कारचालकासह युवती जखमी : दोन्ही कारचे नुकसान

फोंडा : बोणबाग-बेतोडा येथील धोकादायक वळणावर सोमवारी दुपारी एका सुसाट कारने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एक कार चालक आणि एक युवती जखमी झाली आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेली कार एक युवती चालवत असल्याचा प्राथमिक संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला असून, जखमी युवतीला पोलिसांपासून लपवून गुपचूप मडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिक वाढले आहे. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीए-०८-एबी-८६३९ क्रमांकाची कार खांडेपारहून मडगावच्या दिशेने जात होती. बोणबाग-बेतोडा येथील तीव्र आणि धोकादायक वळणावर कारचा वेग इतका जास्त होता की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. ही कार सर्वप्रथम रस्त्यावरील दुभाजकावर (डिव्हायडर) चढली आणि थेट चुकीच्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या जीए-०५-एफ-२५३२ क्रमांकाच्या कारला धडकली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात खांडेपार येथील कार चालक जॉन हा जखमी झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारमध्ये सुमारे ६ पेक्षा जास्त युवक आणि युवतींचा भरणा होता. अपघातानंतर कारमधील एक युवती गंभीर जखमी झाली. मात्र, तिला पोलीस येण्यापूर्वीच दुसऱ्या एका कारमधून मडगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. विशेष म्हणजे, ही युवती जखमी झाल्याची कोणतीही माहिती कार मालक किंवा त्यांच्या मित्रांनी पोलिसांना दिली नाही. ही बाब लपवून ठेवल्यामुळे सदर कार ती जखमी युवतीच चालवत असावी, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
अपघात घडल्यानंतर घटनास्थळी वृत्तांकन आणि छायाचित्रण करण्यासाठी गेलेल्या स्थानिक पत्रकारांशी कार मालकाच्या मित्रांनी विनाकारण वाद घातला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कारचे फोटो घेण्यास त्यांनी पत्रकारांना मज्जाव केला, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला आणि पत्रकार कमालीचे संतापले. मात्र, जखमी युवतीला पोलिसांना न कळवता गुपचूप अपघातस्थळावरून का पळवून नेले? असा रोखठोक सवाल पत्रकारांनी विचारताच कार मालकाच्या मित्रांची बोलती बंद झाली आणि त्यांना गप्प राहावे लागले.
फोंडा पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून, मडगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या त्या संशयित युवतीची आणि कार मालकाची चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.