सत्तरी, धारबांदोडा, सांगेसारख्या भागांत काही लघु धरणे उभारली तर गोव्याची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते. गोव्यात दिवसेंदिवस नागरीकरण आणि लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे पाण्याची गरजही वाढत आहे. हे बदल लक्षात घेऊन आणि पुढील काही वर्षांत बदलणारा गोवा कसा असेल याचा विचार केला तर त्यासाठी पाणी पुरवठ्याचीही तयारी आतापासूनच करावी लागेल.

जूनच्या मध्यापर्यंत गोव्यात जेवढा पाऊस हवा होता, तेवढा पडलेला नाही. जो मान्सून केरळमधून गोव्याकडे सरकला होता, तोच बेपत्ता झाल्यामुळे गोवा अजून कोरडा आहे. जून महिन्यातील पावसाची तूट ही सुमारे ६० टक्के इतकी आहे. अर्थात या स्थितीमुळे गोव्याच्या धरणांतील जलसाठा संपुष्टात येत आहे. सरकारच्या मते धरणांतील पाणीसाठा गोव्याची महिनाभर तहान भागवू शकतो, पण त्यापूर्वी पावसाने हजेरी लावली तर पाणीसंकट टळू शकेल. अधिकाऱ्यांच्या मते सर्वांत वाईट स्थिती आहे ती अंजुणे धरणाची. त्या धरणात सध्या केवळ ९.९ टक्केच पाणीसाठा आहे. पंचवाडी धरणातही पाणीसाठा कमी आहे. पंचवाडीत १९ टक्के, साळावलीत २७ टक्के आणि तिळारी धरणात ३० टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्यातरी गोव्यात पाणीसंकट गडद नसले, तरीही नजीकच्या काळात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. पुढील काही दिवसांत पाऊस सक्रिय होऊन जलाशयांमध्ये पाणीसाठा उपलब्ध होण्याची गरज आहे. अन्यथा गोव्यात मोठे पाणीसंकट निर्माण होऊ शकते. सरकारने पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी तयारी ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही गोव्यात अशा प्रकारची स्थिती निर्माण होणे यावरूनच भविष्यात गोव्यात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध राहण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करण्याचे हे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांत चांगल्या पावसाची नोंद झाली होती, त्यामुळेच गोव्यातील सध्याची स्थिती चांगली आहे. पाणी साठवण्यात तसेच पाण्याचे नियोजन करण्यात गोवा मागे पडतो. गोव्यात पाण्याचा दुरुपयोग जास्त होतो. पिण्यासाठी पुरवठा होत असलेल्या पाण्याची गळती आजही मोठ्या प्रमाणात आहे. गळतीशिवाय अनेक ठिकाणी पाण्याची चोरी होत आहे. जे पाणी पिण्यासाठी येते, त्याच पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी आणि झाडांना पाणी देण्यासाठी होतो. त्यामुळे पाणी पुरवठा करणारी यंत्रणाही हतबल आहे. योग्य नियोजन केले आणि पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने झाला तर गोव्यावर पाणीटंचाईची वेळ कधीच येणार नाही. सध्या पाऊस नसल्यामुळे जी स्थिती निर्माण होत आहे त्यातून बोध घेऊन गोव्यातील पाणी पुरवठा यंत्रणा सुधारण्याची नितांत गरज आहे. पाणी गळती आणि पाणी चोरी रोखण्यावर भर दिला, तर बरेच प्रश्न सुटतील आणि पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात शिल्लक राहू शकेल.
जूनमध्ये पहिल्या १५ दिवसांत फक्त ६.४४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पर्जन्यमापक यंत्रणा गोव्यात योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे आणि वेधशाळेची स्वतःची यंत्रणा राज्यभर नसल्यामुळे गोव्यातील पावसाची निश्चित आकडेवारीही सध्या मिळत नाही. जी आकडेवारी वेधशाळेकडे आहे, त्यावरून पावसाची तूट मोठी आहे हे स्पष्ट होते. सुमारे ६० टक्के पाऊस कमी आहे. त्यामुळे गोव्यावर पुढील काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचे संकट येऊ शकते. सरकारने खाणींचे खंदक, नद्यांमधून पाणी उपसा करून ते जलशुद्धीकरण प्रकल्पांत नेण्याची तयारी करून ठेवली आहे. सरकारने केलेल्या या तयारीवरूनच, पुढील काही दिवसांत पाऊस सक्रिय झाला नाही तर, पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवू शकते हे स्पष्ट होते. २०२३ मध्येही अशीच स्थिती उद्भवली होती. यंदा अद्याप सरकारी यंत्रणेवर तशी वेळ आलेली नसली, तरी भविष्यात ती नाकारता येत नाही. या दोन वर्षांतील घटनांमधून गोव्याला अजूनही काही जलाशयांची गरज आहे हे अधोरेखित होते. लोकवस्त्या, मोठे गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगीकरण, हॉटेलांची वाढती संख्या यामुळे पाण्याची जास्त गरज आहे. त्यासाठी गोव्यात काही लघु धरणांची गरज आहे. गेली अनेक वर्षे म्हादईचे पाणी अडवण्यासाठी सरकारने योजना तयार केल्या, पण त्या योग्य पद्धतीने मार्गी लागल्या नाहीत. काही लघु धरणे उभारण्याचे प्रस्ताव आहेत, बंधारे उभारण्यासाठी प्रयत्न होतात, पण या गोष्टी पुढे जात नसल्यामुळे पाण्याचा तुटवडा भासतो. सत्तरी, धारबांदोडा, सांगेसारख्या भागांत काही लघु धरणे उभारली तर गोव्याची पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते. गोव्यात दिवसेंदिवस नागरीकरण आणि लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे पाण्याची गरजही वाढत आहे. हे बदल लक्षात घेऊन आणि पुढील काही वर्षांत बदलणारा गोवा कसा असेल याचा विचार केला तर त्यासाठी पाणी पुरवठ्याचीही तयारी आतापासूनच करावी लागेल. काही दिवस पाऊस आला नाही तर पाण्यासाठी धावपळ होत आहे, यावरून पुढे कुठल्याही संकटाचा सामना करण्याची तयारी सरकारने ठेवायला हवी.