गोव्यातील युवतींसाठी ‘मिस युनिव्हर्स’ची सुवर्णसंधी

विवाहित महिलांनाही होता येणार सहभागी : जिया पाटील

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24 mins ago
गोव्यातील युवतींसाठी ‘मिस युनिव्हर्स’ची सुवर्णसंधी

‘मिस युनिव्हर्स गोवा’ आणि ‘मिस टीन गोवा’ पोस्टरचे अनावरण करताना जिया पाटील आणि भालचंद्र आमोणकर. (समीप नार्वेकर)

पणजी : गोव्यात प्रथमच ‘मिस युनिव्हर्स’साठी अधिकृत ऑडिशन्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा नसून गोव्यातील जास्तीत जास्त युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘मिस युनिव्हर्स गोवा’च्या संचालिका जिया पाटील यांनी केले. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भालचंद्र आमोणकर उपस्थित होते.
‍मिस युनिव्हर्स गोवा आणि मिस टीन गोवा या दोन्ही स्पर्धा अधिकृतरित्या मिस युनिव्हर्स संघटनेशी संलग्न आहेत. राष्ट्रीय संचालक निखिल आनंद यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून अधिकृत राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळणार असून, राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे.
मिस टीन गोवा या गटासाठी वयोमर्यादा १३ ते १९ वर्षे ठेवण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाही यात सहभागी होता येईल. तर मिस युनिव्हर्स गटासाठी किमान वय १८ वर्षे असून वरील मर्यादा नाही. विवाहित, अविवाहित, नोकरी करणाऱ्या किंवा गृहिणी, कोणतीही महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकते, असे पाटील यांनी सांगितले.

२८ एप्रिल रोजी ऑडिशन
ही ऑडिशन २८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून कांदोळी येथील हॉटेल नोव्होटेल गोवा येथे होणार आहे. इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी. या ऑडिशनचे परिक्षण मिस युनिव्हर्स इंडिया मनिका विश्वकर्मा या करणार असल्याची माहिती भालचंद्र आमोणकर यांनी दिली.

गोव्यातील महिलांकडे मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. मात्र, त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे ‘मिस युनिव्हर्स इंडिया’च्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आम्ही सहभागी महिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी तयार करू.
- जिया पाटील, संचालिका, मिस युनिव्हर्स गोवा