दूध दरवाढीबाबत बैठकी​चे आश्वासन मिळाल्याने उत्पादकांचे समाधान

तूर्त माघार : गोवा डेअरीच्या कार्यालयात केले ठिय्या आंदोलन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st June, 11:51 pm
दूध दरवाढीबाबत बैठकी​चे आश्वासन मिळाल्याने उत्पादकांचे समाधान

फोंडा : गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्याने संतप्त झालेल्या गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांनी सोमवारी सकाळी डेअरीच्या कुर्टी-फोंडा येथील मुख्य कार्यालयावर धडक दिली. दिवसभर चाललेल्या तीव्र ठिय्या आंदोलनानंतर, सायंकाळी सरकार नियुक्त समितीचे सदस्य डॉ. रामा परब यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन ९ जून रोजी या संदर्भात विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उत्पादकांनी आपले आंदोलन तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला.
अखिल गोवा दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकळ्येकर, लक्ष्मण जोशी, प्रमोद सिद्धये व अन्य राज्यांतील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही महिन्यापूर्वी दूध उत्पादकांनी दरात वाढ देण्याची मागणी केली होती. त्यासाठी गोवा डेअरीच्या गेटसमोर आंदोलनही केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी तोडगा काढण्यासाठी खास बैठक घेऊन सरकारतर्फे गोवा डेअरीला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. पण, मे महिन्यात गोवा डेअरीने दूध विक्रीत २ रुपयांची वाढ केली. पण अजून दरवाढ दिली नसल्याने संतप्त झालेल्या दूध उत्पादकांनी नाराजी व्यक्त करून गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक नवीन कुमार यांच्याशी चर्चा केली. पण, व्यवस्थापकीय संचालक नवीन कुमार यांनी दरवाढीसंबंधी अजूनपर्यंत काहीच पत्र व्यवहार सरकारकडून झाला नसल्याचे उत्तर मिळाल्याने दूध उत्पादकांनी दुपारी कार्यालयात ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतला. पण, संध्याकाळी डॉ. रामा परब यांनी दूध उत्पादकांची भेट घेऊन चर्चा केली. दूध दरवाढीचा निर्णय घेण्यासाठी दि. ९ रोजी खास बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर दूध उत्पादक माघारी परतले.
डेअरीच्या ढिसाळ कारभारामुळेच निर्णय प्रलंबित
पत्रकारांशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकळ्येकर यांनी सांगितले की, गोवा डेअरी प्रशासनाने पशुसंवर्धन खात्याकडे योग्य प्रकारे पाठपुरावा केला नसल्यानेच दूध दरवाढीचा हा निर्णय प्रलंबित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. ९ जून रोजी होणाऱ्या खास बैठकीत यावर निश्चित आणि कायमस्वरूपी तोडगा निघेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील पाऊल उचलण्याचा इशाराही उत्पादकांनी दिला आहे.