद्यालयात अथवा कामासाठी वेळेत पोहोचावे लागते. यामुळे कसलाही विचार न करता जो तो माणूस वेळेत पोहोचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. यात त्याचे सुरक्षेकडे तसेच वाहनाच्या वेगाकडे दुर्लक्ष होते. हे दुर्लक्ष काही वेळा स्वतःच्या वा दुसऱ्याच्या जीवावर बेतते. यावर उपाय म्हणजे वेळेत कामावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाने जरा लवकर घरातून बाहेर पडायला हवे. अपघातांचे प्रमाण व वाहनांच्या संख्येचा विचार केला तर वाहन चालविताना सुरक्षेची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्याबरोबर प्रत्येकाने मनावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

वाहनांची संख्या वाढल्याने रस्ते आता अपुरे पडू लागले आहेत. सकाळी-सायंकाळी पणजीत वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारची कसरत असते. मांडवी पूल व इतरत्र सकाळी व सायंकाळी लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. यात पुन्हा आता पर्वरी फ्लायओव्हरचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे म्हापसा - पणजी मार्गावरील वाहतूक धोकादायक झालेली आहे. यामुळे प्रत्येकाने सतर्कपणे वाहन चालविण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षा तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविल्या जातात. रस्त्यांचे रुंदीकरण, महामार्गाचा विस्तार, फ्लायओव्हर तसेच नवीन पुलांची उभारणी हा ह्या उपाययोजनांचाच भाग म्हणायला हरकत नाही. तरीही आज प्रत्येकाकडे दोन-दोन दुचाक्या असतात. घरामध्ये दोन ते तीन चारचाकी वाहने असतात. पूर्वी सामान्य गोमंतकीय वाहतुकीसाठी सार्वजनिक बससेवेचा वापर करायचे. आता प्रत्येकाकडे वाहन असल्याने सार्वजनिक बससेवेचा वापर दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळेही वाहनांचा आकडा वाढत आहे. रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या हे वाढत्या अपघातांचे एक कारण आहे.

तसेच गोवा हे पर्यटकीय राज्य असल्याने येथे कायम वाहनांचा सुळसुळाट असतो. स्थानिक वाहने आणि पर्यटकांची वाहने यांची बेरीज करून धोरण वा उपाय आखावे लागतात. मोपा विमानतळामुळे विमानांचा आकडा वाढलेला आहे. विमानातून येणारे सर्व प्रवासी वा पर्यटक विमानतळावरून टॅक्सीने इच्छित स्थळी जातात. पर्यटकांमुळे रेंट-ए-कॅबच्या व्यवसायात वाढ झालेली आहे. रेंट-ए-कॅबमुळे काही जणांना रोजगार उपलब्ध होत असला तरी बऱ्याचदा रेंट-ए-कॅब अपघाताला कारण ठरत आहे. यामुळे नवीन रेंट-ए-कॅब वाहनांना परवाना देणे सरकारने बंद केले आहे. अधिकृत परवाना देणे बंद असले तरी बेकायदा रेंट-ए-कॅब चालविण्याचे प्रकार नगण्य नाहीत. यामुळे रेंट-ए-कॅबबाबत विचार करून धोरण आखावे लागणार आहे.

पुरुषांबरोबर वाहने चालविणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे. कॉलेजचे विद्यार्थीही परवाना नसताना दुचाकी चालवितात. परवाना नसताना वाहन चालविणे हा गंभीर प्रकार आहे. दुचाकीसह इतर वाहने बरेच जण चालवित असले तरी बहुतेकांचे वाहतूक नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होते. काही वेळा नकळत दुर्लक्ष होते तर काही वेळा जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड व्हायलाच हवा. दोन-तीन वेळा आर्थिक फटका बसला की नियम मोडणाऱ्यांचे लक्ष नियमाकडे जाण्यास मदत होईल.

वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. स्तुत्य असा हा निर्णय आहे. पहिल्या टप्प्यात २६ ठिकाणी एआय कॅमेऱ्याद्वारे नियम मोडणाऱ्यांना चलन देण्यात येईल. काही सुसाट वाहनचालक वाहतूक पोलिसांना गुंगारा देत चलन चुकवितात. अशा वाहनचालकांना वठणीवर आणणे एआय कॅमेऱ्यांमुळे शक्य होणार आहे. एआय कॅमेऱ्याच्या आधारे चलन देण्याची कार्यवाही १५ जुलैपासून होणार असली तरी त्याबाबत जागृती सुरू झाली आहे. वर्षभरात ९२ ठिकाणी एआय कॅमेरे बसवून वाहतुकीवर नजर ठेवण्याचा प्रस्ताव आहे. वेगवान वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल वापरणे, सीट बेल्ट न वापरणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे हे प्रकार सर्रास घडत असतात. अपघातांवर नियंत्रण ठेवण्याबरोबर वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना जरब बसायलाच हवी.

- गणेश जावडेकर, (लेखक भांंगरभूंंय कोकणी दैनिकाचे मुख्य प्रतिनिधी आहेत)