गोव्यात इंधन वापरात लक्षणीय वाढ

उत्तर गोवा आघाडीवर; दक्षिण गोव्यात डिझेलला अधिक मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st June, 11:36 pm
गोव्यात इंधन वापरात लक्षणीय वाढ

पणजी : मे महिन्याच्या पहिल्या २८ दिवसांत गोव्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वापरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत दुहेरी अंकांची वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्यात उत्तर गोवा इंधन वापरात आघाडीवर असला तरी दक्षिण गोव्यात, विशेषतः डिझेलच्या मागणीत, मोठी वाढ दिसून आली आहे.
तेल विपणन कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, राज्यातील पेट्रोलचा एकूण वापर ११.७ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी २४,२७१ किलो लिटर असलेला पेट्रोल वापर यंदा २७,१०९ किलो लिटरवर पोहोचला. तर डिझेलचा वापर १६.१४ टक्क्यांनी वाढून २१,१६९ किलो लिटरवरून २४,५८५ किलो लिटर झाला.
उत्तर गोवा इंधन वापरात अव्वल
राज्यातील एकूण पेट्रोल विक्रीपैकी सुमारे ६० टक्के आणि डिझेल विक्रीपैकी ६२ टक्क्यांहून अधिक वाटा उत्तर गोव्याचा आहे. उत्तर गोव्यात पेट्रोलचा वापर १४,६०५ किलो लिटरवरून १६,१६० किलो लिटरपर्यंत वाढला, तर डिझेल विक्री १३,४१५ किलो लिटरवरून १५,३३० किलो लिटरपर्यंत पोहोचली.
द. गोव्यात डिझेलच्या मागणीत सर्वाधिक वाढ
दक्षिण गोव्यात पेट्रोलचा वापर १३.३ टक्क्यांनी वाढून ९,६६६ किलो लिटरवरून १०,९४९ किलोलीटर झाला. डिझेलच्या विक्रीत सर्वाधिक १९.३६ टक्के वाढ नोंदली गेली असून खप ७,७५४ किलो लिटरवरून ९,२५५ किलो लिटर झाला आहे.
दोन्ही जिल्ह्यांत वाढती मागणी
आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्तर गोव्यात पेट्रोलच्या वापरात १,५५५ किलो ‍लिटर आणि डिझेलच्या वापरात १,९१५ किलो लिटर वाढ झाली आहे. तर दक्षिण गोव्यात पेट्रोलच्या वापरात १,२८३ किलो ‍लिटर आणि डिझेलच्या वापरात १,५०१ किलो लिटर वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे राज्यातील इंधन वापराचा वाढता कल पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.      

हेही वाचा