तहान लागलीय, आता विहीर खोदा!

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सगळ्यांनाच सत्तेची तहान लागणे स्वाभाविकच आहे आणि तहान लागल्यावरच विहीर खोदणे हा तर आपल्या सगळ्यांचा स्थायीभाव आहे. विजय सरदेसाई असोत वा गिरीश चोडणकर वा अन्य पक्षांचे नेतेही त्यास अपवाद नाहीत.

Story: विचारचक्र |
15th June, 10:06 pm
तहान लागलीय, आता विहीर खोदा!

गोव्यातील पुढील विधानसभा निवडणुका नियोजित वेळेपेक्षा तीन-चार महिने आधी म्हणजे नोव्हेंबर किंवा जानेवारीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या शक्यतेमुळे राज्यातील राजकीय वातावरण हळूहळू, पण निश्चितच तापू लागले आहे. पावसाळा आता कधीही सुरू होणार असल्याने तापणारे हे वातावरण कितपत तप्तच राहील, याची शंकाच आहे. कोणी 'विजय यात्रा'साठी अनंत चतुर्दशीचा मुहूर्त काढला आहे, तर कोण 'राखण' यात्रा कधी सुरू करावी यासाठी मुहूर्त शोधत आहे. या यात्रांमध्ये अजून दोन वा तीन यात्रांची पावसाळा संपेपर्यंत किंवा गणपतीच्या शुभागमनापर्यंत भर पडली तर त्याचेही आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. तहान लागल्यावर विहीर खोदणे हा प्रकार नेमका काय असतो हे जाणून घ्यायचे असेल, तर गोव्यातील झाडून सगळ्याच विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून शिकता येईल. त्यास अपवाद असा कोणीही नाही, अगदी आपले तडफदार नेते विजय सरदेसाई हेही त्यात मोडतात. परवा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जे तडफदार भाषण केले ते ऐकले असेल, तर त्यांच्या तळमळीची प्रचिती कोणालाही यावी. गोव्यात सत्ताबदल घडवून आणण्यासाठी त्यांनी यावेळेस केलेला 'पण' पाहता सरकारविरोधातील अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही त्याची धडकी घेतली असेल. विजय सरदेसाई यांनी सरकार पक्षांच्या किंवा सरकारविरोधात आवाज उठवण्याचे आतापर्यंत तसे काहीही बाकी ठेवले नसले, तरी त्यांना तशी साथ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामागील कारणे त्यांनाच शोधावी लागतील.

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सगळ्यांनाच सत्तेची तहान लागणे स्वाभाविकच आहे आणि तहान लागल्यावरच विहीर खोदणे हा तर आपल्या सगळ्यांचा स्थायीभाव आहे. विजय सरदेसाई असोत वा गिरीश चोडणकर वा अन्य पक्षांचे नेतेही त्यास अपवाद नाहीत.  अपवाद आहे तो एकमात्र भाजपचा आणि तोही एक सुसंघटित राजकीय पक्ष या नात्याने. विधानसभा निवडणुका जवळपास लागल्या असताना आता धावपळ कशी चालली आहे ते काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी, आरजीपी अशा सगळ्याच विरोधी पक्षांच्या तंबूत नुसते डोकावले तर त्याची कल्पना येते. तंबूच म्हणावे लागतील ते. जवळपास सगळ्याच विरोधी राजकीय पक्षांवर आज भारतीय जनता पक्षाने तंबूत राहण्याची पाळी आणली आहे आणि त्यास काँग्रेस पक्षही, ज्याने देशावर सहा-सात दशके राज्य केले, अपवाद नाही. प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व तर संपण्याच्याच मार्गावर नाही ना, अशीच काहीशी आजची अवस्था झालेली आहे. बंगालात ममतांची झालेली दैना तर बघवत नाही. अशा पार्श्वभूमीवर परवा विजय सरदेसाई यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोडलेली डरकाळी अशा पक्षांना दिलासा देणारी निश्चितच आहे, पण आता पूर्णपणे विखुरलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणून 'शक्तिमान' भाजपशी दोन हात करण्याचे त्राण आपल्यामध्ये आहे काय याचा त्यांनी विचार केला आहे काय, याचे उत्तर मात्र शोधावे लागेल. विजय सरदेसाई म्हणतात त्याप्रमाणे ही प्रक्रिया खूप आधीपासूनच व्हायला हवी होती. काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वात ऐनवेळी बदल झाल्याने विजय सरदेसाई यांनी बांधलेले काही आडाखे चुकले असावेत, असे मात्र काही राजकीय निरीक्षकांना वाटते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची गच्छंती तशी अनपेक्षितच होती, पण का कोण जाणे आमच्यासारख्यांना मात्र वाटत होते की गिरीश चोडणकर ही संधी सोडणार नाहीत. निवडणुकीदरम्यान त्यातही विधानसभेच्या, प्रदेश अध्यक्षपद मिळण्याचे बरेच लाभ असतात आणि त्यावर पाणी न सोडण्याचा धूर्तपणा त्यांच्याकडे नव्हता, असे नंतर कोणी म्हणू नये याकरिता त्यानी ते स्वीकारले असावे, असे सर्वसामान्याना वाटू शकते. पण, आज प्रदेश संघटनेत सरळसरळ जी फूट पडलेली दिसून येते त्याची त्यांनी कल्पना केली नसावी किंवा अंदाज त्यांना नसावा, हे पटत नाही. गिरीश चोडणकर हे एक वेगळेच रसायन आहे, पण तेही एक स्वप्न उराशी बाळगून आहेत. स्वप्ने पहाणे वा ती उराशी बाळगून रहाणे हे चुकीचे आहे, असे मी म्हणणार नाही पण त्यासाठी आधी पक्षासाठी, संघटनेच्या पूर्ण बांधणीकरिता योगदान दिले असते, तर कदाचित त्यांना आज कोणी आडकाठी आणण्याचा प्रश्नच उपस्थित झाला नसता. प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या आपल्या नियुक्तीची स्वतःलाच कल्पना नव्हती, हे त्यांचे सांगणे कोणालाही न पटणारे आहे. खासदारासहित ती कोणालाच नसावी, याचेही आश्चर्य वाटते. पण एखादे 'लक्ष्य' डोळ्यांसमोर ठेवूनच त्यांनी हे पद मिळवले असेल वा ते गोव्यात आले असतील तर त्यांना व्यापक हित डोळ्यांसमोर ठेवूनच कार्य पुढे न्यावे लागेल. विजय सरदेसाई यांच्यासारखा अभ्यासू, तडफदार नेता काँग्रेस पक्षाशी हात मिळवण्यास तयार असताना भलताच विचार करून त्यांना शक्यतो दूर ठेवण्यावर भर दिला गेला असेल, तर ती काँग्रेसची मोठी चूक होती आणि आता ती सुधारल्यानेही काही फरक पडेल असे वाटण्याजोगी स्थिती नाही.

आम आदमी पार्टी आणि गोवा रिव्हॉल्युशनरी पार्टी या अजून दोन विरोधी पक्षांबाबतही आज तरी काही विशेष लिहिण्यासारखे नाही.  आम आदमीने मागील निवडणुकीत दोन जागा जिंकून आपले अस्तित्व सिद्ध केले होते. मात्र त्यानंतर पक्षाची वाढ अपेक्षित वेगाने झालेली दिसत नाही. दिल्ली आणि पंजाबमधील राजकीय घडामोडींमुळे गोव्यातील संघटनात्मक विस्तारावर मर्यादा आल्याचे जाणवते. पक्ष काही मतदारसंघांत सक्रिय असला तरी राज्यव्यापी पर्याय म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात त्याला अजून यश आलेले नाही. आरजीपी हा पक्ष एक पर्याय म्हणून मागील निवडणुकीत पुढे आला होता आणि आमदार वीरेश बोरकर यांनी तर विधानसभेत या पक्षाला मोठे राजकीय भवितव्य असल्याचेच आपल्या कामगिरीने दाखवून दिले, पण हा पक्षही फुटीच्या मार्गावरून चाललेला दिसत आहे. निवडणुकीत व्यापक प्रभाव निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली संघटनात्मक ताकद त्यांच्याकडे अजून दिसत नाही. काही मतदारसंघांत ते निकालावर परिणाम करू शकतात एवढेच. अशा पार्श्र्वभूमीवर पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत सत्तारूढ पक्षांसमोर हे पक्ष आव्हान कसे उभे करणार हा मोठा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाने निवडणुकीच्या दृष्टीने ठोस आणि व्यापक तयारी सुरू केल्याचे चित्र अद्याप दिसत नाही. विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव, नेतृत्वाचा प्रश्न आणि संघटनात्मक कमकुवतपणा यामुळे आगामी निवडणुकीत भाजपच बाजी मारून जाईल, असे आजचे चित्र आहे. विजय सरदेसाई तर एकट्यानेच शिवधनुष्य उचलण्याच्या 'भीष्मप्रतिज्ञा' करून बसले आहेत. 'ऑपरेशन विजय'चे 'विजय ऑपरेशन' होऊ नये म्हणजे मिळवली. निवडणूक चुरशीची करण्यात विरोधक यशस्वी ठरले, तरी ते अर्धी लढाई जिंकल्याचे म्हणता येईल.


- वामन प्रभू

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९