बायकोने नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे भल्या पहाटे वडे तयार करायला घेतले. रात्रीच वड्यांची सगळी तयारी करून ठेवली होती. सगळीकडे सामसूम असताना तिने पहिला वडा तेलात सोडला. त्याबरोबर 'सळ सळ' असा आवाज झाला. ह्या आवाजाबरोबर मोठी मुलगी उठली…

एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला सात मुली होत्या. दारिद्र्य त्याच्या पाचवीला पुजलेले. भिक्षुकी करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. भिक्षुकी काय रोज आणि तीही पोटभर मिळणार? त्यात नऊ जणांचा संसार. सर्वांना घास घास अन्न मिळायचे. कधी पोट भरायचे, तर कधी अर्धपोटी झोपावे लागायचे. गरिबीमुळे भटजी आपल्या मुलींचा राग राग करायचा. आपल्या माथ्यावर असलेले ओझे, असेच त्याला या मुलींकडे बघून वाटायचे. शिवाय प्रत्येक भाकरीच्या तुकड्याचे सात तुकडे अधिक व्हायचे ते वेगळेच.
एके दिवशी भटजींना वडे खावेसे वाटले. गूळ घालून केलेले तांदळाचे वडे. नुसत्या कल्पनेने भटजींच्या तोंडाला पाणी सुटले. भिक्षुकी करून आणलेले तांदूळ बायकोकडे देत भटजी म्हणाले, “हे बघ, हे थोडेसे तांदूळ आहेत. याचे पीठ कर आणि माझ्यासाठी भल्या पहाटे गूळ घालून वडे कर. पण एक लक्षात ठेव, तुझ्या सातही मुलींना याचा पत्ता लागू देऊ नकोस. नेहमीप्रमाणे सगळ्या उठतील आणि सगळे वडे स्वतःच खाऊन टाकतील, शेवटी मला एक घासही उरणार नाही.”
बायकोने नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे भल्या पहाटे वडे तयार करायला घेतले. रात्रीच वड्यांची सगळी तयारी करून ठेवली होती. सगळीकडे सामसूम असताना तिने पहिला वडा तेलात सोडला. त्याबरोबर 'सळ सळ' असा आवाज झाला. ह्या आवाजाबरोबर मोठी मुलगी उठली. तिने बघितले तर घरभर वड्यांचा घमघमाट सुटलेला आहे. ती चुलीकडे गेली. बघते तर आईने गरमागरम वडा नुकताच कढईत सोडला होता. वडा पाहून थोरलीच्या तोंडाला पाणी सुटले. “आई, मला वडा दे ना.” आईला 'नाही' म्हणावेना. तिने पहिला वडा हळूच थोरल्या मुलीच्या हातावर ठेवला आणि तिला सांगितले, “गुपचूप खा बाळा, इतर कोणाला सांगू नको.” वडा खाऊन थोरली मुलगी झोपायला गेली. झोपता झोपता हळूच तिने दुसऱ्या मुलीला चिमटा काढला.
चिमटा काढल्याबरोबर दुसरी मुलगीही जागी झाली. तिने पाहिले की आई वडे भाजत आहे. तिलाही वडा खावासा वाटला. आईकडे तिनेही वड्यासाठी हट्ट धरला. आईने तिलाही वडा देऊन सांगितले की तिसरीला सांगू नको. पण दुसरीने वडा खाऊन झोपताना तिसरीला चिमटा काढला. अशाप्रकारे तिसरीने चौथीला, चौथीने पाचवीला करत करत सातही मुली एकेक करून उठल्या आणि वडा खाऊन झोपी गेल्या. करता करता सगळे वडे संपले. शेवटी भटजी उठला, त्याने आपल्या बायकोकडे वडे मागितले, तर बायकोने वडे संपल्याचे सांगितले. ह्या मुलींमुळे आपल्या तोंडात वड्याचा एक तुकडाही पडला नाही, याचा भटजीला खूप खूप राग आला. 'आता या मुलींचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे' असा विचार करता करता त्याने एक युक्ती काढली, त्यानंतरच भटजी झोपी गेला.
सकाळ झाली. भटजी सगळ्या मुलींना म्हणाला, “चला मुलींनो, आज आपण सगळेजण रानात लाकडे गोळा करायला जाऊया.” सातही मुली आपल्या वडिलांच्या मागोमाग निघाल्या. भटजी त्यांना मोठ्या अरण्यात घेऊन गेला. तिथे एका ठिकाणी भटजी सगळ्या मुलींना ठेवत म्हणाला, “बाळांनो, तुम्ही इथे छोटी-मोठी लाकडे गोळा करा. मी जरा कुठे मोठे सुकलेले झाड मिळते का हे बघून येतो.” असे म्हणून भटजी मुलींना तिथेच सोडून पुढे गेला. पुढे एका ठिकाणी, मुलींना लाकडाचा 'टकटक' आवाज येईल इतपत दूर जाऊन त्याने एक योजना केली. एक लाकडाचा छोटा ओंडका घेतला आणि तो एका सुकलेल्या लाकडाच्या फांदीला बांधला. हा ओंडका असा बांधला की तो वाऱ्याच्या वेगासह लाकडाच्या बुंध्याला आपटत राहील. ओंडका आपटत असताना त्याचा 'टकटक' असा आवाज येऊ लागला; जणू काही कोणीतरी लाकूड तोडत आहे. आपल्याला अपेक्षित आवाज आल्याची खात्री पटताच भटजी मुलींना जंगलात सोडून माघारी घरी परतला.
इकडे सातही मुली निर्धास्तपणे लाकडे गोळा करत होत्या. लाकडे गोळा करता करता आपले बाबा कुठे आहेत, याचा त्या आवाजावरून अंदाज घेत होत्या. तो ओंडका बुंध्याला आपटून जो आवाज येत होता, तो आपले वडील लाकूड तोडत असल्याचाच आहे असे मानून मुली आपले नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करत होत्या. बघता बघता संध्याकाळ झाली, पण तरीही वडील परतले नाहीत. आवाज मात्र सतत येत आहे, हे पाहून मुली घाबरल्या. सगळ्याजणी आवाजाचा वेध घेत घेत त्या सुकलेल्या झाडापाशी पोहोचल्या. तिथे पोहोचताच तो आवाज नेमका कुठून येत होता, हे त्यांना समजले. आता मात्र मुली खूप घाबरल्या.
हळूहळू संध्याकाळ संपून दिवस रात्रीकडे झुकत होता. अफाट रानामधला काळोख घनदाट होत होता. जवळपास माणसाचा कोणताही मागमूस नव्हता. त्यांनी घाबरून जाऊन मोठमोठ्याने बाबांना हाका मारायला सुरुवात केली. पण बाबा तिथे असते तर त्यांनी हाकेला साद दिली असती. ते तर मुलींना सोडून कधीचेच घरी परतले होते; हे त्या बिचाऱ्या मुलींना कुठे माहिती होते?
थोरलीने विचार केला, 'आता इथे जास्त वेळ थांबून उपयोग नाही. रात्र वाढेल तशी जंगली श्वापदे आपापल्या गुहेतून बाहेर पडतील. त्या श्वापदांनी आम्हाला बघितले तर आम्ही त्यांच्या तोंडात सापडू, त्यांना आयती शिकार मिळेल. त्यापेक्षा हे जंगल सोडून आपण कुठल्यातरी लोकवस्तीच्या जवळ जाणे गरजेचे आहे.' थोरल्या बहिणीने आपले विचार इतर बहिणींना सांगितले. सगळ्यांना तिचे म्हणणे पटले, पण ह्या घनदाट अरण्यातून बाहेर कसे निघायचे, हे कोणालाच समजेना.
त्या सगळ्यांमध्ये सर्वात लहान बहीण मोठी हुशार होती. तिने पाहिले की, जमिनीवरून काही मुंग्या एका रेषेत कुठेतरी जात आहेत. त्या मुंग्या इतर बहिणींना दाखवून ती म्हणाली, “ह्या मुंग्या नक्कीच कुठल्यातरी घरात आपले जेवण शोधण्यासाठी जात असतील. आपण जर ह्या मुंग्यांचा पाठलाग केला, तर नक्कीच कुठल्या ना कुठल्या घराजवळ पोहोचू.” सगळ्याच बहिणींना तिचा हा विचार पटला. ह्या मुंग्या नक्कीच मानवी वस्तीकडे नेतील, याची सर्वांना खात्री पटली. सातही बहिणी मुंग्यांचा मागोवा घेत घेत चालू लागल्या. बराच वेळ चालल्यानंतर त्यांना दूरवर एक भले मोठे घर दिसले. सगळ्याच बहिणींना आशेचा एक किरण दिसला. त्या लगबगीने घराजवळ पोहोचल्या, पण त्या घरात मात्र एक वेगळेच संकट त्यांची वाट पाहत उभे होते... (क्रमशः)

- गाैतमी चाेर्लेकर गावस