म्हणतो एक, करतो एक!

म्हणतो एक आणि करतो एक! विचार आणि वर्तनातील याच विसंगतीला मानसशास्त्रात 'कॉग्निटिव्ह डिसोनन्स' म्हणतात. मानवी मनाच्या या रंजक कसरतीवर आणि आत्मजागरूकतेवर प्रकाश टाकणारा हा एक सोपा आणि प्रबोधनात्मक लेख.

Story: मनी मानसी |
05th June, 09:18 pm
म्हणतो एक, करतो एक!

रात्री अकरा वाजता मोबाईलवर रिल्स पाहत बसलेल्या व्यक्तीने अचानक स्वतःला सांगितलं, "उद्यापासून बस्स! स्क्रीन टाइम कमी करायचा."

दोन मिनिटांनी त्याच व्यक्तीने ‘फक्त एक शेवटची रिल’ पाहिली.

मग आणखी एक, एक करत रिल्सचीच एक माळ विणली जाते..आणि ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ असा बिचारा तो फोन आळवणी करत बापुडवाण्या नजरेने तुमच्याकडे पाहत राहतो! 

आता हे वाचताना तुम्ही नक्कीच हसत असाल, कारण या गोष्टीत तुम्हाला स्वतःचा चेहरा थोडाफार दिसला असेलच. अहो, आपल्यापैकी बहुतेक जण आरोग्य महत्त्वाचं आहे म्हणतात, पण व्यायाम मात्र टाळतात. पैशांची बचत करायला हवी असं मानतात, पण सेलमध्ये नको त्या वस्तू विकत घेतात. मुलांशी शांतपणे बोलायला हवं असं वाटतं, पण कधीकधी चिडून ओरडतात.

मग प्रश्न पडतो, आपल्याला योग्य काय आहे हे माहिती असूनही आपण वेगळंच का वागतो?

मानसशास्त्रात याला ‘कॉग्निटिव्ह डिसोनन्स’ म्हणतात अर्थात ‘विचार आणि वर्तनातील विसंगती’

हे नाव जरी मोठं आणि किचकट वाटलं तरी त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपला विश्वास, मूल्ये आणि कृती यांच्यात विसंगती निर्माण झाली की मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. होतं काय की, मनाला सुसंगती आवडत असते. "मी चांगला आहे" अशी आपली स्वतःबद्दलची प्रतिमा असते. पण आपल्या वागण्यातून त्या प्रतिमेला तडा गेला की मन बेचैन होतं.

आणि मग सुरू होतं मनाचं वकीली काम.

एका मुलाच्या आईला हल्ली भेटले होते. ती सतत मुलाला सांगायची, “मोबाईल कमी वापर. डोळे खराब होतात.”

पण मुलगा गृहपाठ करत असताना तिचा स्वतःचा फोन मात्र तिच्या हातातून खाली राहत नसे. सकाळपासून रात्रीपर्यंत व्हॉट्सअॅप, फेसबुक, रिल्स आणि ऑनलाईन शॉपिंग सुरू असायचं.

जेव्हा मी सहज विचारलं, “तुमचा स्क्रीन टाइम किती असेल?” तेव्हा ती लगेच म्हणाली, “माझं वेगळं आहे. माझी कामं फोनवर असतात.”

कदाचित काही प्रमाणात ते खरंही असेल. पण त्यांच्या त्या उत्तरात मानवी मनाची एक सुंदर कसरत लपलेली होती. स्वतःच्या वागण्यातील विसंगती स्वीकारण्यापेक्षा तिचं समर्थन करणं आपल्या मनाला जास्त सोपं वाटतं.

ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याची गोष्टही अशीच. स्वतःला अत्यंत प्रामाणिक समजणारा हा गृहस्थ ऑफिसमधल्या काही स्टेशनरीच्या वस्तू घरी घेऊन जायचा. त्याला ते चुकीचं वाटत नव्हतं. कारण त्याचं मन त्याला सांगत होतं, “मी इतकं काम करतो कंपनीसाठी. एवढं तर चालतं.”

खरं बघायला गेलं तर, कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजे आपल्या मनाने स्वतःलाच दिलेला एक दिलासा. मनोविश्लेषणाच्या दृष्टीने पाहिलं तर ही गोष्ट आणखीच रंजक वाटते. फ्रॉईडने सांगितलेल्या अनेक संरक्षण यंत्रणांपैकी एक म्हणजे “रॅशनलायझेशन” म्हणजेच आपल्या कृतीसाठी तर्कशुद्ध कारणं शोधणं. जेव्हा वास्तव आणि स्वतःची आदर्श प्रतिमा यांच्यात संघर्ष होतो, तेव्हा मन लगेच एखादं स्पष्टीकरण तयार करतं.

“मी चुकीचा नाही.”

“परिस्थिती अशी होती.”

“सगळेच करतात.”

“हा अपवाद होता.”

या वाक्यांच्या मागे अनेकदा कॉग्निटिव्ह डिसोनन्स लपलेला असतो.

मात्र याचा अर्थ आपण ढोंगी आहोत असा अजिबात नाही बरं! उलट ही आपल्या मानवी मनाची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण सर्वजण कधी ना कधी या अवस्थेतून जातो. त्यामुळे इथे प्रश्न हा नाही की आपल्या आयुष्यात विसंगती आहे का.. प्रश्न हा आहे की आपण ती ओळखतो का?

  स्वतःला दोष देऊ नका.

  विसंगती दिसली की तिच्याकडे कुतूहलाने बघा.

  स्वतःला विचारा, मी काय मानतो? मी काय करतो?

  दोघांमध्ये अंतर किती आहे?

  स्वतःशी प्रामाणिक संवाद हा पहिला उपाय आहे.

अशावेळी कदाचित पुढच्या वेळी आपण एखाद्या गोष्टीचं समर्थन करत असू, तेव्हा हे छोटे प्रश्न स्वतःला नक्की विचारा. 

कारण मनाची खरी परिपक्वता स्वतःला नेहमी योग्य सिद्ध करण्यात नसते. ती स्वतःच्या विसंगतींकडे प्रामाणिकपणे पाहण्यात असते.

आणि कदाचित तिथूनच आत्मजागरूकतेचा खरा प्रवास सुरू होतो.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४