
राज्यात गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. घरातील आणि कामावरील तणाव, सकस आहाराचा अभाव, फास्ट किंवा जंक फूड खाण्याचे वाढते प्रमाण, व्यसनाधीनता, मद्यपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव अशा विविध कारणांमुळे या व्याधी बळावत आहेत. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, वंध्यत्व आणि पक्षाघात यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने नुकत्याच जारी केलेल्या 'राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-६' (एनएफएचएस-६) अहवालाने यावर शिक्कामोर्तब केले असून, गोव्यातील या आजारांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असणे ही नक्कीच चिंतेची बाब आहे.
यापूर्वीच्या 'एनएफएचएस-५' (२०१९-२१) नुसार राज्यात १५ वर्षांवरून अधिक वयाच्या पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण २४.१ टक्के, उच्च रक्तदाबाचे प्रमाण २६.८ टक्के तर लठ्ठपणाचे प्रमाण ३२.६ टक्के होते. नुकत्याच (२०२३-२४ च्या आकडेवारीवर आधारित) जारी झालेल्या 'एनएफएचएस-६' अहवालात हे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढून अनुक्रमे ३२.१ टक्के, २७.५ टक्के आणि ४३.६ टक्के झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत राज्यातील १५ वर्षांवरील महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण २०.८ टक्क्यांवरून २७.५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर लठ्ठपणाचे प्रमाण ३६.१ टक्क्यांवरून ४५.१ टक्के झाले आहे. विशेष म्हणजे, आता ग्रामीण भागातील महिला व पुरुषांमध्येही उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. असे असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी तातडीने जीवनशैलीत बदल करणे अनिवार्य आहे. यासाठी सर्वप्रथम जिभेवर ताबा आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. बाहेरील तेलकट खाद्यपदार्थ, फास्ट फूड आणि जंक फूड खाणे पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. अन्नपदार्थ घरपोच करणाऱ्या 'फूड डिलिव्हरी अॅप्स'चा वापर थांबवून याची सुरुवात करता येईल. जिभेला काय आवडते, यापेक्षा शरीरासाठी काय योग्य आहे, याचा विचार करून सकस आणि संतुलित आहार घ्यावा. आहारासोबतच नियमित व्यायामाला पर्याय नाही. दिवसातून किमान ४० मिनिटे शरीर सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी जिम, सायकलिंग, पोहणे, चालणे किंवा धावणे यांपैकी आवडीनुसार पर्याय निवडता येतील. वेळेअभावी किमान २० मिनिटे घरात योगसाधना करावी. आपल्या आवडी-छंदांना वेळ दिल्यास दैनंदिन तणावापासून मुक्ती मिळू शकते.
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच टाटा मेमोरियल आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत राज्यातील १ लाख लोकांच्या अनुवंशिकता, जीवनशैली आणि पर्यावरणीय प्रभावाचा पुढील २० वर्षे अभ्यास करून हृदयरोग, मधुमेह, कर्करोग व श्वसनाचे विकार यांसारख्या आजारांची मूळ कारणे शोधली जाणार आहेत. सरकारचे हे पाऊल स्वागतार्ह असले, तरी लोकांनी केवळ सरकारी अभ्यासावर अवलंबून न राहता स्वतःच्या आहारात आणि दैनंदिन सवयींमध्ये वेळीच बदल करणे हेच उत्तम आरोग्याचे खरे सूत्र आहे.
- पिनाक कल्लोळी