म्हापसा पोलिसांचा जबाब : सीसीटीव्हीत संशयास्पद काही नाही

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गावसावाडा, म्हापसा येथील सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा याला मारहाण सोडाच आम्ही हातही लावलेला नाही, असा दावा म्हापसा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबात केला आहे. पोलीस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही पोलीस धमकावत किंवा मारहाण करत असल्याचे आढळलेले नाही.
पोलीस खात्यातर्फे सॅम्युअलच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी व मंगळवारी अधीक्षक कर्पे यांनी घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पर्वरी येथील आपल्या कार्यालयात चौकशी करून जबाब नोंद केला. चौकशीत पोलिसांनी सॅम्युअलला मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावला. आम्ही त्याला हात लावला नाही किंवा धमकीही दिली नाही. गुन्हा नोंदवल्यानंतर कायद्यानुसार त्याला नोटीस दिली. नोटिसीत दुसऱ्या दिवशी स्थानकात हजर राहण्याची अटही घातली होती, असा जबाब पोलिसांनी दिला आहे.
पोलीस स्थानकातील जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी अधीक्षक कर्पे यांनी केली. त्यात संशयास्पद काहीच सापडले नाही. स्टेशन हाऊस अधिकारी कक्ष, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक केबिन व ज्या खोल्यांमध्ये सॅम्युअल पोलिसांसमवेत गेला होता, तेथील फुटेज तपासण्यात आली. मात्र त्यात पोलिसांनी हात उगारल्याचा प्रकार आढळलेला नाही.
४ जून रोजी कचरा फेकण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओतील दुचाकीच्या क्रमांकावरून दुचाकी मालकाचा पत्ता पोलिसांनी शोधला. दुचाकीच्या मालक सॅम्युअलची आई जेनेव्हिव्ह ब्रागांझा होत्या. त्यांना चौकशीसाठी पाचारण केले. त्या दुपारी ४ च्या सुुमारास आपल्या मुलीसमवेत आल्या. त्यांनी नंतर पोलिसांच्या सूचनेनुसार सॅम्युअललाही पोलीस स्थानकात बोलावून घेतले. तो ४.४५ च्या दरम्यान स्थानकात आला. चौकशीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला व नोटीस दिली. रात्री ९.२० च्या सुमारास नोटीस घेऊन तो आई व बहिणीसोबत स्थानकातून बाहेर पडला. रात्री १२.४९ च्या सुमारास त्याला मृतावस्थेत म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. असा घटनाक्रम पोलिसांनी जबाबात नोंदवला आहे.
दरम्यान, सोमवारी पोलीस अधीक्षक कर्पे यांनी म्हापसा पोलीस स्थानकाला भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली होती. तर सायंकाळी पर्वरी येथील उत्तर गोवा पोलीस मुख्यालयात काही अधिकार्यांनी बोलावून त्यांची बाजू जाणून घेतली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व दस्तावेज ताब्यात घेतले होते.
दरम्यान, ज्या व्यक्तीने कचरा टाकण्याच्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता, त्याची पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली. व्हायरल व्हिडिओमध्ये सॅम्युअल कचरा टाकताना दिसत नाही; मात्र तो कचरा टाकल्याची कबुली देत आहे. अर्धवट चित्रित व्हिडिओ व्हायरल करून सॅम्युअलची बदनामी करणाऱ्या युवकावर गुन्हा नोंदवायला हवा होता; परंतु पोलिसांनी सॅम्युअलवरच गुन्हा दाखल केल्याने मानसिक तणावातून त्याला आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा दावा ब्रागांझा कुटुंबियांनी केला आहे. आत्महत्येस कारणीभूत सर्वांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत सॅम्युअलच्या आईने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
डोळ्यावरील दुखापत पोलीस स्थानकातून बाहेर पडल्यानंतरची
सॅम्युअलने रात्री १२.३० च्या दरम्यान आत्महत्या केली. गुन्हा नोंद झाल्यावर पोलीस स्थानकातून तो रात्री ९.२० वाजता आई व बहिणीसोबत बाहेर पडला होता. त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे शवचिकित्सेतून स्पष्ट झाले आहे. ती दुखापत पोलीस स्थानकातून बाहेर पडल्यावर झाल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेच्या रात्री ९.२० ते १२.३० यावेळेत सॅम्युअल घरीच होता की कुठे गेला होता, याचा तपास पोलीस करत आहेत.