उलगडा

सततच्या कौतुकामुळे बालमनावर उमटणारे ओरखडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गैरसमजांवर बोट ठेवणारी ही कथा. मुलांची तुलना न करता, त्यांच्यातील सुप्त गुणांची पारख करण्याचा संदेश यात अत्यंत प्रभावीपणे दिला आहे.

Story: आठवणींचे पंचामृत |
05th June, 09:24 pm
उलगडा

तुरी, गजरा आणि त्यांची इतर भावंडे आपल्या आई-वडिलांच्या सोबत एका छोट्याशा रूममध्ये भाड्याने राहत होती. तुरी आणि गजरा ही त्यांची टोपण नावे. तुरीच्या शेंगासारखी लांब, बारीक म्हणून तिला 'तुरी' म्हणायचे आणि गजऱ्यासारखे डोळे असणारी ती 'गजरा'. वडिलांची कार कुणाची, नोकरी इथे गावापासून शहराकडे लांब, भाड्याने राहणे, कुटुंब सांभाळणे, गावाकडे लक्ष देणे यात त्यांची अगदी दमछाक व्हायची. म्हणून त्यांची सहचारिणी त्यांना मदत म्हणून जमेल ते काम करायची. दोन घरांची भांडी-धुणी, रॉकेलचा खर्च वाचवावा म्हणून लाकडे आणणे, शेणी थापणे ही कामे ती करायची. ती इतरांसोबत थोडी शेतात पण जायची; जेणेकरून थोडेफार गावठी कडधान्य पावसात मिळेल. पोह्यांचा भात हवा म्हणून भातही कापायला जायची. ही सर्व कामे करताना तिची मुलेसुद्धा त्यांच्यासोबत जायची, आईला मदत करायची.

इतर मुले शाळेतून आली, अभ्यास झाला की खेळायला जायची आणि ही मुले अभ्यास, आईला मदत करून शेवटी शेवटी खेळायला जायची. इतर मुले तीन-साडेतीन वाजता जायची, पण या मुलांना कधी वाटलेच नाही की आपण एवढ्या लवकर खेळायला जावे. मात्र जेव्हा ती खेळायला जायची, तेव्हा त्यांना खेळात घेतले जात नव्हते; आणि घेतलेच तर शेवटी शेवटी शेवटचा खेळाडू म्हणून ती त्यांचा खेळ बघत उभी राहायची. गट झाले तर दोन्ही गटांतही शेवटी वाटणी! हे मात्र कुठेतरी त्या बालमनांना खटकायचे. त्यांच्या मनात सतत प्रश्न पडायचा की, आमच्याशी अशी का वागतात? या गावचे नाही म्हणून? की आम्ही चांगली दिसत नाही म्हणून, की आम्हाला चांगले खेळता येत नाही म्हणून...? प्रश्न खूप असायचे, पण त्यांनी कधी ते स्वतःशी किंवा आई-वडिलांनाही बोलून दाखवले नाही. कारण बाहेरून एकही तक्रार घरात येता कामा नये, हे पहिल्यांदाच आईने खडसावून सांगितले होते; आणि तसे केल्यास खेळायला पाठवणार नाही हेही सांगितले होते. त्यामुळे घरीही कसली तक्रार नसायची.

हाच अनुभव घेत ती मोठी होत होती. मात्र दरवर्षी हाच अनुभव त्यांच्या वाट्याला यायचा आणि या गोष्टी काही मनातून जायच्या नाहीत. का बरं ही मुलं आमच्याशी अशी वागतात? थोडी मोठी झाल्यानंतर ती मुले दुसऱ्या गावात भाड्याने राहायला लागली. आता सर्व मुले कॉलेजला जात होती. गजरा तर पुढील शिक्षणासाठी शहरात लांब जात होती. तिथेच तिची एक सुट्टीवर येणारी श्रीमंत बालमैत्रीण भेटली, जी शहरात शिकायची. खूप वेगवेगळे खेळ शिकवणारी, गाणी शिकवणारी तीही तिथेच शिकत होती.

जेव्हा ती गजराला भेटली, तेव्हा तिने घरी येऊन तुरीला ती भेटल्याचे सांगितले. तेव्हा तुरी म्हणाली, "नको त्यांच्या गोष्टी! त्या लहान असताना आम्हाला बाजूला ठेवायच्या, चुकून कधीतरी खेळायला घ्यायच्या."

"अगं, हे तू अजून लक्षात ठेवले आहेस?"

आता ती अधूनमधून रोज गजराला भेटत होती. बोलता बोलता बालपणाच्या गोष्टी आठवून तीही सहज गजराला म्हणाली, "गेले ते छान छान दिवस! खूप मज्जा यायची गावी. एवढे सगळे कष्ट करूनही तू माझ्यासोबत इथेच प्रवेश मिळवलास? खूप बरे वाटले. लहान असताना तुम्हाला आम्ही खेळायला घ्यायचो नाही, ती चूक आता समजते; पण आता कुठे येणे-जाणे असते ती चूक सुधारायला!"

"पण आम्ही तुम्हाला का खेळायला घेत नव्हतो माहित आहे?"

"नाही, कारण असे करायला काय झाले होते कुणास ठाऊक? submodule तुमचे ते वागणे आजन्म प्रश्नच बनून राहिले आहे, उत्तर नाही मिळाले."

"मी सांगते थांब. अगं काय नाही, आजोबा-आजी, आई-बाबा सतत तुमचे कौतुक करायचे. 'त्या बघा कशा काम करतात आणि शाळेतही जातात, खेळतातही; आणि तुम्ही...? आडवी काठी उभी करत नाही!' तुमचे सततचे कौतुक ऐकले की तुम्हाला पाहून राग यायचा व आम्ही तुम्हाला खेळायला घ्यायचो नाही."

गजराने डोक्याला हात लावला. बालपणापासून तारुण्यापर्यंत भेडसावणाऱ्या प्रश्नाचा 'उलगडा' झाला होता... उत्तर मिळाले होते... आणि हे सर्व तिला बहिणीला सांगेपर्यंत धीर नव्हता.

वरील सर्व ऐकताना कितीही मनावर ताबा ठेवला, तरी नकळत तुरीच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब अलगत गालावरून ओघळला आणि ती म्हणाली, "मोठ्या माणसांनी आपल्या मुलांसमोर दुसऱ्यांचे किती कौतुक करावे? त्याचे मन दुखावते मग... सकारात्मक दृष्टिकोनातून कौतुक केले असते, तर दोन-दोन मने दुखवली गेली नसती आणि एवढे मोठे गैरसमजही झाले नसते. हे गैरसमज बालपणापासून तारुण्यापर्यंत राहिले होते, ते आता उघडकीस आले. त्या नकारातही ती कौतुकास पात्र ठरली होती." नंतर दोघी एकमेकीकडे बघून मनापासून हसल्या.

ही आठवण सांगताना आजही असे वाटते की, दुसऱ्याचे जास्त केलेले कौतुक कोणालाही आवडत नाही. दुसऱ्याबद्दल सहज म्हणून काही सांगितले, तरी मुलांचे असे असते. "मग मी काय करू म्हणतेस?" किंवा "मग तुला काय सांगायचे आहे?" तू कितीही सहज म्हणून सांग, पण त्यांना वाटतं की आपली आई आपली बरोबरी त्याच्याशी करते आहे... असे बहुतेक वेळा होते. शाळेतही असेच कळत-नकळत हुशार मुलांचे कोडकौतुक होऊन जाते. पण जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तसे प्रत्येक मूल सारखे नसते आणि प्रत्येक मुलात एक विशेष गुण असतो. त्याची पारख करून त्याचे कौतुक करणे गरजेचे असते. सकारात्मक दृष्टीने, अलगत मन न दुखवता आपल्याला जे काही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे, ते पोहोचवायचे असते; असे तुरीला वाटून गेले.


- संतोषी शामसुंदर महाले

पर्वरी (९४२०५९४८५९)