संवेदनशील वन्यजीव

निसर्ग केवळ 'बळी तो कान पिळी' या नियमावर चालत नाही, तर त्यात करुणाही आहे. प्राण्यांमधील दत्तक विधान, मातृत्वाची ओढ आणि शोक व्यक्त करण्याच्या भावूक प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख.

Story: साद निसर्गाची |
09th May, 11:03 pm
संवेदनशील वन्यजीव

सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांनी बांधलेल्या माणसाला ‘सामाजिक प्राणी’ असे संबोधले जाते. ही नैतिक मूल्ये, शिस्तबद्धता, बुद्धीचातुर्य, विचारक्षमता प्राण्यांमध्ये नसते, असे सर्रास मानले जाते. प्राणी असंवेदनशील असतात असे गृहीत धरूनच आपण चालतो. पण हे पूर्णतः खरे नाही. वन्यजीवांची संवेदनशीलता दर्शवणारी कितीतरी उदाहरणांची नोंद आहे. त्यातील एक उदाहरण म्हणजे प्राण्यांचे इतर प्रजातीच्या पिल्लांना दत्तक घेणे. अनाथ मुलांना दत्तक घेणे ही मनुष्यकुळात मानवतेची सर्वोत्तम सेवा मानली जाते. ही संवेदनशीलता प्राण्यांमध्येही दिसून येते. कुत्री, मांजरी, माकडे, अगदी कित्येक वेळा वाघ, सिंह देखील इतर प्राण्यांच्या पिल्लांना आपल्या पिल्लांसारखे वाढवत असल्याची नोंद आहे. दत्तक घेण्याची ही प्रक्रिया माणसांप्रमाणे जाणीवपूर्वक जरी होत नसली तरी प्राण्यांमध्ये दत्तक घेण्याची होत असलेली ही प्रक्रिया त्यांच्यातील करुणा आणि जिव्हाळ्याची भावना दर्शवते.

श्वान मांजराच्या पिल्लाला दूध पाजताना आणि सांभाळ करताना पाहिल्याची नोंद आहे. मांजर श्वानाच्या पिल्लांना आपल्या पिल्लांसारखे वाढवताना मी स्वतः पाहिले आहे. माकड देखील इतर प्राण्यांच्या पिल्लांची काळजी घेतल्याची उदाहरणे आढळतात. नामीबियातील एटोशा नॅशनल पार्कमध्ये सिंहिणीने हरिणाच्या पिल्लाला काही काळ संरक्षण दिल्याची घटना प्रसिद्ध आहे. स्वतःचे पिल्लू गमावल्यानंतर, एका सिंहिणीने स्प्रिंगबॉक जातीच्या हरिणाच्या पिल्लाला दत्तक घेतल्याची घटना हल्लीच समोर आली होती. तिने या पिल्लाला इतर हिंस्र प्राण्यांपासून वाचवले आणि काही काळ सांभाळले. **२००३** साली केनियातील सांबुरू अभयारण्यात सिंहिणीने एकाच नाही, तर तब्बल सहा वेळा 'ऑरिक्स' जातीच्या हरिणाच्या पिल्लांना दत्तक घेतले होते. ही घटना जगभरात खूप प्रसिद्ध झाली होती. टांझानियातील गोरोंगोरोत एका सिंहिणीने बिबट्याच्या पिल्लाला जवळ करून त्याला दूध पाजल्याची दुर्मिळ घटना घडली होती. वाघिणीने डुकराच्या पिल्लांना स्वीकारल्याचा प्रसंग नोंद झाला आहे. हे प्रकार जरी क्वचितच घडत असले तरी ही उदाहरणे प्राण्यांमधील मातृत्वाची भावना, सहानुभूती आणि संरक्षणाची नैसर्गिक प्रवृत्ती दर्शवतात. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, स्वतःची पिल्ले गमावल्यानंतर, आईच्या नात्याने मादीच्या मातृत्वाची भावना टोकाला पोहोचते. अशा परिस्थितीत, ती शिकार करण्याऐवजी पिल्लाचे संरक्षण करते व त्यांना आईची माया देते.

जसे माणूस जवळच्या व्यक्तीला गमावल्यावर शोक किंवा दुःख व्यक्त करतो, त्याचप्रमाणे अनेक प्राणी आणि पक्षी देखील त्यांचे प्रियजन गमावल्यानंतर तीव्र दुःख व्यक्त करतात. काही प्राणी आपल्या कळपातील सदस्य मरण पावल्यानंतर शोक व्यक्त करताना पाहिल्याचीही नोंद आहे. गजराज, आपल्या कळपातील एखादा सदस्य मरण पावल्यास मृत सदस्याच्या हाडांना किंवा शरीराला स्पर्श करतात व काही वेळ त्याच्या जवळ शांत उभे राहतात. देवमासा मृत पिल्लाला किंवा सदस्याला अनेक दिवस आपल्या पाठीवर किंवा तोंडाने ढकलत फिरतो. प्राण्यांची संवेदनशीलता दर्शवणारे आणखीन एक उदाहरण म्हणजे ‘क्रो फ्युनरल’. एखादा कावळा मेला की कावळे मोठ्या आवाजात ओरडतात आणि एकत्र येतात. कदाचित ही त्यांची शोक प्रकट करण्याची पद्धत असावी. इतर पाळीव प्राण्याच्या किंवा मानवी साथीदाराच्या मृत्यूवर नैराश्य व्यक्त करणारे श्वानाचे उदाहरण आपण सर्वांनी हल्लीच काणकोणमध्ये पाहिले.


- स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)