IAS परीक्षेसाठी यशाचा मार्ग : अभ्यास आणि नियोजन

लोकांमध्ये असा एक भ्रम आहे की ही परीक्षा अतिशय अवघड असते, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. जर तुम्ही सुयोग्य वेळेचे व्यवस्थापन, पद्धतशीर अभ्यास आणि नियमित मनन केले, तर कोणतीही परीक्षा अशक्य नाही.

Story: यशस्वी भव: |
09th May, 10:55 pm
IAS परीक्षेसाठी यशाचा मार्ग : अभ्यास आणि नियोजन

U​PSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) मार्फत दरवर्षी देशपातळीवरील प्रशासकीय गरजांनुसार IAS, IPS, IFS यांसारख्या साधारण २१ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. ही परीक्षा केवळ हुशारीची नसून ती तुमच्या संयमाची आणि व्यक्तिमत्त्वाची कसोटी पाहणारी असते. या परीक्षेचे स्वरूप प्रामुख्याने तीन टप्प्यांत विभागलेले आहे: Prelims (पूर्व परीक्षा), Mains (मुख्य परीक्षा) आणि Interview (मुलाखत).

परीक्षेचे स्वरूप आणि गुणविभागणी

पूर्व परीक्षेत ४०० गुणांचे दोन पेपर असतात, जे बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असतात. मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असून त्यात एकूण १७५० गुणांचे ७ पेपर्स असतात. शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत, जी २७५ गुणांची असते. या सर्व प्रवासात विषयाचे सखोल आकलन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही एखादा विषय किती खोलवर समजून घेतला आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते.

पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी

पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवर प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या पेपरमध्ये (CSAT) विद्यार्थ्याचे आकलन, संवाद कौशल्य, तार्किक विचार आणि मूलभूत गणिती क्षमता तपासली जाते. मुख्य परीक्षेत मात्र तुमच्या लेखनाची आणि विचारांच्या स्पष्टतेची चाचणी होते. एखाद्या विषयावर तुम्ही किती मुद्देसूद निबंध लिहिता आणि तुमचे विचार किती प्रभावीपणे मांडता, याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यासाठी 'अवांतर वाचन' हा कणा आहे.

महत्त्वाची संदर्भ पुस्तके आणि साधने

अभ्यासासाठी योग्य साहित्याची निवड करणे हे यशाचे अर्धे साधन आहे.

  इतिहास आणि भूगोल: NCERT ची ११ वी व १२ वीची पुस्तके, अर्जुन देव यांचे 'वर्ल्ड हिस्ट्री' आणि 'ऑक्सफर्ड अॅटलास'.

  राज्यशास्त्र: एम. लक्ष्मीकांत यांचे 'इंडियन पॉलिटी' आणि बासू यांचे 'कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया'.

  अर्थशास्त्र आणि विज्ञान: 'इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया' आणि दर महिन्याला प्रकाशित होणारे 'सायन्स रिपोर्ट'.

  चालू घडामोडी: 'The Hindu' आणि 'Indian Express' यांसारखी किमान ४ वर्तमानपत्रे रोज वाचली पाहिजेत. तसेच 'इंडिया टुडे' आणि 'कॉम्पिटिटिव्ह सक्सेस' सारख्या मासिकांचा आधार घ्यावा.

व्यक्तिमत्त्व विकास आणि शिस्त

केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर प्रशासकीय दृष्टीकोन विकसित करावा लागतो. टीव्हीवरील बौद्धिक चर्चा (Intellectual Debates) पाहणे, क्विझ स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि शक्य असल्यास स्वतःची एक छोटी लायब्ररी तयार करणे फायदेशीर ठरते. राज्य सरकारची कार्यपद्धती, पंचायतीपासून ते पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंतचे नियोजन, अधिकार आणि कर्तव्ये यांचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक आहे.

यशाचा कानमंत्र

लोकांमध्ये असा एक भ्रम आहे की ही परीक्षा अतिशय अवघड असते, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. जर तुम्ही सुयोग्य वेळेचे व्यवस्थापन, पद्धतशीर अभ्यास आणि नियमित मनन केले, तर कोणतीही परीक्षा अशक्य नाही. तुमची स्मरणशक्ती, लिखाणाची सवय आणि विचारांमधील ठामपणा तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवेल. एकदा का तुम्ही मनाशी ठाम निश्चय केला, की सर्व मार्ग आपसूक खुले होतात.

शिस्तबद्धता, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल, तर प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते.


- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, ९८७५४४५३९९

(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)