काँग्रेस स्थापन करणार गोव्यात लोकांचे सरकार!

गिरीश चोडणकर : हरवळे येथे घेतले श्री रुद्रेश्वराचे दर्शन

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
01st June, 11:07 pm
काँग्रेस स्थापन करणार गोव्यात लोकांचे सरकार!

हरवळे-साखळी येथे श्री रुद्रेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर. सोबत आमदार कार्लुस फरेरा, प्रवीण ब्लेगन, धर्मेश सगलानी, मंगलदास नाईक, अर्चित नाईक, प्रसिदिनी गावस, खेमलो सावंत व इतर.

साखळी : गोव्यात विकासाच्या नावाखाली अत्याचार, रोजगाराच्या नावाखाली घोटाळा, भ्रष्टाचार सुरू आहे. यावर मात करण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली असून, येणारे सरकार हे लोकांचे सरकार असणार. गोव्यात सध्याच्या सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. या विरोधात काँग्रेस पक्ष येणाऱ्या निवडणुकीत मोठी मजल मारून सत्ता स्थापन करणार, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हरवळे येथे केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर चोडणकर यांनी हरवळेत उपस्थिती लावून श्री रुद्रेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी हळदोणेचे आमदार कार्लुस फरेरा, साखळीचे नगरसेवक प्रवीण ब्लेगन, माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, मंगलदास नाईक, काँग्रेस युवा अध्यक्ष अर्चित नाईक, साखळी महिला अध्यक्षा प्रसादिनी गावस, झरीन शेख, खेमलो सावंत, जना भंडारी व काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी साखळीतील पक्षाचे नेते एकत्रित आल्याचे दिसून आले.
गोव्यात सध्या दलालांचे राज्य सुरू असून, केवळ भ्रष्टाचार व घोटाळे सुरू आहेत. विद्यमान सरकारमध्ये पैशालाच महत्त्व असल्याने लोकांमध्ये बरीच नाराजी आहे. त्यासाठी लोक विरोधात संघटित होत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकांचा रोष दिसून येणार व काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार, असे यावेळी हळदोणेचे आमदार कार्लुस फरेरा यांनी म्हटले.
यावेळी नगरसेवक प्रवीण ब्लेगन यांनी, काँग्रेस पक्षात आता नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, सर्वांनी संघटित होऊन काम करण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन केले.
पैसे, सत्तेसाठी बळी न पडणाऱ्यांना उमेदवारी !
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे २१ आमदार निवडून एक भक्कम सरकार स्थापन करणार असून, या सरकारात पैसे व सत्तेसाठी बळी न पडून पक्षांतर करणार नाही अशा लोकांनाच उमेदवारी देऊन निवडून आणणार, असे गिरीश चोडणकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.