जून महिन्याचे आगमन, पहिल्या पावसाचा सुगंध, जंगलातील झरे आणि पेट्रोलच्या दिव्याचा तो काळ... बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर बालपणातील सुवर्णक्षणांना आणि गोव्यातील अस्सल पावसाळी संस्कृतीला दिलेला हा एक सुंदर उजाळा.

जून न महिना कोणाला आवडत नाही असं कधी होणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत जून महिना सगळ्यांचा प्रिय असतो. मे महिन्याचे कडक ऊन आणि गरमी मग उत्सुकता असते ती पावसाच्या पहिल्या सरीची. मुलांना उत्सुकता असते ती आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाची. नवा वर्ग, पुस्तके, दप्तर, रेनकोट, छत्री, सगळं काही नवीन. शिवाय नवीन मित्र मैत्रिणी आणि नवीन शिक्षक वर्ग. त्यात शाळेत जाताना पाऊस आला तर अती आनंद.
आम्ही लहान असताना कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडायचे मी तर अजून होड्या करून पाण्यात सोडते. आम्ही गावात राहायचो त्यामुळे आम्ही जंगलातील वाहत्या झऱ्यावर अंघोळ करायला जायचो कधी तरी काजू बागायतीमध्ये आम्हाला रुजलेले काजू मिळायचे ज्याला आपण घोडकां असे म्हणतो. त्या घोडकांची गरम मसाला घालून आमटी किंवा भाजी बनवली जायची. आमचे काका रात्रीचे कंदील घेऊन चढणीचे मासे पकडायला जायचे कधीकधी खेकडे पण मिळायचे. थंडगार पाऊस, चमकणारी वीज, घडघडायचा आवाज, मग करंट जायचा. करंट गेला की आमची आजी पेट्रोलचा दिवा लावायची. पेट्रोलचा दिवा पाहणारी आमची ही शेवटची पिढी असणार कारण आमचा मुलांनी पहिल्या आहेत त्या फक्त मेणबत्त्या. आजी अस पण म्हणायची की आधी गावात वीज नव्हती आणि आमचे बाबा काका ह्या पेट्रोलचा दिव्यावर अभ्यास करायचे. त्यावेळी कधी कधी रात्रभर वीज नसायची तरी आम्ही शांत झोपायचो कारण आत्ता सारखं पहिली उकडत नव्हतं आणि कौलारू घरात जास्त गरमी होतच नव्हती. माकड उड्या मारून घराची कोल फोडायचा. त्या कौलातून पाणी गळायचं आणि पाणी गळायला लागलं की आमचा काका त्या कौलात माडाचे एक पान घालायचा. मग त्या पूर्ती गळण बंद. आणिदुसऱ्या दिवशी कौलावर प्लास्टिक ताडपत्री घातली जायची.
विहिरी, नद्या तुडुंब भरायच्या. शेतात, रस्त्यात पाणी साचायचे. रस्त्यात साचलेल्या त्या पाण्यात चालायला वेगळीच मजा यायची. रस्त्यावर व घरा शेजारी छोटे छोटे कासव दिसायचे. त्या कासवांना आम्ही बादलीत घालून त्यांचा सोबत खेळायचो व नंतर त्यांना सोडायचे. बेडुक डराव डराव असा आवाज काढायला लागला की आम्ही पण डराव डराव करायचो. पाय वाटेवर पाणी झऱ्या प्रमाणे वाहून यायचे त्यात आम्ही उड्या मारायचो. पहिल्या पावसात आईने बनवलेली कांदा भजी व कोरा चहा. जून महिन्याच्या पहिल्या रविवारी चिकन किंवा मटण व सोबत गरमा गरम तांदळाची भाकरी मन अगदी प्रसन्न करून टाकायची. पण आत्ताच्या ह्या मुलांना पहिल्या पावसात मॅगी, पिझ्झा, शौरमा या सारखे पदार्थ खायला आवडतात.
जून महिन्याची आणखी एक कमाल म्हणजे पावसाळी रानभाज्या. ज्या पावसाळी रानभाज्या आपण बाजारातून विकत घेऊन खातो त्या आपल्याकडे अशाच उपलब्ध असायच्या. फडशी, टाळखिळा, कुड्डु, सुरणाच्या पाल्याची कोवळी भाजी, रानटी कारल या सारख्या भाज्या पावसाळ्यात मिळायचा. सुरणाच्या कोवळ्या पाल्याची भाजी व टाळखिळा कुड्डुच्या भाजीत तूर दाळ, फणसाच्या आठळ्या व खोबर घातलं की भाजी अधिक रुचकर लागायची. संध्याकाळी कधीतरी साठवून ठेवलेल्या काजू बिया चुलीत भाजून खाल्ल्या जायच्या. शेतात पेरणीसाठी आजी आजोबा जायचे तेव्हा घोंघे घेऊन यायचे ज्याला आपण कोकणी भाषेत कोंगे असे म्हणतो. ते बहुतेक शेतातच सापडतात. घोंगे उकडुन त्यातल मास काढून आई त्याची आमटी बनवायची व सोबत नाचणीच्या गरमा गरम भाकऱ्या. एका रविवारी आमचा कडे वाढणीं असायची म्हणजे आजी सांगायची की आमचा जो राखणदार आहे त्याला गोठ्यात भात शिजवून तो केळीचा पानावर जंगलात संध्याकाळी वाढायचा असतो. जून महिन्याचा त्या आठवणी कागदावर लिहून सुधा कमी पडणार खरच खूप आठवण येते लहानपणाची.

- निकिता कांदोळकर
कांदोळी, बार्देश - गोवा