सोलापुरातील कंत्राटदार सतीश भोसलेंचा कांदोळीतील समुद्रात बुडून मृत्यू

अल्पवयीन मुलगी सुदैवाने बचावली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st June, 11:23 pm
सोलापुरातील कंत्राटदार सतीश भोसलेंचा कांदोळीतील समुद्रात बुडून मृत्यू

म्हापसा : गोव्यात आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी आलेले महाराष्ट्रातील सोलापूर येथील प्रसिद्ध कंत्राटदार आणि व्यावसायिक सतीश उद्धव भोसले (वय ५४, रा. जुळे, सोलापूर) यांचा उत्तर गोव्यातील कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (१ जून) सकाळी ८.३० वा. च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. आपल्या डोळ्यांदेखत कुटुंबप्रमुखाचा अंत झाल्याने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले कुटुंब गेल्या २८ मे रोजी गोव्यात पर्यटनासाठी आले होते आणि ते कांदोळी येथील वोयो हॉटेलमध्ये मुक्कामास होते. सोमवारी सकाळी सर्वांनी एकत्र नाश्ता केला आणि त्यानंतर ते फेरफटका मारण्यासाठी कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर गेले. यावेळी सतीश भोसले हे आपल्या १६ वर्षीय मुलीसह समुद्रस्नानासाठी पाण्यात उतरले, तर कुटुंबातील इतर सदस्य किनाऱ्यावरच थांबले होते.
बाप-लेक पाण्यात असतानाच अचानक आलेल्या एका मोठ्या आणि वेगवान लाटेने त्या दोघांनाही समुद्राच्या आत ओढले. या लाटेच्या तडाख्यातून मुलगी कशीबशी पाण्याच्या बाहेर किनाऱ्यावर आली. मात्र, आपले वडील पाण्यात कुठेच दिसत नसल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलीचा आवाज ऐकून किनाऱ्यावरील नातेवाईक आणि तेथे तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तत्काळ धाव घेतली.
जीवरक्षकांनी समुद्राच्या पाण्यात शोधमोहीम राबवून सतीश भोसले यांना बाहेर काढले. त्यांना बेशुद्धावस्थेत तातडीने कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सतीश भोसले यांचा मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला. दुपारी शवचिकित्सा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली असून, पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहिल वायंगणकर पुढील तपास करत आहेत.
सोलापूर महानगरपालिकेत बडे प्रस्थ
मयत सतीश भोसले हे सोलापूर महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात एक परिचित आणि नामांकित कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. याशिवाय सोलापूर परिसरात त्यांचा वाळू, मुरूम आणि बांधकाम साहित्याचा मोठा व्यवसाय होता. एक मनमिळाऊ, प्रामाणिक आणि अत्यंत शांत स्वभावाचे व्यावसायिक म्हणून त्यांची सोलापूरमध्ये ख्याती होती. त्यांच्या या अचानक जाण्याने सोलापूरच्या व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.