
फुटबॉल जगतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे फिफा विश्वचषक. २०२६ चा हा विश्वचषक केवळ कौशल्याची कसोटी पाहणारा नाही, तर जागतिक फुटबॉलच्या इतिहासाला नवी दिशा देणारा ठरत आहे. ११ जून रोजी मेक्सिकोच्या ऐतिहासिक 'एस्टाडिओ बानोर्टे' मैदानावर यजमान मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने या महाकुंभाची दणक्यात सुरुवात झाली. उत्तर अमेरिका खंडातील तीन बलाढ्य देश अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको एकत्र येऊन या स्पर्धेचे आयोजन करत आहेत.
यावेळचा विश्वचषक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला आहे. फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच ३२ ऐवजी ४८ संघ या स्पर्धेत नशीब आजमावत आहेत. यामुळे सामन्यांची चुरस कमालीची वाढली आहे. या ४८ संघांची विभागणी एकूण १२ गटांमध्ये करण्यात आली असून प्रत्येक गटात ४ संघ आहेत. ग्रुप स्टेजच्या अखेरीस प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम ८ संघ थेट ‘राउंड ऑफ ३२’ या बाद फेरीत प्रवेश करतील. त्यामुळे साखळी फेरीतून बाहेर पडणे टाळण्यासाठी प्रत्येक संघाला प्रत्येक गोलसाठी रक्ताचे पाणी करावे लागत आहे.
या मुख्य स्पर्धेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सप्टेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या आणि मार्च २०२६ पर्यंत चाललेल्या पात्रता फेरीत जगभरातील २०६ देशांनी भाग घेतला होता. एकूण ८९९ सामन्यांमध्ये २,५०० पेक्षा जास्त गोल पाहायला मिळाले, ज्यामध्ये नॉर्वेच्या अर्लिंग हालांडने सर्वाधिक १६ गोल झळकावले. या प्रवासाने फुटबॉल विश्वाला अनेक नवे नायक दिले. उझबेकिस्तान, जॉर्डन आणि कुरासाओ यांसारख्या नवख्या देशांनी पहिल्यांदाच विश्वचषकात जागा मिळवून इतिहास रचला, तर स्कॉटलंडचा संघ २८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा जागतिक मंचावर परतला.
स्पर्धा सुरू होऊन आता काहीच दिवस झाले असले, तरी मैदानावर रोमांचक खेळ पाहायला मिळत आहे. ११ ते २७ जून दरम्यान चालणाऱ्या या ग्रुप स्टेजमध्ये पारंपरिक विजेत्यांना तगडे आव्हान मिळत आहे. जर्मनीने कुरासाओविरुद्ध ७-१ असा एकतर्फी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. दुसरीकडे, ब्राझील विरुद्ध मोरोक्को (१-१) आणि नेदरलँड्स विरुद्ध जपान (२-२) हे हाय-व्होल्टेज सामने बरोबरीत सुटल्याने बाद फेरीची गणिते गुंतागुंतीची झाली आहेत. यजमान अमेरिकेने पॅराग्वेवर ४-१ ने मात करत घरच्या मैदानावर आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यातच, उष्णतेचा सामना करण्यासाठी फिफाने अनिवार्य केलेले ‘वॉटर ब्रेक्स’ खेळाची रणनीती बदलत आहेत.
कॅनडाच्या व्हँकुव्हरपासून ते अमेरिकेच्या लॉस एंजेलिसपर्यंतच्या एकूण १६ शहरांमधील जागतिक दर्जाच्या स्टेडियम्समध्ये हा फुटबॉलचा थरार रंगत आहे. २८ जूनपासून बाद फेऱ्यांची खरी लढत सुरू होईल. त्यानंतर, १९ जुलै रोजी न्यूयॉर्क न्यू जर्सीच्या (मेटलाईफ स्टेडियम) मैदानावर या महाकुंभाचा अंतिम सामना खेळवला जाईल. फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे, स्पेनचा लॅमिन यमाल आणि सहाव्या जेतेपदासाठी उत्सुक ब्राझील यांच्यात जगज्जेतेपदाचा मुकुट कोण पटकावणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
- प्रवीण साठे