मांडवीतील कॅसिनोंना दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर !

‘इनफ इज इनफ’ची राज्यपालांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st June, 11:46 pm
मांडवीतील कॅसिनोंना दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर !

पणजी : मांडवी नदीतील कॅसिनोंना वारंवार दिली जाणारी मुदतवाढ ही गोवा सार्वजनिक जुगार कायदा, १९७६ च्या तरतुदींना विरोधात असल्याचा आरोप करत ‘इनफ इज इनफ’ चळवळीने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्याकडे केली आहे.
कॅसिनो संचालन, परवाना मुदतवाढ आणि कायद्याच्या अंमलबजावणीसंबंधी सर्व बाबींची सखोल व निष्पक्ष चौकशी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ‘इनफ इज इनफ’ संघटनेने राज्यपालांकडे केली आहे.
संघटनेचे नेते तथा माजी न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांनी राज्यपालांना सादर केलेल्या निवेदनात, ६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वजनिक सभेत मांडवी नदीतील कॅसिनो बाहेर हलविण्याचा ठराव मंजूर झाल्याची माहिती दिली. सरकारने अनेकदा कॅसिनो स्थलांतराचे आश्वासन दिले असले, तरी त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा दावा करण्यात आला.
निवेदनानुसार, १८ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाने ऑफशोर कॅसिनोंच्या परवान्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली. या निर्णयाची चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच २०२० मध्ये सुधारित कॅसिनो कायदा लागू झाल्यानंतरही त्यासंबंधीचे नियम अद्याप तयार न झाल्याबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.