ध्येयवादी वास्तुविशारद : केतक नास्नोळकर

गोव्यातील प्रख्यात वास्तुविशारद केतक एस. प्रभू नास्नोळकर यांचे रविवारी, ५ एप्रिल रोजी निधन झाले. सांताक्रूझमधील बोंदिर येथील रहिवासी असणाऱ्या या प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वाने गोव्याच्या स्थापत्यशास्त्रासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.

Story: विचारचक्र |
3 hours ago
ध्येयवादी वास्तुविशारद : केतक नास्नोळकर

उच्च शिक्षण घेऊन परदेशात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक होणारी बरीच मंडळी असतात. त्यांच्या जीवनात पैसा, प्रतिष्ठा आणि मानसन्मान प्राप्त करण्यासाठी सातत्याने धडपड असते. परंतु काही मोजकीच मंडळी त्याला अपवाद असतात. त्यांना मातृभूमीतच स्थायिक होण्यात आनंद वाटतो आणि त्यांची त्यासाठीच सातत्याने धडपड असते. आपल्या जीवनात त्यांनी निश्चित ध्येय समोर ठेवून, विचारांनुसार कार्य करण्याला प्राधान्य दिलेले असते. अशा ध्येयवादी व्यक्तिमत्वांत केतक नास्नोळकर यांचा समावेश होतो.

गोव्यातील प्रख्यात वास्तुविशारद केतक एस. प्रभू नास्नोळकर यांचे रविवारी, ५ एप्रिल रोजी निधन झाले. सांताक्रूझमधील बोंदिर येथील रहिवासी असणाऱ्या या प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वाने गोव्याच्या स्थापत्यशास्त्रासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील.

केतक नास्नोळकर यांनी गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तसेच नवी दिल्लीतील - स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर येथून व्यावसायिक शिक्षणाची पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण व्यावसायिक आयुष्य गोव्याच्या अमूल्य स्थापत्य वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी समर्पित करण्याचा जणुकाही संकल्प केला होता आणि त्यानुसार त्यांनी वास्तुविशारद या नात्याने उल्लेखनीय योगदान केलेले आहे. 

२००३ मध्ये पणजीतील महात्मा गांधी रोडवरील गोविंद बिल्डिंगमधील साध्या कार्यालयातून त्यांनी संवर्धन मोहिमेच्या कार्याचा आरंभ केला होता. गोवा सरकारने जुन्या गोव्यातील चर्चच्या सविस्तर वारसा अभ्यासाचे नेतृत्व करण्यासाठी यापूर्वी जेव्हा केतक नास्नोळकर यांची नियुक्ती केली होती, तेव्हा त्यांनी आपल्या  अभ्यासाच्या आधारे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे कार्य आरंभले होते. बार्देश तालुक्यातील शापोरा किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी त्यांची संवर्धन वास्तुविशारद म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच ३५० वर्षे जुन्या हळर्ण किल्ल्याच्या नूतनीकरणाचे त्यांनी पर्यवेक्षण केले होते. या कामामध्ये जीर्णोद्धार, संरचनात्मक बळकटीकरण आणि माहिती दालनाची निर्मिती यांचा समावेश त्यांनी केला होता. 

राज्य सरकारने स्थापन केलेल्या गोवा राज्य पाणथळ प्राधिकरणाचे तज्ज्ञ सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे योगदान दिले होते. याशिवाय गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले होते. काही दिवसांपूर्वी सरकारने त्यांची गोवा राज्य वारसा धोरण २०२५ तयार करण्यासाठी नियुक्ती केली होती. त्या दृष्टीनेही त्यांनी आपले योगदान दिले होते.

सतत गोवा राज्याच्या शाश्वत विकासाचा ध्यास धरलेले हे व्यक्तिमत्व, एक विद्वान आणि नेहमी संवादासाठी उपलब्ध असणारे असे होते. आपल्या कार्यात तडजोड न करणारी त्यांची सद्सद्विवेकबुद्धी आदर्शवत होती. निर्मितीचा सातत्याने ध्यास आणि त्यासाठी आवश्यक असणारे बौद्धिक भांडवल हे यशाचे गमक असते. जीवनात खूप कमी जण आपणाला आवडणाऱ्या मार्गांचा स्वीकार करून, व्रतस्थपणे कार्य करण्यात आनंदित होतात. त्यासाठी परंपरागत वाटांवर जाण्याऐवजी खडतर, परंतु आगळावेगळा मार्ग स्वीकारण्यात ते धन्यता मानतात.

गोव्याला पौर्वात्य आणि पाश्चिमात्य समन्वयातून जो वास्तुकलेचा वारसा लाभलेला आहे, त्याचा केतक यांनी बारकाईने अभ्यास आणि संशोधन करून वैशिष्ट्ये जाणून घेतली. जेव्हा एखाद्या वारसास्थळाचे संवर्धन करण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला, तेव्हा त्याच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता त्याचे वेगळेपण जपण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांच्याकडे ज्या वास्तूंच्या जीर्णोद्धाराचे प्रस्ताव आले, तिथे त्यांनी आपले कौशल्य पणास लावून गतवैभवाच्या खाणाखुणा जपण्यासोबतच ऊन, पाऊस आणि वादळवारा यांचा मारा सोसण्याची क्षमता नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण केली होती.

पेडणेतील मालपे येथील मुळवीराच्या शतकोत्तर इतिहासाची परंपरा असणाऱ्या मंदिरात देव आणि दानवांतर्फे कार्यान्वित 'अमृतमंथन' देखाव्याचे चित्र 'कावी' शैलीत होते; त्याचे संवर्धन व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न आरंभले होते. गोव्याला लाभलेला कावी चित्रकलेचा समृद्ध वारसा ही या भूमीतील कारागीर आणि कलाकार यांनी भारतीय वास्तुकलेला दिलेली मोठी देणगी आहे, अशी केतक यांची धारणा होती. मंदिरांचा जीर्णोद्धार करताना तेथील शतकोत्तर वारसा सांगणारी कावी चित्रे टिकली पाहिजेत, यासाठी ते नेहमी आग्रही असत. याविषयी मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य असोत वा वारसाप्रेमी, त्यांच्यात जागृती करण्यासाठी ते नेहमी उत्सुक असत. गोव्यातील मंदिरांची वैशिष्ट्ये आणि वैभवाची संचिते टिकवण्यासाठी केतक नास्नोळकर यांनी एक प्रकारे अभियानच राबवले होते.

गोव्यासारख्या राज्यात आजच्या घडीस ज्यांनी वास्तुविशारद म्हणून शिक्षण घेतले, त्यांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, परिसरातील निसर्ग आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाला विशेष महत्त्व न देता, मागणी तसाच पुरवठा करण्याला प्राधान्य दिलेले असते. त्यामुळे एकेकाळी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य वास्तुकलेच्या मिलाफातून गोव्यात उभी राहिलेली जुनी घरे उद्धवस्त करून, त्याजागी नवीन, प्रशस्त आणि अनेक मजली इमारतींच्या बांधकामाला बऱ्याच जणांनी महत्त्व दिले. त्यामुळे आज गोव्याचा सुंदर आणि संस्कृतीप्रधान चेहरा झपाट्याने बदलत आहे, ही वेदनादायी बाब आहे. परंतु याला अपवादही केतक यांच्यासारखे ध्येयवादी वास्तुविशारद असून, त्यांनी दर्जा आणि गुणवत्ता यांच्याशी कधी तडजोड केली नाही. वेळप्रसंगी त्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या. परंतु मनासारखे काम करता यावे यासाठी प्रयत्न आरंभले. गोव्याला स्थापत्यकलेचा जो पौर्वात्य आणि पाश्चिमात्य पैलूंचा संगम घडवणारा, जो वैविध्यपूर्ण वारसा लाभलेला आहे, त्याचा अभ्यास त्यांनी बारकाईने केला आणि त्यामुळे त्यांनी संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून करण्याला प्राधान्य दिले होते.

 गोवा सरकारच्या पुरातत्व खात्यामार्फत जेव्हा जेव्हा त्यांचा सल्ला घेतला, तेव्हा तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे तो दिला. सरकारी यंत्रणेला बरे वाटावे म्हणून त्यांनी कधी काम केले नाही, उलट त्यांच्या नियमांच्या चौकटीत राहून ही दर्जात्मक काम पुढे नेणे महत्त्वाचे मानले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूची वार्ता ऐकून मन सुन्न झाले. ‘पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा,’ या काव्य पंक्तीची प्रकर्षाने आठवण झाली. गोव्याच्या भूमीत जन्माला येऊन, इथल्या वास्तुकलेचा दर्जात्मक वारसा पुढे नेण्याचे कार्य त्यांनी आरंभले आणि ते करत असतानाच अकाली मृत्यू येणे, ही गोष्ट वेदनादायी अशीच आहे. केतक यांच्या संदर्भात कविवर्य बा. भ. बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर...

स्मिते जयांची चैतन्यफुले 

शब्द जयांचे नव दीपकळे

कृतीत ज्यांच्या भविष्य उजळे

प्रेमविवेकी जे खुलते

तेथे कर माझे जुळती...


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५