पणजी :गोवा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) अधीक्षक एडवीन कुलासो यांना कथित पोर्तुगीज नागरिकत्व प्रकरणी राज्य सरकारने तातडीने निलंबित केले आहे. या कारवाईचा अधिकृत आदेश दक्षता खात्याचे संचालक अमरसेन राणे यांनी सोमवारी जारी केला.
जन्म आणि विवाह नोंदणीची माहिती समोर
मिळालेल्या माहितीनुसार, एडवीन कुलासो यांनी २००८ मध्ये स्वतःच्या जन्म नोंदणीची आणि २००९ मध्ये विवाहाची नोंदणी पोर्तुगालमधील लिस्बन येथील केंद्रीय नोंदणी कार्यालयात (सीआरओ) केल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणाची पहिली तक्रार २०२१-२२ दरम्यान राज्याच्या गृहखात्याकडे आली होती.
त्यावेळी कुलासो यांच्याकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता त्यांनी असे काही नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर गृहखात्याने प्राथमिक चौकशी करून सरकारला अहवाल सादर केला होता.
केंद्रीय गृहखात्याकडून मिळाली गोपनीय माहिती
२०२६ मध्ये केंद्रीय गृहखात्याने कुलासो यांच्या विदेशवारीसंदर्भात काही गोपनीय माहिती राज्याच्या गृहखात्याला दिली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी २००८ मध्ये जन्म नोंदणी केल्याचे तसेच विवाहासाठी एका महिन्याची रजा घेतल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, त्यांनी सरकारची पूर्वपरवानगी न घेता युनायटेड किंग्डमचा प्रवास केल्याचेही चौकशीत आढळून आले. त्यानंतर २००९ मध्ये विवाह नोंदणीसाठी दुबईमार्गे पोर्तुगालला गेल्याची माहितीही पुढे आली.
- पोर्तुगीज नागरिकत्व असल्याच्या आरोपांची सरकारने गंभीर दखल घेतली.
- गृहखात्याला सखोल प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले.
- परवानगीविना परदेश प्रवास आणि विदेशात नागरिकत्व लाभ घेतल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा चौकशीत करण्यात आला.
- या अहवालाच्या आधारे दक्षता खात्याने निलंबनाचे आदेश जारी केले.
- निलंबनानंतर कुलासो यांना गृह खात्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाईची शक्यता
पोलीस खात्यात पोर्तुगीज नागरिकत्व घेतल्याचा संशय असलेले आणखी काही कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरोधातही चौकशी आणि कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर सरकारी खात्यांतील अशा कर्मचाऱ्यांचीही माहिती मागविण्यात आल्याचे समजते.
पुढील काही महिन्यांत एडवीन कुलासो भारतीय पोलीस सेवेसाठी (आयपीएस) पात्र ठरणार होते. पोलीस अधीक्षकांच्या पात्रता यादीत त्यांचा क्रमांक दुसरा होता. पहिल्या क्रमांकावरील गुरुदास गावडे यांचे वय ५६ वर्षे पूर्ण झाल्याने ते आयपीएस पदोन्नतीसाठी पात्र नव्हते. त्यामुळे पुढील विचार कुलासो यांच्या नावावर होण्याची शक्यता होती. मात्र निलंबनाच्या कारवाईमुळे त्यांची पदोन्नतीची संधी धोक्यात आली आहे.
- एटीएस अधीक्षक एडवीन कुलासो निलंबित.
- २००८ मध्ये जन्म नोंदणी आणि २००९ मध्ये विवाह नोंदणी पोर्तुगालमध्ये केल्याचा आरोप.
- परवानगीविना विदेश प्रवास केल्याचे चौकशीत समोर.
- गृहखात्याच्या अहवालानंतर दक्षता खात्याची कारवाई.
- इतर सरकारी कर्मचाऱ्यांवरही चौकशीची शक्यता.
- आयपीएस पदोन्नतीची संधी धोक्यात.


