
रेखा पौडवाल लिखित 'भावस्पंद' हा कथासंग्रह स्त्रीवादी साहित्याचा सुंदर नमुना आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घडामोडी आणि आपल्याच जीवनात भेटणाऱ्या अनेक स्त्रिया या कथासंग्रहातील कथांमधून आपल्याला भेटतात. स्त्री जीवनाचे अनेक पैलू त्या निमित्ताने आपल्याला अनुभवता येतात. स्त्री जीवन अनेक चढ-उतारांनी भरलेले पाहायला मिळते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्त्री सत्वपरीक्षा देत असते. ती कितीही विकसित आणि पुढारलेली असली, तरी आजही समाजबंधनांची चौकट पार करताना अनेकदा तिची अवस्था विवश होताना दिसते. आई-वडिलांकडे असताना मुलगी म्हणून सतत तिला जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. लग्न झाल्यावर सासरी तिच्याकडे आदर्श पत्नी, सून, आई अशा दृष्टीने पाहिले जाते. या सगळ्यात तिच्या भावभावना, तिच्या अंतरीच्या वेदना शमवणारे कोणीतरी क्वचित तिला भेटते अन् तिची आयुष्यरुपी वेल बहरते. ती तिची ध्येये साध्य करते; मात्र याच नाण्याची दुसरी बाजू अनुभवताना काही स्त्रिया अगदीच बेदरकारपणे, स्वैरपणे उधळतात. त्यांना इतरांच्या भावनांची कदर नसते. अशा दोन्ही स्वभावांचे चित्रण लेखिकेने समर्पकतेने केले आहे.
या कथासंग्रहात एकूण सत्तावीस लहान-मोठ्या कथा आहेत. या कथासंग्रहाला अशोक नाईक अर्थात 'पुष्पाग्रज' यांची प्रस्तावना लाभलेली आहे. उदयसिंग राणे यांनी मुखपृष्ठावर रेखाटलेले भावूक डोळ्यांच्या स्त्रीचे सुबक चित्र वाचकाचे लक्ष वेधून घेते आणि कथासंग्रहाच्या अंतरंगात डोकावण्यास भाग पाडते. सदर कथांमध्ये गोमंतकीय जीवनाचे चित्रण बऱ्यापैकी दिसून येते. उच्चस्तरीय तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांची वर्णने यात आली आहेत. मुंबई आणि गोवा या ठिकाणी घडणाऱ्या या कथा आहेत. फोंडा, मडगाव, शिरगाव, करंजाळे, केरी, पारोडा या ठिकाणांचा उल्लेख कथांमध्ये आढळतो. शिरगावच्या लईराई देवीची जत्रा, गोव्यात वावरणारा गावडा समाज, इथली खाद्यसंस्कृती विशेषतः तळलेले मासे, माशांचे हुमण, उडीदमेथी, कोंकणी भाषेतील संवाद, कुळागरे, देटली, मल्लां, आगळ, सोलां, व्हीर, मिरी, भिंडे (भिरंडा), इथली नारळांची भाटं, माड (पोफळी), मिरवेली, आंबा, फणस, नागवेली, केळी, पपई, पपनस अशी निसर्गाची सुंदर वर्णने लेखिकेने केली आहेत.
आपल्यावर अन्याय करणाऱ्या व्यसनाधीन पतीची हत्या करणारी निर्भीड नायिका, पहिल्या प्रेमाला न विसरून अपेक्षाभंग करणारी नायिका, मुलीच्या प्रेमासाठी आसुसलेली आई, मानलेल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात उभा ठाकणारा बाप, जीवनभर काळजी घेतलेल्या पत्नीच्या वियोगात स्मृती जपणारा नवरा, स्वार्थापोटी दूर करणारी जन्मदात्री, सावत्र असूनही प्रेम करणारी यशोदा, कमी जातीत जन्मूनही जिद्दीने पुढे जाणारी मंगला, स्वप्नातून खऱ्या आयुष्यात राजकुमार मिळवणारी स्वरूपा, सासूला दूर लोटून जीवनाच्या शेवटी चूक उमगलेली रमा, हट्टापायी दुप्पट वयाच्या माणसाशी लग्न करून फरफट झालेली संगीता अशा व्यक्तिरेखा या कथांमध्ये भेटतात.
पहिल्या प्रियकराला दुसऱ्या वेळी भेटलेल्या व्यक्तीमध्ये शोधणारी रेषा, दुसऱ्याशी विवाहबद्ध होऊनही पहिल्या प्रियकरासाठी वटपौर्णिमा पुजणारी सुनीता, कडक शिस्तीत वाढलेली पण लग्नानंतर स्वैराचार करणारी मोहिनी, उशिराने प्रेम व्यक्त करण्यासाठी गेलेल्या राजेशला लागलेला चटका, भोंदू बुवांवर वक्रदृष्टी असलेली सुशीला, दुसऱ्या बाईशी स्वैराचार करण्यासाठी परिवर्तनाचे नाटक करणारा वर्षाचा नवरा, लग्नाची पत्नी घरी असताना दुसऱ्या बाईला राजरोसपणे घरी आणणारा सुधाचा नवरा, लग्नानंतर केवळ तिला दूषणे देऊन तिची घुसमट वाढवणारा तिचा नवरा, नवऱ्याचे भाकीत खरे ठरावे म्हणून आत्मबलिदान करणारी सावित्री, गोड बोलून अनेकांचा विश्वासघात करणारा राजू, देवाच्या दारी करुणा भाकून आपले सौभाग्य वाचवणारी सरिता, सुनेची लाचारी न खपवून घेणारी सासू, आत्म्याच्या रूपाने आपली अबोल प्रीती व्यक्त करणारी सुरेखा या पात्रांमुळे हा कथासंग्रह जिवंत वाटतो.
वयाने लहान असणाऱ्या प्रियकराने केलेली प्रतारणा सोसणारी सुजाता, स्वार्थी प्रियकराला धुडकावून समाजसेवेत समाधान मानणारी सुधा, मातृत्वाचे सुख अनुभवताना सौभाग्याला मुकलेली सुजाता आणि प्रेमापोटी लग्न झालेल्या ध्येयवेड्या अनघाच्या वाटेला आलेली निराशा या कथांमध्ये पाहायला मिळते. ही पात्रे आपल्या आजूबाजूला वावरत असतात. या घटना साध्याच असल्या, तरी त्यांना कथाबद्ध करण्याचे कसब लेखिकेने सुंदररित्या साधले आहे. कथांची भाषा सरळ, सोपी आणि प्रवाही आहे. "संयोग आणि दैवयोग म्हणजेच जीवन", "भृंगाने सुंदर मनोहारी खांब पोखरावा तशी तिची अवस्था झाली", "काड्यांच्या पेटीत फुलपाखरू तडफडावे तसे तिचे झाले होते", "स्वर्गीचे आणि गर्भीचे कोणी सांगू शकत नाही" अशा सुभाषितवजा वाक्यांची कथांमध्ये रेलचेल बघायला मिळते. कथांमधील सहज प्रसंगवर्णने वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. स्त्री विश्वाच्या समृद्ध जाणिवांना जाणून घेण्यासाठी सर्वांनी नक्कीच वाचावा असा 'भावस्पंद'..!
कथासंग्रह : स्त्री जाणिवांचा 'भावस्पंद'..!
लेखिका : रेखा पौडवाल

- अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा