राज्यातील वाढत्या जीवघेण्या अपघातांवर आणि प्रशासनाच्या ढिसाळपणावर बोट ठेवणारा, सर्वसामान्यांचा आक्रोश आणि व्यवस्थेला जाब विचारणारा एक जळजळीत, डोळे उघडणारा परखड लेख

गोव्यात असा एकही दिवस जात नाही, ज्या दिवशी अपघात होत नाही. असे म्हणण्यापेक्षा आता असे म्हणावेसे वाटते... गोव्यात आता तासाला एक अपघात होतोय. कोणाचा तरी तरुण मुलगा कामाला गेलेला परत घरी पोहोचत नाही. कोणाचे तरी आई-वडील बाजारात गेलेले परत पोहोचत नाहीत. कोणाचे तरी आजी-आजोबा डॉक्टरकडे गेलेले परत घरी पोहोचत नाहीत. आणखी असे किती बळी आमच्या डोळ्यांदेखत जाणार? मी 'बळी जाणार' असे म्हणतोय, कारण याला जे कोणी जबाबदार आहेत, ते आपली जबाबदारी स्वीकारत नाहीत.
गोव्यात सुशासन आहे, अशाच स्वरूपाच्या बातम्या फक्त आम्ही वाचायच्या का? या अशा अपघातांमुळे कित्येक जणांच्या भविष्यातील स्वप्नांचा चक्काचूर होतो. कित्येक निष्पाप लहान मुले अनाथ होतात आणि आम्ही फक्त अशा बातम्या वाचून हळहळ व्यक्त करतो आणि काही वेळाने विसरून जातो. अभिमान बाळगावा अशा बऱ्याच गोष्टी गोव्यात आहेत, पण आमचे मंत्री या यादीत काहीतरी वेगळीच भर घालू इच्छितात असे दिसते. चार दिवसांत सगळ्यात जास्त अपघात घडणाऱ्या राज्यांमध्ये गोवा पहिल्या क्रमांकावर!
अरे भाग्यवानांनो, लोक जिवंत राहिले तरच तुम्हाला मते मिळतील. इथे तर संपूर्णच्या संपूर्ण कुटुंबे अपघातात संपायला लागली आहेत आणि आमचे शासनकर्ते मात्र 'सू ssss शेगाद' आहेत.
तरुण पिढी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवते, वाहनचालक वेग कमी करत नाहीत, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करतात, हे सगळे मान्य. पण असे करणाऱ्यांना कायद्याने जी शिक्षा व्हायला हवी, ती त्यांना मिळते का? एखाद्याला वाहनाने उडवून मारल्यानंतर, त्या आरोपीला पुन्हा वाहन चालवायला देणे योग्य आहे का? मंत्र्यांचा फोन आल्यावर त्याला सोडून देणे योग्य आहे का? माणसाचा जीव इतका स्वस्त कधीपासून झाला? आणि कशामुळे झाला? कुठे मिळतील आम्हाला यांची उत्तरे? काहीही चूक नसताना अशा अपघातांत मरणाऱ्या लोकांना पाहणे आणि त्याचे 'रील' करून अपलोड केले की आमची जबाबदारी संपली? ही सुद्धा एका प्रकारची हत्याच आहे. कृपया करून अशा हत्या थांबवा.

- स्वाती नाईक
केपे