आजोबांच्या आंब्याची राखण करत मारुतीने कष्ट उपसले. आंबे उतरवून आडी लावली आणि मोठ्या आशेने पिवळेधमक आंबे घेऊन कुटुंब बाजार गाठण्यासाठी निघाले. श्रमातून समृद्धी मिळवण्याच्या जिद्दीचा हा प्रवास आहे.

बाजारात विक्रेत्यांनी जागा धरायला सुरुवात केली होती. आज एकाच ठिकाणी जागा धरून तिघेही बसले. आई-बाबांना जरा विश्रांती देऊन एकटाच मारुती आंबे घेऊन बसला. हळूहळू गिऱ्हाईक वाढायला लागलं. एखादी बुट्टी संपली असेल तोवर बाजारात आंबे घेऊन येणारे पण वाढले. आंब्यांचा दर कमी करावा लागला. शंभर रुपये डझनाचा आंबा साठ रुपयांपर्यंत खाली आणावा लागला. दर कमी होईल तसा मारुती आतून दुखावला जाऊ लागला. एवढं सोन्यासारखं आंबं कवडीमोलाने कसं काय विकायचं? त्याला काही उत्तर सापडत नव्हतं.
आंबे स्वस्त व्हायला लागले तसे कुणी मारुतीकडे फिरकेना. बाजारात संमिश्र गोंधळ, गोंगाट, आरोळ्या चाललेल्या आणि तसाच गोंधळ मारुतीच्या मनात उडायला लागला होता. आई-बाबा अजून दर कमी कर म्हणून सांगत होते. शेवटी चाळीस रुपये केले. तरीही एखादं नालायक गिऱ्हाईक आंबे रापून पाही आणि दुसरीकडे जाई. आंब्याची चव बघण्यासाठी एखादा आंबा पिळण्यासाठी असे. गिऱ्हाईक चवीसाठी हात पुढे करत. आंबा हातावर पिळला की चव घेई आणि दर पाडून मागून जाई.
एवढ्यात दोन बागवाणी बाया आंब्याच्या बुट्ट्या विकत घ्यायला बाजार फिरत मारुतीजवळ आल्या. लोंबलेला पदर, तोंडात पान चावत मारुतीला दर विचारायला लागल्या. तोंडातलं पान तिथेच बाजूला थुंकत आंब्याची चव बघायला हात पुढे केला. मारुतीने आंबा हातावर पिळला. दोघींना चांगला लागला पण दर काही पचनी पडला नाही. वीस रुपयांनी डझन मागणाऱ्या त्या बायांना कशाचीच लाज नव्हती. मारुतीचा नकार ऐकताच,
"आम चिकेंजा है... चिकेंजा, देना है तो दे!" (आंब्याला चीक आहे) असं म्हणत, हुज्जत घालत उभ्या होत्या.
शेवटी 'चिकेंजा आम' म्हणत दुसऱ्या आंबेवाल्याला गाठायला गेल्या. या असल्या बायका आज वीस रुपये डझनाने आंबे घेतील आणि पुढला आठवडा शंभर रुपयांनी विकतील. अशा लोकांना दुसऱ्यांच्या कष्टाची किंमत कधी कळत नाही आणि त्याच्याशी त्यांचं काही देणं-घेणंही नसतं.
त्यांच्या हुज्जत घालण्याने मारुतीचा राग अनावर झाला होता. संध्याकाळ झाली आणि बाजार उरकायला लागला. अर्ध्यापेक्षा जास्त आंबे आज शिल्लक राहिले. फुकट असते तर सगळे बुट्टीवर उपडे पडले असते. गिऱ्हाईक यायचे आणि आंबे रापून (हाताने दाबून) बघत, आणि दुसऱ्या आंबेवाल्याकडे जात.
संध्याकाळी बाजाराला येणारा एक मोठा समूह नेहमी आपल्याला दिसतो. अशी लोकं नेहमी संध्याकाळी बाजारात येतात कारण संध्याकाळी सगळा माल स्वस्त मिळतो. विक्रेत्यांना माल संपवून घरी जायचं असतं. ही लोकं मग अख्खा बाजार फिरतात, आधीच दर कमी झालेला असतो त्यातही पुन्हा दर पाडून मागतात. समोर बसलेल्या शेतकऱ्यावर काय गुजरत असते याची त्यांना पर्वा नसते. अशीच काही लोकं मारुतीपुढे आली. संध्याकाळचे सहा वाजले असतील आणि भाव पाडून मागू लागले. असल्या गिऱ्हाईकांमुळे मारुती आता घायकुतीला आला होता. जीवापलीकडे जपलेल्या आंब्यांना कवडीमोल विकताना त्याला प्रचंड वेदना होत होत्या.
सांज होऊन गेली होती. आई मारुतीला म्हणाली,
"मारुती, चल रं पोरा... आवर आता, बास झालं...!"
रागारागाने मारुतीने सगळे आंबे पालथे घातले आणि हातात रिकामी बुट्टी घेऊन तरातरा चालायलाही लागला. पोराची ही अवस्था पाहून आईच्या आणि बाबांच्याही डोळ्यात पाणी आलं. अजून पोराने भरपूर पावसाळे पाहायचे होते. ही तर सुरुवात होती. असे कितीतरी अनुभव येतील; पण खचायचं नाही, हे अजून त्याला कळायचं
होतं.
बाबांनी आईला त्याच्या मागे धाडलं आणि आपण थोडा उरला-सुरला बाजार करून येतो म्हणाले. तिथं पालथ्या घातलेल्या आंब्यांवर मात्र आता फुकटी माणसं आंबे पिशवीत भरायला गर्दी करू लागली.
अंधार पडत होता, या सवयीच्या वाटेवर आई पोराच्या मागे मागे धावतच आली.
"मारुती... मारुती..." हाका मारत ती त्याच्याजवळ पोहोचली. मारुतीचं तोंड रडवेलं झालेलं. आईला समोर बघताच मारुती लहान पोरावाणी रडायला लागला. आईने पदराने डोळे पुसले आणि त्याला सावरलं, समजावलं.
"पोरा, ह्यो बाजार हाय. इथं कधी दर वाढतो तर कधी पडतो. या खेळात आपल्यासारखेच बळी ठरत्यात. म्हणून काय जगायचं सोडायचं?"
आईच्या शब्दांनी मारुतीचा हुंदका थांबला पण मारुती फार दुखावला गेला होता. बाजारातल्या माणसांच्या बाजारू वृत्तीचा आज मारुती बळी ठरलेला होता. असे कितीतरी बळी या अशा बाजारांत दरवेळी जात राहतात. पण बाजार थांबत नाही. तो कुणाला हातभार लावतो तर कधीतरी कुणाला बुडवून मारतो. चालायचं हे...!
एवढ्यात बाबा खांद्यावर बाजाराची पिशवी घेऊन आले. त्यांच्याजवळ येऊन पोहोचले. मारुतीने बापाकडून पिशवी घेतली, बाबांनी काळजीभरला हात पोराच्या गालावरून फिरवला; आणि सगळे चालू लागले.
कधी कधी बाप न बोलताही खूप बोलून जातो, असाच तो क्षण...!
पिशवी खांद्यावर मारून मारुती वाडीच्या वाटेला लागला. थोडा उजेड होता अजून. पोराच्या मागोमाग आई आणि बाबा दोघंही चालत येत होते. अंधार गडद होत होता आणि तरातरा चालणारा मारुती अंधारात नाहीसा झाला. तो खूपच दूर गेला...! या वाटेवर आणि विचारांच्या वाटेवरही...!
बाजार संपला पण त्याने मांडलेल्या बाजाराने मारुतीला नवा धडा दिला होता. अजून खूप पावसाळे बघायचे आहेत हे त्यालाही आता कळून चुकले होते. आयुष्याच्या वळणावर कराव्या लागणाऱ्या कसरती आता कुठे त्याच्या समोर येत होत्या. गडद अंधारात त्याच्या उरातलं दुःखही आज खूप गडद झाले होते. पावलागणिक तो बाजार मागे पडत होता पण एक नवा धडा आज त्याच्या मनात कोरला गेला तो मात्र कायमचा -
“अजून बरेच पावसाळे बघायचे आहेत...!” समाप्त

- प्रा. सागर डवरी, हरमल, पेडणे